शैलीकार यशवंतराव १०४

पत्रकार नरूभाऊ लिमये यांचे व्यक्तिचित्र यशवंतराव असेच रेखाटतात.  ''ह्या माणसात तल्लख बुद्धी, तळमळ, संघटना चातुर्य आणि जिद्द आहे.  आणखी एक गोष्ट ध्यानात आली ती ही की तात्त्वि मतभेदांच्या गदारोळात स्नेहाचे निर्मळ झरे न ढवळले जाण्यासाठी, मैत्रीचा नाजूक बंध सुरक्षित राखण्यासाठी आवश्यक तो हळुवारपणा ह्या माणसात आहे.''  त्यामुळे यशवंतराव व त्यांच्यात संघर्ष होऊनही त्यांची मैत्री अतूट राहिली.  या व्यक्तिमत्त्वातील अनेक गुण यशवंतरावांनी पाहिले.  त्यांची बुद्धिमत्ता, जनकल्याणाची तळमळ, जिद्द, स्वतःशी, मनाशी इमान राखण्याची हिंमत, जुटून काम करण्याची वृत्ती अशा कितीतरी गुणांचा सार्थ गौरव यशवंतराव करतात.  यशवंतरावांनी अशा कितीतरी व्यक्ती पाहिल्या त्या त्यांच्या बाह्यचित्रणासह साकारल्या आहेत.  शांतारामबापू इनामदार, पांडुरंग अण्णा शिराळकर, म्हातारबा रामोशी कोतावडेकर, भेटलेले अनेक विद्वान पंडित अशी कितीतरी विचारधारांची माणसे यशवंतरावांनी पाहिली व त्या त्या वेळी प्रसंगानुसार योग्य, समयोचित वर्णन करून त्यांचे दर्शन घडविले.  माणसं समजून घेण्यासाठी हवा असणारा मनाचा मोठेपणा आणि हळुवारपणा यशवंतरावांच्या जवळ आहे.  त्यांच्याच शब्दात ते असे चिंतन प्रकट करतात, ''आयुष्यात माणसे भेटतात, पांगतात, काहींची तर पुन्हा गाठभेटही होत नाही, पण काही पुनः भेटतात.  त्यांच्याशी संबंध निर्माण होतात आणि ते संबंध शक्तिशाली बनतात.  परस्परांच्या जीवनाचा सहारा बनतात.  ते जीवन समुद्ध आणि संपन्न बनवतात.  माणसामाणसांतले संबंध नाजूक असतात.  ते शब्दांनी वर्णून सांगायचे समर्थ प्रयत्‍नही पुष्कळदा मागे असमाधान ठेवून जातात. तरीही प्रसंगानुरूप माणसांना माणसांबद्दल बोलावे, लिहावे लागते.  हे अवघड असते.  पण म्हणून ते टाळावे, हे काही खरे नाही.  मिळालेली भावव्यक्तीची संधी आपल्याला नीट वापरता आली, तर समाधान वाटते.  ज्यांच्याबद्दल आपण बोलतो, त्यांनाही त्यातल्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय आला तर बरे वाटत असावे, असा अंदाज मी माझ्या अनुभवावरून बांधतो.''  यशवंतरावांनी बाह्यसौंदर्यासोबतच व्यक्तीच्या अंतरंगाचे सौंदर्य स्पष्ट केल आहे.  त्यांची ही व्यक्तिचित्रे सौंदर्यलक्षी, संवेदनशील, चिंतनशील आहेत.  समोरच्या व्यक्तीला आरपार पाहता येईल अशी भेदक दृष्टी असणार्‍या लेखकाचे व्यक्तिमत्त्व या चित्रणातून सतत डोकावत राहते.

यशवंतरावांच्या व्यक्तिचित्रणात्मक लेखनाचे विशेष

यशवंतरावांची ही व्यक्तिचित्रे प्रसंगपरत्वे लिहिली आहेत.  या ना त्या निमित्ताने काही मान्यवर व्यक्तीसंबंधी लिहिलेली ही व्यक्तिचित्रे वाचत असताना नानाविध क्षेत्रांतील व्यक्तींचा अनोखा परिचय घडतो.  त्यांच्या अपरिमित पैलूंचे दर्शन घडते.  गुणांनी व स्वभावविशेषांनी नटलेली ही माणसे जशी मान्यवर आहेत तशीच अप्रसिद्धही आहेत.  या व्यक्तिचित्रणात्मक लेखांचा बारकाईने अभ्यास करताना एक गोष्ट तत्क्षणी उमगते की, किती विविध क्षेत्रांतल्या व्यक्तींशी यशवंतरावांचे निकटचे संबंध होते.  त्यांची लेखणी ह्या व्यक्तिमधल्या माणुसकीचे सतत वेध घेत असते.  त्यांच्या जीवनातल्या लहानसहान प्रसंगातूनही मोठा आशय मांडते.  यशवंतराव चव्हाणांच्या व्यक्तिदर्शनात किती सूक्ष्मता असते याचा अनुभव त्यांच्या प्रत्येक व्यक्तिचित्रणातून येतो.  तुरचीचा कृष्णा धनगर, कुलसुमदादी, गणपतराव चव्हाण, आत्माराम पाटील, किसन वीर, वसंतदादा पाटील, आई विठाई इत्यादींच्या स्वभावाचे, त्यांच्या आयुष्याचे, लेखकाने केलेले वर्णन असेच आहे.  किसन वीर यांच्याबद्दल लिहितात, ''किती लोकांना माहीत आहे की वरून दिसणारी कणखर मूर्ती हृदयाने कोमल आहे.  मित्रांसाठी व गरिबांसाठी कारुण्याचे अश्रू त्यांच्या डोळ्यात उभे राहतात किंवा भाऊसाहेब बांदोडकर हे रसिक होते, जिज्ञासू ग्रंथप्रेमी होते आणि विद्याप्रेमी सरस्वतीभक्त होते.''