साहेब यशवंतरावजी चव्हाण-२८

१४नोव्हेंबरला मी संरक्षण-मंत्री झाल्याची घोषणा झाली... २० तारखेला मी झोपोच्या आधीन होणार, तोच फोन खणखणाला:
“साहेब, चीननं एकतर्फी युध्दसमाप्ती जाहीर केली आहे!”
(‘बीटींग द रिट्रीट’ चा बिगुल)
तो पी.टी. आय. चा बातमीदार होता.

अशी ही युध्दसमाप्ती--

संरक्षण-मंत्र्याच्या जीवन-नाटकाला तो climax होता!....  संरक्षण-खातं माझ्याकडे आल्यापासून रोज सकाळी ९|| वाजता मी तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करायला सुरूवात केली. संरक्षणाच्या नेमक्या समस्या मला कळू लागल्या. माझ्या आधीचे संरक्षण-मंत्री व्ही. के. कृष्ण मेनन हे स्वत:च गटबाजीच्या आहारी गेलेले... त्यामुळे लष्करात परस्पर संशय, अविश्वास बोकाळलेला.

एक साधी गोष्ट घ्या- लढाईत गुंतलेल्या अधिका-यासाठी जवानांसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या खात्रीनं ते काही करू शकले नाहीत. कारण काय? तर म्हणे वित्तीय सल्लागाराचा निर्णय! (तुच्छतेनं) ऊ: ! मी तो निर्णय बाजूला सारला, पंतप्रधानांशी चर्चा केली म्हटलं,
“त्यांच्याशी आपण प्रयत्न केले नाहीत तर दुसरं कोण करणार?”
५००० कोटींची ‘संरक्षण योजना’ मी संसदेपुढे ठेवली...

६३ साली नाशिक शहरानं मला लोकसभेवर बिनविरोध निवडून दिलं! तेव्हा कवि कुसुमाग्रज म्हणाले,
“भूगोलात-कृष्णा-गोदावरीचा संगम नाही, पण आज इतिहासात तो या निवडणूकीनं घडून आला आहे!”

६४ सालचा मे महिना. मी अमेरिकेच्या दौ-यावर होतो. कोलोरॅडोमधली ती रात्र.... मी गाढ झोपेत असताना मघ्यरात्री २ वाजता फोन खणखणला:

“Nehru   is  no  more !”
“Oh!  My  God, l  must  rush  back’’
“Yes, yes- l  understand, l  have  made  all  the  arrangements”

फिलिप्स टालबोटच्या स्वरातला सहकंप जाणवला.
स्वतंत्र भारताचा भाग्यविधाता काळाच्या पडद्याआड गेला.
कोटी कोटी भारतीयांच्या गळयातला ताईत लाल जवाहर हरपला.
स्वातंत्र्य संग्रामातला सर्वात तेजस्वी तारा लोपला.
माझ्या डोळयापुढे काळाकुट्ट अंध:कार पसरला.

नेहरूंच्या नंतर कोण?’ असा यक्षप्रश्न देशापुढे उभा होता.... देशविदेशात माझ्या अपरोक्ष माझ्या नावाची चर्चा चालू होती. ब्रिटिश पंतप्रधान मॅकमिलन, भारतात जयप्रकाश नारायण यांनीही माझं नाव घेतलं होतं.
पण भारताच्या राजकरणात उत्तर प्रदेशाचं महत्व, तिथलं राजकारण मी जवळून पहात होतो; अलाहाबादचा वरचष्मा होता!
आणि माझ्यापुरंत सांगायचं, तर व्यक्तिगत महत्वाकांक्षेपेक्षा देशाचं स्थैर्य आणि पक्षाचं बळ वाढणं महत्वाचं होतं! त्यामुळे, दिल्लीला राजकारणात मी पुष्कळसा सावध होतो.

लालबहादुर शास्त्री नवे पंतप्रधान झाले.