लोकपक्ष किंवा 'मास-पार्टी' आंदोलनाच्या रूपाने कार्य करीत असते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस पक्ष आंदोलनाच्या रूपाने कार्य करीत राहिला. सर्व समाजाचे प्रश्न हाती घेऊन या पक्षाला काम करावयाचे असल्याने काँग्रेस हा कधी बांधीव पक्ष बनू शकला नाही. पक्षाचे व्यापक स्वरूप हे त्याचे एक कारण आहे. कम्युनिस्टांप्रमाणे किंवा रा. स्व. संघासारखी या पक्षाला आपली रेखीव बांधणी करणेही परवडले नाही. आवश्यकही वाटले नाही.
लोकशाही ख-या अर्थाने शक्तिशाली करावयाची, तर साचेबंद, लष्करबंद, झापडबंद कार्यकर्त्यांच्या टोळ्या बनवून चालणार नाही. 'केडर-पार्टी' ही नेहमीच झापडबंद होण्याची शक्यता असते. विचार करण्याचे यंत्र बंद करून, कान व हात मोकळे ठेवावयाचे, फक्त 'आज्ञा' ऐकायच्या आणि त्या अमलात आणीत राहावयाचे, एवढेच 'केडर पार्टी' करू शकते.
काँग्रेस पक्ष अशा स्वरूपाचा असावा काय? माझे उत्तर असे, की एका विचाराने बांधलेले कार्यकर्ते पक्षाच्या संग्रही असलेच पाहिजेत. परंतु एका विचाराने म्हणजे काय? तो विचार कोणता? माझ्या मते तो विचार हाच असला पाहिजे, की सामाजिक, आर्थिक, नव्या राष्ट्रउभारणीचे काम करावयाचे आहे, हाच तो विचार. म्हणूनच सामाजिक, आर्थिक न्यायावर अव्याभिचारी निष्ठा आणि दारिद्र्याविरुद्ध, अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध पोटतिडीक हे दोन महत्त्वाचे गुण ज्या कार्यकर्त्यांच्या ठिकाणी आहेत, तो पहिल्या प्रतीचा कार्यकर्ता होऊ शकेल. विचारांच्या या दोन बाजू पक्क्या व्हाव्यात, यासाठी जरूर 'केडर' निर्माण करावे. त्यासाठी कार्यकर्त्यांना आवश्यक ते शिक्षण द्यावे. स्वातंत्र्यपूर्व काळात असे विचाराने बांधलेले कार्यकर्ते तयार करण्याची, प्रशिक्षित कार्यकर्ते घडविण्याची प्रक्रिया अवलंबिली जात असे.
परंतु आजच्या भारतासमोरील प्रश्नांचे स्वरूप आता वेगाने बदलत आहे. १९६० मध्ये तयार झालेला कार्यकर्ता १९७० मध्ये किंवा १९७७ मध्ये निकामी ठरेल, की काय, अशी ही स्थिती बदलली आहे. सारेच झपाट्याने बदलत आहे. सार्वजनिक कामाची मी सुरुवात केली, ती त्या काळात कार्यकर्त्यांची बांधणी करण्याचा मला मनस्वी छंद होता, म्हणून मी ते काम केले. स्वातंत्र्योत्तर काळात सत्तेच्या राजकारणात आल्यानंतर सत्तेच्या मदतीने कार्यकर्त्यांच्या फळ्या निर्माण केल्याचा आरोप माझ्याविरुद्ध करण्यासाठी जे सरसावत, त्यांना याची जाणीव नसावी, की काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणूनच मी सत्तेत वावरलो, वागलो आणि कार्यकर्त्यांची बांधणी करण्याचे प्रारंभापासून स्वीकारलेले कामच करीत राहिलो. महाराष्ट्रात अगदी प्रारंभी, मी स्वत: सत्तेवर नसताना आणि नंतर सत्तेवर असताना, कार्यकर्त्यांच्या बांधणीच्या कामाचा ध्यास मी नित्य ठेवला आहे.