८. संस्मरणीय क्षण
यशवंतरावांच्या जीवनात त्यांच्या पत्नी वेणूताईंचे स्थान खूपच मोठे आहे. वेणूताईंचे माहेर फलटण. त्यांचे वडील रघुनाथराव मोरे हे बडोदा संस्थानात नोकरीस होते. वेणूताईंच्या विवाहापूर्वीच वडिलांचे निधन झाल्याने त्या पितृप्रेमाला पोक्या झाल्या. घरची परिस्थिती ब-यापैकी स्थिर होती. यशवंतरावांशी वेणूताईंचा विवाह २ जून १९४२ रोजी मराठा बोर्डींग कराड याठिकाणी झाला. विवाहानंतर जेमतेम दोन-तीन महिने झाले नाही तोच यशवंतरावांना स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल तुरुंगात जावे लागले. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर पुण्यात भूमिगत राहून त्यांनी काम सुरु ठेवले. १९४२ च्या लढ्याने तीव्र रुप धारण केले होते. १४ जानेवारी, १९४३ रोजी पोलीसांनी वेणूताईंना अटक केली. तो दिवस संक्रांतीचा होता. लग्नानंतरच्या पहिल्या संक्रातीला वेणताईंना तुरुंगात जावे लागले. यशवंतरावांना ही बातमी पुण्यात समजली, तेव्हा त्यांना खूप दु:ख झाले. वेणूताईंना सुमारे सहा आठवडे कराड व इस्लामपूरच्या जेलमध्ये ठेवण्यात आले. त्यांच्या जीवनातील तो पहिलाच तुरुंगवास होता. पोलीसांचे उद्धट प्रश्न, निकृष्ट जेवण, आरोपीप्रमाणे वागणूक हा त्रा वेणूताईंनी सहन केला. जेलमधून सुटल्यानंतर यशवंतरावांनी वेणूताईंना विचारले.
"पोलीसांनी कशी वागणूक दिली?"
यावर वेणूताई बोलल्या,
"पोलीस इतर कैद्यांना जशी वागणूक देतात, तशीच दिली."
वेणूताईंनी तुरुंगातील त्रास निमूटपणे सहन केला. यशवंतरावांना तुरुंगात व तुरुंगाबाहेर दोन्हीही ठिकाणी वेणूताईंनी समर्थपणे साथ दिली. एका चळवळी दरम्यानच एका इंग्रज सैनिकाने वेणूताईंच्या पोटावर लाथ मारली. यावेळी वेणूताईंना दिवस गेले होते. त्यांच्या पोटात तीव्र कळ आली. त्या अत्यवस्थ होऊन खाली कोसळल्या. त्या गो-या सैनिकाने इतक्या निर्दयपणे लाथ मारली होती की, त्यामुळे पोटातील मूल मरण पावले. त्यानंतर यशवंतरावांना पुत्रप्राप्ती कधीच झाली नाही. वेणूताईं व यशवंतरवांनी हे हिमालयासारखे मोठे दु:ख निमूटपणे गिळले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात इतकी मोठी किंमत मोजावी लागली.
वेणूताई तुरुंगातून सुटल्या त्यावेळी यशंतरावांचे मोठे बंधू ज्ञानदेव खूप आजारी होते. मधले बंधू गणपतराव यांना अटक करुन तुरुणांत पाठविण्यात आले होते. थोरल्या बंधूंचा मधल्या बंधूवर खूप जीव होता. गणपतरावांची तुरुंगातून सुटका करुन घेण्यासाठी मोठ्या बंधूंना आपण स्वत: आजारी असल्याचे सर्टिफिकेट डॉक्टरांकडून हवे होते. ज्ञानदेवांच्या पाठिला लहानसे आवळे उठल होते. या आवळूचे डॉक्टरांकडून ऑपरेशन करून घ्यावे व त्याचे सर्टिफिकेट पोलीसांत देऊन मधल्या भावाची तुरुंगातून सुटका करुन घ्यावी असा निर्णय ज्ञानदेवांनी घेतला. त्यांची पत्नी व आईला हा निर्णय मान्य नव्हता. पण ज्ञानदेवांनी घरचा विरोध डावलून स्वत:चे ऑपरेशन करवून घेतले. विश्रांतीची गरज असताना ऑपरेशननंतर केवळ एक तास दवाखान्यात थांबवून त्यांना टांग्यातून घरी आणण्यात आले. जखम वाढत गेली. जखमेत सेप्टिक होऊन त्यांना निमोनिया झाला. आठ ते दहा दिवस ते जखमेशी झगडत होते. तुरुंगातून नुकत्याच सुटलेल्या वेणुताई मोठे दीर ज्ञानदेवांच्या सेवेसाठी होत्या. शेवटी परिस्थिती हाताबाहेर गेली. ज्ञानदेवांचा त्यातच अंत झाला. यशवंतराव आपल्या मोठ्या दादाला मुकले. भूमिगत असणा-या यशवंतरावांना ज्ञानदेवांच्या निधनानंतर सुमारे पंधरा दिवसांनी पुण्यात ही दु:खध बातमी समजली. ते खूप कळवळले. वेणूताईंचा तुरुंगवास व मोठ्या भावाचा मूत्यू हे दोन मनाला तीव्र वेदना देणारे प्रसंग त्यांना सहन करावे लागले.