यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ४१

‘माझ्या मनामध्ये टिळक आणि ज्योतिराव फुले यांची तुलना होऊन गेली. याउलट दोघांच्या विचारामध्ये मला कोठे साम्य दिसले नाही. यामुळे थोडी खंत होती. पण शेवटी ही दोन्ही मोठी माणसे आहेत.’ (पृ. ३५) दोघांच्यामध्ये कोण मोठा व कोण लहान हा तुलनेचा विचार चव्हाणांनी सोडून दिला. स्वराज्याचा विचार टिळकांनी सांगितला आणि गरिबांची शिक्षणाने प्रगती झाली पाहिजे हा विचार महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितला.’ (पृ. ३५) ‘हे दोन्ही विचार महत्त्वाचे म्हणून दोन्ही माणसे आपल्या दृष्टीने मोठीच आहेत. या निर्णयाला मी माझ्या मनाशी आलो.’ सत्यशोधक चळवळीच्या ‘जेध-जवळकर’ कालखंडात टिळक-फुले वेगळे वाटले. महात्मा फुले ब्राह्मणेत्तरांचे व दलितांचे आणि लोकमान्य ब्राह्मणांचे असा अर्थ त्याकाळात होत होता. पण एवढ्या पूर्ववयात चव्हाणांनी दोघांचा भिन्न उद्देश सांगून समन्वयाने दोघांचे महत्त्वही त्यांच्या परीने ओळखले, यावरून त्यांची बुद्धिमत्ता, समतोलवृत्ती व तटस्थता यांचे आज आश्चर्य वाटते. ‘कृष्णकाठ’ या आत्मचरित्रात अतिशय सूत्रबद्धतेने, संक्षेपाने काळाच्या काठाकाठाने पुढे जातात. गणपतराव बंधूंबद्दल ते फार आपुलकीने व जिव्हाळ्याने लिहितात – ‘माझ्यासाठी त्यांनी आपल्या शिक्षणाचाही पुढे त्याग केला आणि माझे शिक्षण पुरे व्हावे म्हणून प्रयत्न केला.’ (पृ. ४२) शिक्षणाचे महत्त्व व शिक्षणाची योग्यता गणपतरावांना सत्यशोधक चळवळीमुळे समजली. एवढे विधान स्वावलंबनाने इथे करावेसे वाटते. ‘यशवंतराव-इतिहासाचे एकपान’ या चरित्राच्या प्रस्तावनेत तर्कतीर्थानीही वरीप्रमाणे विधान केलेले आहे.

मातोश्री विठाबाई यांच्याबद्दल त्यांनी अनेक ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांची आई हीच त्यांची गुरू होती. ‘मार्गदर्शक’ आई झाली. तिने आधार दिला.

बहुजन समाजातील जी माणसे त्यावेळी आमदार-नामदार-दिवाण-मंत्री होत, त्यांना सरकारात मान मिळे असा मान त्याकाळात चव्हाणांना पटकाविता आला असत. मोठी नोकरीदेखील मिळाली असती. पण हा सहज उपलब्ध होणारा मार्ग सोडून, तुरूंगातील हालअपेष्टा त्यांनी भोगल्या. लोखंडाचे चणए खाल्ले. यामुळे चव्हाण चरित्र व कार्य मोठे झाले हे सार आहे. रहस्य आहे.

यशवंतरावांचे समाजकारण (व राजकारण) ही पुरोगामी होते. पण त्यांची धर्मविषयक मते व अनुभवदेखील चिंत्य आहेत. त्यांच्यावर त्यांच्या आईचे देवधर्मविषयक संस्कार दृढ राहिले. ‘मीपणा सोड आणि जे तुझे काम तू केले पाहिजे, ते तू करीत रहा’ हे जे ‘गीतासार’ त्यांच्या आईने त्यांना सांगितले. ते त्यांनी दुस-या कोणा पंडिताकडूनही ऐकिले नव्हते. रामायण व ज्ञानेश्वरी यांचाही लाभ आईमुळे त्यांना प्राप्त झाला. (पृ. ५०-५१)

एकदा त्यांच्या आईबरोबर ते पंढरपुरला विठ्ठल-दर्शनास गेले. ‘तेथे असलेले पुजारी-बडवे देवासमोर एक क्षणदेखील कोणाला थांबू देत नव्हते. ढकलून काढीत होते... कोणी एक पुजारी माझ्या आईवर खेकसला’ बडव्यांचा वरील अनुभव असंख्यांना आला व येतो. हा प्रस्तुत लेखकानेही घेतला होता.