मुंबईला आलो, तर निरोप आला:
“माधवराव देशपांडे तुम्हाला न्यायला आलेत!” “कुठे?”
“बाळासाहेब खेरांच्या बंगल्यावर!” त्यावेळच्या मुंबई इलाख्याचे पंतप्रधान होते बाळासाहेब खेर. गेलो.
सौजन्यमूर्ती खेर म्हणाले, “हॅ हॅ हॅ, मी तुम्हाला मंत्रिमंडळात घेऊ शकत नाही, पण- पार्लमेंटरी
सेक्रेटरी म्हणून निवड केलीय् मी तुमची-“ (खचून बसत) खरं तर, मनातून मी नाराज झालो होतो.
पण, सगळे म्हणाले: “नाही म्हणू नका!” वेणूबाई म्हणाली, “आजवर एवढे कठीण निर्णय घेतले,
तेव्हा मनाची चलबिचल झाली नाही, मग आताच असं का?” मी समजलो.
शेवटी आईला विचारलं-तर ती म्हणाली: “मला मेलीला राजकारनातलं काई कळत नाय बग-
पर, तुला काइतरी नवं काम मिळतंय; तर आता ‘न्हायू’ म्हनू नगंस!”
हा हायकोर्टाचा आदेश होता (हशा)
कृष्णाकाठी वाढलो;
माणसं जोडली- मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा काळ होता तो!
(सन्तूरची हलकीशी सुरावट वाजू लागते)
संपूर्ण कृष्णाकाठ माझ्या प्रेमाचा, आवडीचा आणि जिव्हाळयाचा विषय...
माझं एक स्वप्न होतं: महाबळेश्वरात उगमापासून निघावं, आणि कृष्णामाईच्या काठा-काठानं थेट राजमहेंद्रीपर्यंत- म्हणजे मुखापर्यंत चालत जावं!
बदलत्या पात्राची भव्यता पहावी, निसर्गाचं सुंदरपण मनात साठवावं, तीरावरच्या गावांना भेटी द्याव्यात,
लोकांच्या ओळखी करून घ्याव्यात, पिकांनी डोलणारी शेतं पहावीत- पण, कृष्णेच्या प्रवाहासारखीच,
माझ्या जीवनप्रवाहाला नवी खोली प्रात्प झाली आहे! नव्या क्षितिजाकडं आता वेगानं निघालोय्-
रावसाहेब मधाळे म्हणाले: “आज १४ एप्रिल- बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस!” म्हटलं, “फारच चांगला योगायोग आहे!!”