अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शिकवण लो. टिळक व म. गांधींनी काँग्रेसला आणि कार्यकर्त्यांना दिली, याचे कारण, अन्याय हा गरिबांविरुद्ध, मागासलेल्यांविरुद्धच होत असतो, हे त्यांनी देशात आणि परदेशातही पाहिले होते. अनुभवले होते. म्हणूनच लहानमोठ्या अन्यायांविरुद्ध ते सातत्याने उभे राहिले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या शिकवणुकीचे कसोशीने पालन केले पाहिजे. समाजाला एकजिनसी बनवावयाचे, तर कार्यकर्त्यांनी व्रत म्हणून हे धोरण स्वीकारणे अत्यावश्यक आहे. आपल्या गावापासून काँग्रेस कार्यकर्त्यांनी याचा प्रारंभ करावा. गावातले कोणते घर, कोणते कुटुंब दारिद्र्याच्या पेचात सापडले आहे, कोणत्या घरातले हात मिळवते नाहीत, याची माहिती त्या गावातल्या कार्यकर्त्यांना असलीच पाहिजे. तरच गावात नव्याने उदयास येणा-या संस्थेत कोणाला अग्रक्रमाने सामावून घ्यावयाचे, याचा आग्रह ते धरू शकतात.
नव्याने उपलब्ध होणा-या सामाजिक व आर्थिक सुविधांचे रक्षण करणे, त्या वाढविणे, गरीब शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, हरिजनांना रोजगार मिळवून देणे, जाती-पोटजातींची प्रतिबिंबे कामात पडू न देणे, 'एक गाव-एक पाणवठा' यासारखे प्रतीकात्मक कार्यक्रम राबविणे, गावागावांतून त्यांची कसोटी लागते, की नाही, हे पाहणे आणि जेणेकरून समाज एकजिनसी बनेल, आर्थिक विषमता दूर होईल, असाच प्रमुख कार्यक्रम भारतासमोर असायला पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर गेल्या तीस वर्षांत काँग्रेसने या कार्यक्रमाचा पाठपुरावा केला. देशात निर्माण झालेल्या नव्या राजकीय परिस्थितीत तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा एक नवा कार्यक्रम म्हणून जिद्दीने, आत्मविश्वासाने, कसोशीने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. गावागावांत ज्यांच्या शब्दाला वजन आहे, प्रतिष्ठा आहे, असा कार्यक्रम राबविण्यासाठी ज्यांच्याजवळ साधनांची अनुकूलता आहे, किमानपक्षी हा कार्यक्रम राबविण्याची इच्छा आहे अशा कार्यकर्त्यांनी हे काम अग्रक्रमाने हाती घेणे उचित ठरेल. काँग्रेससाठी कार्यक्रम काय, अशी विचारणा करणाऱ्यांना माझे हे आवाहन आहे.
देशांतर्गत नव्या परिस्थितीने उभे केलेले आणखी एक महत्त्वाचे कार्य काँग्रेससमोर आहे, ते म्हणजे विशिष्ट विचाराने बांधलेल्या ध्येयनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे होय. एका दिलाने आणि विचाराने बांधलेले कार्यकर्ते असल्याशिवाय पक्ष कार्यक्षम बनत नाही, हे खरे; परंतु राजकीय पक्ष हा जेव्हा जन-आंदोलनाच्या स्वरूपाचा, लोकांचा पक्ष (मास-पार्टी) बनतो, त्यावेळी एकाच विचाराने बांधलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून त्याचे स्वरूप मर्यादित करणे अवघड ठरते. तसे ते आवश्यकही नसते, कारण सर्वच कार्यकर्ते समान अनुभवाचे असतील, याची शाश्वती नसते.