यशवंतरावांनी पॅरिस, लंडन, रोम, जिनिव्हा, ताश्कंद, वॉशिंग्टन, मॉस्को, नैरोबी, प्लोरेंस, न्यूयॉर्क या शहरांप्रमाणेच इटली, जर्मनी, जपान, व्हिएन्ना, स्वित्झर्लंड, स्वीडन, फ्रान्स, अफगाणिस्तान, पाकिस्तान अशा अनेक देशांचा प्रवास केला. या प्रवासातील घटना, अनुभूती, नियोजित कार्य, त्यातील समस्या आणि त्यांची उकल, झालेल्या चर्चा, विदेशी धोरण, जागतिक अर्थकारण, राजनीती, त्यामध्ये भारताची भूमिका यासारख्या असंख्य बाबींचा उल्लेख या पत्रात्मक लेखांत आलेला आहे. त्यामुळे या लेखनास वैविध्य प्राप्त होते.
यशवंतरावांचे प्रवासवर्णनात्मक लेखन यामुळेच लक्षणीय आहे. प्रवास आणि प्रदेश सार्याची गुण-दोष वैशिष्ट्यासह ही वर्णने चित्रित केली आहेत. साहित्यापासून राजकीय नेत्यापर्यंत सार्याचा प्रत्यय कुठे ना कुठे का होईना त्यांच्या प्रवासवर्णनात मिळतो. माणूस, प्रदेश, माहिती आणि अनुभव यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या या लेखनात दिसतो. यशवंतरावांचे हे प्रवासात्मक लेखन दैनंदिनीचा वापर करून लिहिले आहे. त्यामुळे अनावश्यक अद्भूतरम्य आणि काव्यमय न लिहिता त्यांना आवडलेल्या, न आवडलेल्या गोष्टी वास्तववादी दृष्टिकोनातून चित्रित केल्या आहेत. त्यामुळे या लेखनात रोखठोकपणा दिसतो. सत्यनिष्ठता तर आहेच शिवाय खोटी काव्यात्मकता, खोटा अनुभव आलेला नाही. स्मरणशक्तीवर भर द्यावा लागलेला नाही. जे प्रदेश पाहिले तेच सत्य पूर्ण अनुभवाच्या आधारे व्यक्त केले आहे.
यशवंतरावांनी ज्या राष्ट्रांना अथवा शहरांना भेटी दिल्या तेथील इतिहास, भूगोल, ऐतिहासिक स्थान, शिल्पकला, कलादालन, वस्तूसंग्रहालये, प्रबोधिका, प्रशिक्षण संस्था, विद्यापीठ, उद्योगधंदे, शेती, विश्वविद्यालये, निसर्ग, जीवनपरंपरा, प्रसारमाध्यमे, धर्म, आहार, राजवाडे, संस्कृती अशा अनेकविध गोष्टींचे चित्रण यात आले आहे. या चित्रणातील अनुभव ताजे वाटतात. ही सर्व पत्रे प्रवासाशी निगडित अशी आहेत. तसेच त्या त्या शहराचे वर्णन करणारी आहेत. त्यामुळे ही वर्णने खेळकर आणि प्रसन्न वाटतात. प्रवासात घेतलेली भोजने, पाश्चात्य स्त्रियांचे मुक्त वागणे, मुक्त क्लब, त्यांच्यात असलेली फॅशन, तेथील चकित करणारे आचारविचार, पद्धती इ. गोष्टींचे त्यांनी खेळकर आणि मोकळेपणाने वर्णन केले आहे. यशवंतराव मॉटेंगोबे (जमेका) येथील बीचवर प्रधानमंत्री श्री. मॅनली यांनी दिलेल्या पार्टीचा प्रसंग सांगताना लिहितात, ''जमेकाच्या संगीताची पार्श्वभूमी आणि सागराच्या लाटांच्या तालबद्ध चढउताराची लय यांची साथ यामुळे पार्टी लगेच जमून गेली. गप्पांचा कलकलाट, अधूनमधून हास्यांची उडणारी कारंजी, हातात हात घालून मोकळेपणाने इकडेतिकडे भटकणारी जोडपी-सगळे वातावरण कसे मोकळे होते. कॅनडाचे प्रधानमंत्री श्री. आणि श्रीमती ट्रयूडो हे जोडपे विशेष खूष दिसते. संगीत अधिक तेज होताच या जोडप्याने नृत्याचा श्रीगणेशा केला. बहुतेक सर्व जोडपी त्यात सहभागी झाली. अशा तर्हेने हा आनंद समारोह रात्री ११ वाजेपर्यंत चालू होता. अशा रीतीने यशवंतरावांनी रंगलेल्या पार्टीचे रंगतदार शैलीत केलेले वर्णन आहे. 'आम्ही पिणारे नाही' हे तेथील व्यवस्था ठेवण्यासाठी असलेल्या लोकांना कळताच त्यांची झालेली निराशाही यशवंतरावांनी तेवढ्याच मिस्किलपणे वर्णन करून सांगितली आहे. त्यामुळे यशवंतरावांच्या प्रवासात्मक लेखनातील 'मी' अधिक पारदर्शकपणे स्पष्ट होतो.
प्रवासवर्णनात लेखक आत्मचरित्राप्रमाणे स्वतः अनेक अंगांनी त्यात व्यक्त झालेला जाणवतो. यामुळे प्रवासवर्णनात्मक लेखनात आत्मनिवेदन येणे स्वाभाविक असते. प्रवासात आलेले नाना तर्हेचे अनुभव तो आत्मनिवेदनाच्या माध्यमातून व्यक्त करतो. आत्मपरतेच्या प्रकटीकरणास या वाङ्मयात पूर्ण मोकळीकता असते. पण अशा प्रकटीकरणात 'मी' पणाचे भान असावे लागते. आत्मप्रौढी आणि आत्मप्रदर्शन त्यात येता कामा नये. पाहिलेल्या भूप्रदेशाचे आलेल्या अनुभवाचे व आपल्या मनावर झालेल्या परिणामाचे वर्णन त्यात येणे क्रमप्राप्त असते. कोपनहेगला यशवंतराव गेले असता एक स्नानगृहातील ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या शिरविरहीत मूर्ती पाहून ते सुन्न झाले. काही ख्रिश्चन धर्मवेड्यांनी हे कृत्य केले होते. हे ऐकून त्यांच्या मनात विचार आला की फक्त इस्लामच्या राजवटीत अशी कृत्ये केली जात होती, पण ख्रिश्चनही त्यास अपवाद नाहीत. अशी प्रतिक्रिया नोंदवतात. फामागुस्ता बंदर पाहताना ते म्हणतात, ''नव्या धर्मवेड्यांनी जुन्या धर्मप्रतिकावर विध्वंसक हल्ले करावेत असा जणू काय नियमच होता. ''आमच्याबरोबर एक प्रौढ ग्रीक स्त्री मार्गदर्शक म्हणून होती. ती म्हणाली, ''धर्माच्या नावाखाली किती शतकापासून मानव अत्याचार सहन करीत आहे. त्यांचे दुःख अजून संपलेले नाही.