शैलीकार यशवंतराव १०९

यशवंतराव खर्‍या अर्थाने राजकीय नेते असल्याने त्यांच्या प्रवासाचा हेतू व प्रेरणा वेगवेगळ्या आहेत.  केवळ स्वांत-सुखाय फिरणे त्यांना शक्य नव्हते.  यशवंतरावांनी ते केले नाही.  पण प्रवासातील अनुभव विश्वाचे दर्शन सौ. वेणूबाईंना घडविण्यासाठी प्रवासात पाहिलेल्या अनुभवलेल्या, घडलेल्या, आकळलेल्या घटना प्रसंगांचे शब्दमय अनुभव त्यांनी चित्रित केले आहेत.  सगळा प्रवास अगदी प्रवासाला निघण्यापूर्वीपासून ते प्रवासाहून परतल्यानंतर त्याचे वर्णन यशवंतराव या पत्रात्मक प्रवासवर्णनात करताना दिसतात.  ते लिहितात, ''दररोज इतकी ठिकाणे पाहून होतात, इतकी वेगवेगळी माणेस भेटतात की, त्या सर्वांची एक जंत्री ठेवतो म्हटले तरी ते अवघडच.  या पत्रांच्या रूपाने यांची जी काय अस्पष्टशी का होईना, परंतु स्मृती राहील ती सुत्र काही कमी नाही.''  अशी या प्रवासवर्णनामागची हेतूसिद्धता ते स्पष्ट करतात.  

यशवंतरावांचा या 'विदेशदर्शन' मधील प्रवास म्हणजे एक पृथ्वीप्रदक्षिणाच होय.  या प्रवासामध्ये त्यांना अनेक देशांचा, नगरांचा, बेटांचा प्रवास करावा लागला.  हा प्रवासवृत्तांत त्यांनी पत्रांच्यारूपाने शब्दबद्ध केला आहे.  त्यामुळे त्यांच्या या ग्रंथाने प्रवासवर्णनाच्या साहित्यात नवीन भर घातली आहे.  या प्रवासात त्यांनी निसर्ग, वस्तुसंग्रहालये, रंगमंदिरे व त्या त्या प्रदेशातील कलावस्तूंचा व कलाकृतींचा आस्वाद घेतला.  ऐतिहासिक घटनांच्या नोंदी केल्या.  वैशिष्ट्ये सांगितली.  यशवंतरावांच्या प्रवासवर्णनातील अनुभवाची तत्त्वे, रुची वेगळी आहे.  त्यांच्या प्रवासवर्णनातील अनुभवविश्व, आशय व अंतरंग वेगळे वाटतात.  त्यांचे अनुभवविश्व प्रामुख्याने वास्तव जगाशी निगडित आहे.  उझबेकीस्तान या घटकराज्याची राजधानी ताश्कंद या ठिकाणावरून १९६६ ला जे पत्र लिहिले त्यात ते लिहितात, ''अफगाणिस्तानच्या प्रदेशात प्रवेश केल्यानंतर मात्र डोंगरी मुलूख, बर्फाच्छादित छोटी छोटी शिखरे यांचे दर्शन झाले.  कंदाहारवरून काबूलवर विमान आले.  सुरेख पहाडी प्रदेश वाटला.  अर्ध्या तासानंतर सोव्हिएट भूमीवर आलो.''  यशवंतराव ज्या गावापासून प्रवासाला निघतात त्यावेळी त्यांच्या मार्गामध्ये जी अनेक स्थळे आलेली आहेत, त्या स्थळांचे वेगळेपण व वैशिष्ट्ये स्वाभाविकपणे व अचूकपणे आपल्या डोळ्यांसमोर उभी करतात.  ताश्कंदला जाताना त्यांनी जे पाहिले त्याचे रसभरीत वर्णन केले आहे.  

आसाम राज्याच्या पूर्वेला जोरहाट जिल्हा ओ.  या जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी अलाहाबाद ते जोरहाट हा जो प्रवास विमानाने त्यांनी केला, त्या सुरेख प्रवासाचे वर्णन यशवंतराव असे करतात, ''आम्ही १७ हजार फूट उंचीवरून चाललो होतो.  आकाश अगदी स्वच्छ होते.  ऐन दुपारची १२॥ ची वेळ.  सूर्यप्रकाशाने अस्मान एकदम उजळून गेले होते.  त्यावेळी उत्तरेकडे हिमालयाच्या हिमाच्छादित शिखरांची एक रांगच रांग उभी होती.  जगप्रसिद्ध सर्व उंच शिखरे कवायतीसाठी जणू काय एका ओळीने शिस्तीत उभी आहेत काय, असे माझ्या मनात येऊन गेले.  विशेषतः धवलगिरी, माऊंट एव्हरेस्ट (गौरीशंकर) आणि कांचनगंगा यांचे स्पष्ट दर्शन झाले.  विशेष म्हणजे या सर्वांचे एकसमयावच्छेदे करून एकदम दर्शन !''  अशा स्वरूपाची माहिती यशवंतराव प्रवासात पाहिलेल्या स्थळांची व तेथील वैशिष्ट्यांची देतात.  

यशवंतरावांनी पॅरिसचा प्रवास १९७१ मध्ये केला.  त्यावेळी प्रत्यक्ष समोरचे उभे असलेले वास्तव आणि यशवंतरावांची कल्पकता यांचे मिश्रण त्यांच्या प्रवासवर्णनपर लेखातून जागोजाग प्रत्ययास येते.  ''नंतर आम्ही ढगांवर चढलो.  पांढर्‍या शुभ्र ढगांनी आसमंत भरून गेले होते.  त्यावरून आमचा राजावाडा तरंगत चालला होता.  सूर्याच्या कोवळ्या किरणांनी आमच्या विमानाची प्रतिछाया ढगावर फार सुरेख पडली होती.  सप्‍तरंगी वर्तुळाकार व त्याच्यामध्ये माशाच्या आकाराची विमानाची पडछाया, वेगाने पुढे पुढे चालली होती.  जणू काही भला मोठा देवमासा समुद्रातून वेगाने पाणी तोडीत चालला होता !.... ढग मोकळे झाले आणि खाली पुन्हा युरोपची भूमी दिसू लागली.  जिनेव्हा आणि भोवतालची रेखीव हिरवीगार शेती.  घनदाट आखीव बने.''  असे आकाशातील ढगाळ वातावरणाचे व एअर इंडियाच्या जम्बो विमानास राजवाडा संबोधित.  त्याचे वर्णन त्यांनी केले आहे.  विमानप्रवासात त्यांना दिसणारा विस्तीर्ण समुद्र, एल्बा बेट किंवा त्या विमानातील राजस्थानी रंगीबेरंगी पोशाखातील देखण्या हवाई सुंदरींची राधेशी केलेली तुलना.  या वर्णनातून यशवंतरावांच्या कल्पकतेबरोबर काव्यात्मक शैलीचा प्रत्यय येतो.