भूमिका-१ (54)

या सर्व प्रयत्नांमुळे शेतकरी व कामगार आता भारतीय समाजाचा क्रियाशील, जागरूक व शक्तिमान घटक झाला आहे. स्वत:च्या शक्तीची प्रचीती आली, की समाजामध्ये एक नवीन शक्तिशाली प्रवाह सुरू होतो. हा शक्तिशाली प्रवाह लोकशाहीमध्ये अत्यंत परिणामकारक असतो. कारण, अशा प्रवाहामुळेच राजकीय स्थित्यंतरे घडत असतात.  त्यांचे प्रत्यंतर भारतामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये ज्या चार सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्यांच्यांत दिसून आले. या निवडणुकांमध्ये भारतातील नव्या शक्तीचे दर्शन घडले. अर्थात अद्याप आपली पक्षपद्धती जितकी तत्त्वप्रधान व सुसंघटित असावयास हवी, तितकी नाही. परंतु अनेक पर्यायी पक्ष लोकांपुढे जाऊन त्यांना राजकीय दृष्ट्या आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतात, हा एक असामान्य राजकीय अनुभव व प्रयोग आहे. हा मतप्रचार किंवा मतप्रसार शांततेने होतो व लोक आपले प्रतिनिधी शांततेने व विचारपूर्वक निवडतात, हे गेल्या निवडणुकांत दिसून आले आहे. तेव्हा पक्षपद्धतीत किंवा पक्षांच्या संघटनेत संघर्ष असले, तरी भारतीय मतदाराची राजकीय विवेकशक्ती शाबूत आहे, हे नि:संशय. माझ्या दृष्टीने आजच्या अंधारलेल्या वातावरणातही गेल्या वीस वर्षांत आपण मिळविलेला हा राजकीय अनुभव व यशस्वी केलेला लोकशाही निवडणुकीचा प्रयोग अधिक मोलाचा व आश्वासक वाटतो. यावरून हे सिद्ध होते, की राजकीय, आर्थिक व सामाजिक स्थित्यंतर हे आपण लोकशाही मार्गानेच घडवून आणवू शकू. नवजात भारतीय लोकशाहीची प्रकृती निकोप आहे, हे सिद्ध झाले आहे. ती निकोप प्रकृती निश्चितच आपल्याला राजकीय दृष्ट्या अत्यंत सावध व जागरूक ठेवील.

भारताचे ऐक्य, त्यातील लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन व भारताचे राष्ट्रिय संरक्षण या तीन प्रश्नांचा विचार आपल्याला अलगअलगपणे करून चालणार नाही. कारण हे तिन्ही प्रश्न परस्परांशी निगडित आहेत. अनेकदा या महत्त्वाच्या मुद्याकडे दुर्लक्ष होते. भारताचे संरक्षण हा यांपैकी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्याचा आपण विचार करू.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच शेजारच्या राष्ट्रांशी आपला संघर्ष सुरू होईल, याची आपल्याला मुळीच कल्पना नव्हती. कुरबुरी होत्या, पाकिस्तानबरोबरीचे संबंध तणाव निर्माण करणारे होते. पण पाकिस्तानने काश्मीरवर केलेल्या हल्ल्यामुळे युद्धाला तोंड फुटले. पण याही बाबतीत आपल्या आंतरराष्ट्रिय धोरणानुसार आपण हा प्रश्न समझोत्याने सोडविण्याचा प्रयत्न केला.

चीनबरोबरही संबंध ठेवताना आपली हीच दृष्टी होती. पण १९५० नंतर चीनने आपण आशियातील सर्वशक्तिमान राष्ट्र आहोत, या भावनेने आपले परराष्ट्रिय धोरण आखण्यास सुरुवात केली आणि त्यासाठी युद्धाची तयारी चालू ठेवली. भारतात निर्माण झालेल्या लोकशाही राजवटीमुळे चीनच्या राजकीय, आर्थिक रचनेला व त्याच्या तत्त्वप्रणालीला जणू आव्हानच देण्यात आले, असे चीनला वाटू लागले. भारत जर यशस्वी झाला, तर आपण जे राजकीय व आर्थिक धोरण पत्करले आहे, त्याचा पराभव होईल, असे चीनला वाटत होते. म्हणून चीनने, भारताला राजकीय व आर्थिक दृष्ट्या दुबळे करण्यासाठी, १९६२ साली काय घडविले, यासंबंधी मी येथे अधिक काही सांगत नाही. पण एवढेच सांगतो, की त्यानंतर आम्ही चीन आव्हानाचे स्वरूप नीट समजावून घेऊन त्याप्रमाणे धोरण आखू लागलो. त्यानंतर चीनने पाकिस्तानबरोबर मैत्री केली. या आणि तदनंतरच्या चीनच्या सर्व नीतीचे मुख्य ध्येय भारताचे आर्थिक सामर्थ्य खच्ची करणे हेच होते.