निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस-विरोध, सात्त्विक राग जनता पक्षाला उपयोगी पडला. सरकार चालवायचे, तर निश्चित धोरण हवे, त्याचप्रमाणे निश्चित कार्यक्रमाची दिशा हवी.
केंद्रीय शासनात या दृष्टीने अजून तरी 'ना सरकार, ना पक्ष' (Non Govt., Non Party) अशी स्थिती आहे. जनता सरकारचा काही ठोस कार्यक्रम आहे, अशी भावना व खात्री लोकांच्याही मनात नाही. त्यामुळेच सर्वत्र चलबिचल आहे. जनता पक्षाबद्दल एकूणच भ्रमनिरास व्हायला लागला आहे. जो दुर्बल समाज आहे, हरिजन समाज आहे, त्यांच्यांत हा भ्रमनिरासाचा वेग जबरदस्त आहे. ज्या वेगाने लोकांचा भ्रमनिरास होतो आहे, त्याची कल्पना खुद्द जनता नेत्यांना तरी आहे, की नाही, याची शंका वाटते.
कोणत्याही सरकारला जनमानसात आपली यशस्वी प्रतिमा उभी करावयाची, तर त्यासाठी निश्चित कार्यक्रमाची आणि विचारांची चौकट बनवावी लागते. आर्थिक उद्दिष्टांची अशी जाणीव आज जनता सरकारच्या बोलण्यात, वागण्यात आढळत नाही. जनता पक्षाला मी 'नॉन पार्टी' म्हणून संबोधतो, याचे कारण, या पक्षात निरनिराळे पक्ष सामील झाले आहेत; पण ते एकजीव झालेले नाहीत. प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे बोलतोय, वागतोय, हे पक्ष जनता पक्षातून फुटणार, असेही लोक बोलतात. परंतु वस्तुत: जनता पक्षातील विविध पक्ष फुटण्याचा प्रश्न आहेच कुठे? एकतर ते एकजीव झालेलेच नाहीत. मुळात ते फुटलेलेच होते. आजही ते तसेच विभक्त आहेत. यांवर काँग्रेस पक्षात दुफळी नाही काय, असा प्रश्न साहजिकच विचारला जातो. काँग्रेससारख्या जुन्या व मोठ्या पक्षाला दुफळीचा, मतभेदाचा प्रश्न नेहमीच भेडसावीत असतो. परंतु गेल्या नव्वद वर्षांच्या या पक्षाचा इतिहास पाहिला, तर अशा प्रसंगोपात्त निर्माण होऊ पाहणा-या दुफळ्या पचवून, कार्यक्रमाच्या बांधीवपणाने जनतेच्या पाठिंब्याने पक्षाचे सातत्य कायम राहिले आहे. हा इतिहास आहे.
असे असले, तरी या मतभेदाचा परिणाम या पक्षाने स्वीकारलेल्या कार्यक्रमावर होणार नाही, याची पक्षाच्या कार्यकर्त्यांना चिंता बाळगावी लागेल. आर्थिक विषमता दूर करण्याचा, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा किंवा राजकीय दृष्ट्या निवडणुकी लढवण्याचा कार्यक्रम असो; अंत:स्थ मतभेदाचा यत्किंचितही परिणाम या कोणत्याही गोष्टीवर होणार नाही, याची काळजी पक्ष-कार्यकर्त्यांनी घेतलीच पाहिजे. महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना तर या बाबतीत अधिकच जागरूक राहावे लागेल. यावेळी तर सर्व कार्यकर्त्यांना अन्य कशाचाही विचार न करता एकजुटीने आपली सारी शक्ती काँग्रेसच्या पाठीशीच उभी केली पाहिजे.
कार्यकर्त्यांना मी जेव्हा असे आवाहन करतो आणि जनता पक्षाच्या उणिवा सांगतो त्यावेळी शहाणीसुरती, विचारवंत मंडळीही माझ्यावर जातीयवादाचा आरोप करण्यासाठी सरसावतात. जाणती माणसे असे काही विपर्यस्त बोलतात, तेव्हा मला खेद होतो. वाईट वाटते, मन कष्टी होते. राजकारणातल्या वादात विचारवंत टीका करण्याचे जमत नाही, म्हणून जातीयवादाची शिवी देण्याचा या मंडळींचा प्रयत्न असावा काय? मला तरी तसेच वाटते.