ज्ञानदेवांच्या मृत्यूसमयी त्यांच्या शेजारी बसून असणा-या वेणूताईंना तो धक्का सहन झाला नाही. त्या बेशुध्द पडल्या. त्यानंतर त्यांची प्रकृती दिवसें दिवस बिघडत गेली. अशाप्रसंगी योग्य उपचार होणे गरजेचे होते. यशवंतराव आपला मुंबईचा मुक्काम हलवून पुण्यात आले. एका नातेवाईकामार्फत गाडी पाठवून पुढील उपचारासाठी वेणूताईना पुण्यात आणण्यात आले. नामांकित डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. त्या वरचेवर बेशुध्द पडतं. या उपचाराने फारसा फरक न पडल्याने यशवंतरावांनी वेणूताईंना एका नातेवाईकामासोबत आपल्या माहेरी फलटणला पाठविले. यशवंतराव भूमिगत असल्याने त्यांना वेणूताईसोबत राहणे शक्य नव्हते. वेणूताईंची वयस्कर चुलती व धाकट्या बहीण, भावाने त्यांची सेवा केली. वेणूताईंच्या प्रकृतीत मात्र फारसा फरक पडला नाही. त्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असल्याची बातमी यशवंतरावांना कळली. अस्वस्थ बनलेल्या यशवंतरावांनी काही झाले तरी फलटणला जायचेच असा निश्चय केला. रात्री भाड्याची टॅक्सी काढून प्रवास सुरू झाला. वाटेवर नीरा स्टेशनजवळ गाडी बंद पडली. रात्रभर टॅक्सी ड्रायव्हरने केलेल्या खटापटीमुळे अखेर पहाटे टॅक्सी सुरु झाली. सूर्योदय होण्यापूर्वी यशवंतराव फलटणच्या सासुरवाडीच्या घरी पोहचले.
यशवंतरावांच्या दर्शनाने वेणूताईंना मोठी धीर आला. या शारीरिक आजाराप्रसंगी मानसिक आधाराची त्यांना खूप गरज होती. यशवंतरावांनी दिवसभर तेथे थांबून वेणूताईंची विचारपूस केली. डॉक्टर बर्वे यांना बोलावून वेणूताईंवर योग्य उपचार करवून घेतले. चांगल्या डॉक्टरकरवी वेणूताईंवर योग्य उपचार करवून घेण्यास सहकार्य करा असा आग्रह त्यांनी डॉक्टर बर्वेंकडे केला. त्यांनीही वेणूताईंवर योग्य उपचार केला जाईल अशा शब्द यशवंतरावांना दिला. यशवंतराव फलटणला आल्याची वार्ता तोपर्यंत वाड्याबाहेर गेली होती. फलटण संस्थानच्या पोलीसांचा घराला वेढा पडला. यशवंतरावांचे धाकटे मेहुणे बाबासाहेब मोरे यांनी घरी येऊन यशवंतरावांना सांगितले,
"पोलीसांचा घराचा वेढा पडला आहे. "
यशवंतरावांना कळून चुकले आता आपणाला अटक होणार. पोलीसांनी घरात प्रवेश करुन यशवतरावांना वेणूताईंच्या समोरच अटक केली. जाताना यशवंतरावांनी वेणूताईंना धीर देत म्हटले, "मला काही होणार नाही. आता तू स्वत:च्या प्रकृतीची काळजी गे आणि फलटणला जास्त काळ न थांबता आईकडे कराडला जा."
यशवंतरावांची राजबंदी म्हणून फलटण संस्थानच्या जेलमध्ये रवानगी झाली. त्यांच्या मातोश्रींना ही बातमी कळताच त्या यशवंतरावांना भेटण्यास जेलमध्ये आल्या. यशवंतरावांच्या मोठ्या भावाचे नुकतेच निधन झाल्याने ही माता खचली होती. यशवंतरावांना भेटताच मातेने हंबरडा फोडून आपल्या दु:खाला मार्ग मोकळा करुन दिला. दोघे माय-लेकरे खूप वेळ दु:ख सागरात गढूत गेली. काही वेळाने यशवंतरावांनी स्वत:ला सावरले. आईला धीर देण्याचा प्रयत्न केला. आईची समजूत काढून तिला शांत केले.
दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर यशवंतरावांची रवानगी सातार जेलमध्ये करण्यात आली. तेथे दोन आठवडे यशवंतराव होते. या जेलमध्ये दरोडे घालण्यात तरबेज असणा-या एका भारदस्त शरीरयष्टीच्या म्हातारबा रामोशी कोतवडेकर यांच्याशी यशवंतरावांचा संपर्क आला. दरोडे घालण्याची पिढीजात परंपरा असणा-या म्हाताराबाकडून दरोडा घालण्याची पद्धत, पंचांग पाहून दिवस निश्चित करणे, आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन दरोडा घालणे, दरोड्यातील पंचवीस टक्के रक्कम गरिबांना दान करणे, स्त्रियांच्या अंगावर हात टाकायचा नाही आदी दरोड्यासंबंधीचे नियम ऐकून यशवंतराव चकीत झाले.