साहेब यशवंतरावजी चव्हाण-३०

जे व्हायला नको होतं, ते होऊ लागलं... पक्षापेक्षा व्यक्तिचं स्तोम माजवण्याचं पर्व सुरू झालं.... हाय-कमाण्ड ला तडा गेला... पक्ष मोडतोय् याचं मला अपार दु:ख होत होतं.
२६ जून ७० ला अर्थमंत्र्यांच्या खुर्चीवर बसायच्या आधी पाहून घेतलं:
"खुर्चीखाली एखादी  तरफ नाही ना?" (किंचित् खिन्न हसून)
"कारण, मोरारजीभाई अर्थमंत्री-पदावरून उडाले, तेव्हा आर. के. लक्ष्मणनं मोठं सुंदर 'कार्टून' काढलं होतं- शेजारच्या खोलीतनं इंदिराजी 'तरफ' खेचताहेत, आणि मोरारजीभाई अलगद खिडकीतनं बाहेर फेकले जात आहेत!"
म्हणून माझ्या खुर्चीखाली आधी बघून घेतलं:
तशी तरफ नव्हती!!! (सौम्य हशा)

१९७१ च्या 'बांगला-देश' युद्धात इंदिराजी दुर्गादेवीसारख्या तळपल्या, त्यामुळे' ७२ च्या निवडणुका कॉंग्रेसनं तुफान जिंकल्या; पण
कदाचित, हे अफाट यशच आम्हाला बाधक ठरलं असेल-पक्षापेक्षा व्यक्ती मोठी मानायची प्रवृत्ती कॉंग्रेसमध्ये आणखी वाढली:
'lndira  is  lndia'
म्हणण्यापर्यंत स्तुती-पाठकांची मजल गेली... तसा मलादेखील त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आदर होता. दिल्लीच्या एका प्रचार-सभेत मी म्हणालोसुद्धा:
"जर इंदिराजी हुकूमशहा असत्या, तर १४ महिने शिल्लक असताना त्यांनी निवडणुका घेतल्या नसत्या... बॅंकांचं राष्ट्रीयीकरण, ऐदी संस्थानिकांचे तनखे रद्द करणं-ह्या आपल्या पुरोगामी धोरणांना लोकमताचा पाठिंबा आहे. हेच त्यांना देशाला दाखवून द्यायचं होतं!"
निवडणूक-निकालांनी त्यांचा आत्मविश्वास सार्थ ठरविला... अहो, महाराष्ट्रात तर ४४पैकी ४३ कॉंग्रेसनं जिंकल्या!!
७४ साली पुन्हा संरक्षण-खातं आणि त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये परराष्ट्रखात्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली.
मी परदेशात गेलो होतो, आणि (दु:खानं उसासून) इकडे- २६ जून ७५ ला आणीबाणी घोषित झाली...
(खचून खुर्चीत खाली बसत)

तेव्हाच, 'सगळं सगळं संपलं-' असं 'फिलींग' मला आलं.
(थोडं सावरून) ७७ च्या निवडणुकीत (खर्जात) ९ राज्यात कॉंग्रेस परभूत झाली- ही पक्षाच्या इतिहासातली महा-भयानक घटना होती...स्वत: इंदिराजी वर्षभर घरात बसून होत्या. (उभारी धरून) अशा 'क्रायसिस' च्या काळात पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी लोकसभेत विरोधी पक्ष-नेता म्हणून-
आणि (ताडकन उठून)
संसदेबाहेरही मी जोमानं कामाला लागलो!
पण (पुन्हा खुर्चीवर बसत)
फुटू पाहणारा पक्ष पुन्हा सांधला जायचा नव्हता.... ७८ साली, उर्वरित कॉंग्रेस पक्ष पुन्हा फुटला, आणि कॉंग्रेस (आय्) चा जन्म झाला.

५ वर्षांसाठी लोकांनी निवडून दिलेलं 'मोरारजी सरकार' १||| वर्षातच कोसळलं-तेही अंतर्गत दुफळीमुळेच-
(खिन्न हसून) आपल्या देशातल्या विरोधी पक्षांची एक मोठी गंमतच आहे. ते जिंकले, तर कुणामुळे जिंकलो, म्हणून भांडतात आणि फुटतात!
आणि हरले, तर 'कुणामुळे हरलो?' म्हणून भांडतात आणि फुटतात!!...
भांडण्यात आणि फुटण्यात मंडळी मोठी पटाईत आहेत... इथं अशानं व्दिपक्षीय लोकशाही, रूजणार कधी?
'मोरारजी-सरकार' विरूध्द अविश्वासाचा ठराव मी मांडला होता.
राष्ट्रपतींनी सरकार बनविण्यासाठी (उठून) मला पाचारण केलं होतं! पण,
पुन्हा उत्तर-प्रदेशचं राजकारण आडवं आलं.. चरणसिंग पुढं झाले!....  माझ्या मनाविरूध्द काही जवळच्या मित्रांच्या आग्रहावरून मी उप-पंतप्रधानपद स्वीकारलं...

पण,
मला स्पष्ट दिसत होतं:
"हे काही खरं नाही, काऽही खरं नाहीए-"
-इंदिराजींची चाल;   
-चरणसिंगांची हेकटपणा;
तीन आठवड्यातच ते सरकार कोसळलं... माझा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला.
(हळूहळू काळोख होतो..... शोकसंगीत वाजत रहातं.... मग पुन्हा सावकाश प्रकाश उजळतो)