समाजवादाचे तीन विशेष निकष असतात. पहिला हा, की सर्वांना विकासाची समान संधी मिळाली पाहिजे. सगळेजण कायद्यासमोर समान आहेत, एवढे म्हणून भागत नाही. देशाच्या आर्थिक समृद्धीमध्ये हातभार लावण्याची आणि या समृद्धीचा उपभोग घेण्याची प्रत्येकाला ख-या अर्थाने समान संधी उपलब्ध झाली पाहिजे. जीवनमानांतील विषमता नाहीशी करणे हा समाजवादाचा दुसरा निकष आहे. जीवनमान म्हणजे केवळ आर्थिक जीवन नव्हे, सामाजिक जीवनही त्यात अंतर्भूत असते. उत्पादनाच्या प्रक्रियेतील शोषण थांबविणे, ही समाजवादाची तिसरी अट आहे. हे तिन्ही निकष आपापल्या परीने महत्त्वाचे असले, तरी आर्थिक आणि सामाजिक विषमता नष्ट करणे, हा समाजवादाचा गाभा म्हटला पाहिजे. म्हणून आपण येत्या पाच-दहा वर्षांमध्ये ही विषमता निपटून काढली पाहिजे. तरच आपली समाजवादाच्या दिशेने खरीखुरी वाटचाल चालू झालेली आहे असे म्हणता येईल.
मला येथे आणखी एक इशारा द्यावासा वाटतो. केवळ घोषणा करून समाजवाद अवतरत नसतो. तसे मानणे म्हणजे आत्मवंचना करण्यासारखे होईल. समाजवादाच्या मार्गावरील प्रवास प्रदीर्घ, कठीण आणि कष्टप्रद असतो. मात्र हा प्रवास आपल्याला केलाच पाहिजे. कारण तशी आपली प्रतिज्ञाच आहे. म्हणून केवळ आर्थिक प्रश्नांचा तात्त्विक विचार करून चालत नाही. तो विचार विशिष्ट कालावधीमध्ये प्रत्यक्षात उतरायला हवा. आज काय करायचे, उद्या काय करायचे, या वर्षातील उद्दिष्ट कोणते, पुढल्या वर्षी किती पल्ला गाठायचा, हे सगळे ठरले पाहिजे, आणि त्याप्रमाणे घडले पाहिजे. समाजवाद पुस्तकातून अवतरत नाही. कृती-कार्यक्रमातून त्याचा प्रत्यय येत असतो.
आपल्या घोषणा जेव्हा कृतीत येतील, तेव्हाच आपण आपल्या कर्तव्याला जागलो, असे होईल. आपला उच्चार आणि आचार यांत तफावत पडली, म्हणूनच काँग्रेसला १९६७ मध्ये अनेक राज्यांत पराभव पत्करावा लागला. कारण लोक म्हणतात, 'तुम्ही बोलता खूप, पण करता मात्र थोडे !' म्हणून यापुढे ही चूक घडता कामा नये, येत्या चार-पाच वर्षांत निश्चित काय करू शकू, याचे आपल्या मनाशी मोजमाप करूनच आपण लोकांना आश्वासन दिले पाहिजे. नाही तर लोकांची फसगत केल्याच्या पापाचे धनी आपण होऊ. म्हणूनच यापुढे आपला सारा भर वचनपूर्तीवर असला पाहिजे.