यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ३८

दिल्लीत चव्हाणांशी बोलताना खाजगी चर्चा झाली. यावेळी चव्हाम इंदिरा गांधी पक्षात जाण्याच्या विचारात होते. याबद्दल मी त्यांना प्रश्न विचारला. ‘इंदिरा बाई बदलत नाहीत’ असे त्यांनी आम्हास उत्तर दिले. पुढच्या आठवड्यात आम्हास समजले की-त्यांना इंदिराबाईंनी त्यांच्या पक्षात स्वीकारले. त्यांच्या त्यावेळच्या मनोव्यापाराची कल्पना नंतर आली. ते गंभीर होते तरी आमच्याशी उघड उघड बोलत होते. ‘जवळकर काय शिव्या द्यायचा!’ असा जवळकर यांच्याविषयी त्यांनी उल्लेख केला. ही वस्तुस्थिती होती. पण ती पश्चिम महाराष्ट्रात निर्माण का झाली यालाही कारणे होती. तरी जवळकरांच्या बाजूचे समर्थन त्यांच्यापुढे मी केले नाही. जरूरी वाटली नाही व केले असते तर त्यांना पटले नसते. माझी टिळकांच्या विषयींची जवळकर यांच्या भाषणाने निर्माण केलेली मते आता जशीच्या तशई राहिली नाहीत. प्रगल्भता आली. पण ती मी टिळक संप्रदायी कधीच झालो नाही. सत्यशोधक चळवळ गुणदोषात्मक होती. पण लोक प्रथम जागे होऊन शिक्षणमार्गी होऊ लागले होते. यामुळे पुढे म. गांधीच्या काँग्रेसविषयी आदर निर्माण होऊनही मागील सत्यशोधक चळवळ सर्वथा व्यर्थ होती. असे मला अद्याप वाटत नाही. जेवढे त्यातील चांगले तेवढ्याचे समर्थनच करीत राहिलो. महर्षी शिंदे याच भूमिकेचे होते. ब्राह्मणेतर राजकीय पक्ष सन १९३३ नंतर बरखास्त करावा अशा राजकीय मताचे शिंदे उघडपणे होते. पण सत्यशोधक समाज सुसंघटित व सुव्यवस्थित करावा असे त्यांचे उघड लेखी व तोंडी मत होते. डॉ. आंबेडकर यांचे यशवंतरावजी शेवटी चरित्र लिहिणार होते. ही चव्हाणांची इच्छा अपुरी राहिली. हे देशाचे दुर्दैव होय. आंबेडकरांच्या मते चव्हाणांचे टिळक हे प्रथमचे दैवत होय.

राजजकारणी व्यक्ती वादग्रस्त होतात. त्यांच्या हातून राजकारणात चुकाही होतात. सातारा जिल्ह्यातून निवडून जावे म्हणून मराठा म्हणजे मराठा जात असे मत मिळविण्यासाठी प्रचार केला. मराठा-मराठेतर सामाजिक विग्रहाचे जनकत्व जाधवांकडे दिले गेले. काही सरकारी बिले जनतेच्या हिताची नव्हती. तरीही ब्राह्मणेतर मंत्री, आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. समाजकारण बरेच पुरोगामी असूनही, राजकीय इंग्रजाळलेल्या धोरणामुळे यशवंतराव व त्यांच्या वेळच्या म. गांधींच्या प्रभावाखाली आलेल्या बहुजन समाजाच्या तरूण पिढीने ब्राह्मणेतर पक्षाशी विग्रह घेतला. राजकीय महत्त्वाकांक्षा वाढत चालल्या होत्या व मिळालेले राजकीय हक्क व देऊ केलेले राजकीय हक्क प्रयोगानंतर असमाधानकारक ठरले. म. फुले यांची सक्ती शिक्षणाची मागणी नेमस्त पक्षाला दूर सारून पुढे त्या काळानुसार थोड्या फार सत्तेवर आलेल्या ब्राह्मणेतर पक्षाला पुरी करता आली नाही. चव्हाणांना वरील पक्षाविषयी आस्था वाटली नाही यात नवल नव्हते.

चव्हाणांच्या वरील काळात म्हणजे विद्यार्थी दशेतच क-हाडला जेधेजवळकरांची सभा झाली व त्यात ब्राह्मणसमाजावर (व लोकमान्यांवरही) कडाडून तुफान हल्ला चढविला. वाईसही याच काळात जवळकरांचे पहिले व्याख्यान झाले होते. (दि. १३.१२.१९२५ रोजी) त्याला मी विद्यार्थी असताना श्रोता होतो. पण वाईच्या ब्रह्मवृंदांनी त्यांना फारसे बोलूच दिले नाही. जवळकरांचा हल्ला तीव्र असे. एवडे सांगण्यासाठी हे सांगत आहे. क-हाडला ‘ब्राह्मणांचे भवितव्य’ हा विषय होता. चव्हाणांनी हे व्याख्यान लक्षपूर्वक ऐकिले. जवलकरांचे ‘देशाचे दुश्मन’ हे त्या काळात सर्वत्र गाजणारे पुस्तक त्यांनी वाचले. जेधे-जवळकरांना या पुस्तकामुले शिक्षा झाली. तेव्हा तुरूंगात महर्षी शिंदे त्यांना भेटावयास गेले; कडकडून भेटले. डॉ. आंबेडकर यांनी हायकोर्टात मोठे बुद्धिचातुर्य दाखवून जेधे-जवळकरांना निर्दोष, सोडविले.