संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या ऐन मुहूर्तावरच ग. त्र्यं. माडखोलकर यांनी 'हे मराठी राज्य की मराठा राज्य?' असा जळजळीत पण परखड प्रश्न यशवंतरावांना आपल्या संपादकीयातून विचारला. माडखोलकर संयुक्त महाराष्ट्राचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा कलही डाव्या राष्ट्रीयत्वाकडे झुकणारा होता. शिवाय यशवंतरावांएवढेच अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांना नागपूरच्या सभेत उत्तर देताना यशवंतरावांनी त्यांच्या लेखणीचा गौरव करीत, 'हे मराठी राज्यच असेल' अशी ग्वाही त्यांच्यासकट सा-या महाराष्ट्राला दिली. दुर्दैवाने लोकशाहीतले राजकारण आकड्यावर उभे होते. त्यामुळे आपला शब्द यशवंतरावांना नेहमीच खरा करता आला नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात एकवेळ अशी होकी की, विधानसभेतील २८८ आमदारांपैकी २२२ जणांची जात एकच होती. तसेच त्यातल्या ८८ जणांचे आडनावही एकच होती. नंतरच्या काळात महाराष्ट्रातील अनेक मराठेत्तर जातीनी इतर पक्षांच्या झेड्यांखाली जाणे पत्करले. तरीही यशवंतरावांच्या काळात एक जातीचा राजकारणावरील वरचष्मा पुढल्या काळातल्याएवढा बटबटीतपणे कधी पुढे आला नाही... या बाबीला एका चमत्कारिक वास्तवाची असणारी पार्श्वभूमी एवढ्या वर्षानंतरही आज लक्षात घ्यावी अशी आहे. १९३७ च्या निवडणुकीच्या काळात यापुढे बहुजनांचीच सत्ता येणार असे म्हणत मराठा समाजाचे अनेक मान्यवर नेते काँग्रेसमध्ये आले. या निवडणुकीनंतर मात्र बाळासाहेब खेर यांना तेव्हाच्या मुंबई राज्याचे पंतप्रधानपद वल्लभभाईं पटेलांनी देऊ केले. त्यावेळी 'काँग्रेस ब्राह्मणांची झाली' असे म्हणत निवडणूकीपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेले नेते काँग्रेसबाहेर पडले. पुढे १९५६ मध्ये यशवंतराव नव्या मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा 'काँग्रेस बहुजनांची झाली' असे म्हणत ते सारे नेते पुन्हा काँग्रेसमध्ये परत आले. राजकीय पक्षांचे जातीयीकरण आपल्यात फार वर्षापूर्वी सुरु होऊन नंतरच्या काळात त्याने ख-या लोकशाहीवर मात करणे यांचा इतिहास एवढा जुना व एक नेत्याला आवर घालता येण्याजोगा नव्हता हे यावरुन लक्षात येते.
यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुसंस्कृतपणा व संवेदनशीलता सांगणारा एक प्रसंग संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान घडला. त्यांच्या कुटुंबात मूल जन्माला आले नाही. त्यांची ती दुबळी बाजू हेरून आचार्य अत्र्यांनी त्यांच्यावर एकदा कमालीच क्रूर टिका केली. त्यांच्या मौनाची आणि नेहरुनिष्ठेची टवाळी करण्याच्या नादात यशवंतरावांच्या शारीरिक अभावावरच त्यांनी नको ते बोट ठेवले. त्या टिकेला उत्तर देताना यशवंतराव म्हणाले, ' आचार्च अत्रे हे महाराष्ट्राचे थोर लेखक आहेत. त्यांचे साहित्य वाचनच मी लहानाचा मोठा झालो. त्यांच्या आताच्या टीकेने मी संतापलो नाही. माझे दु:ख वेणूताईविषयींचे आहे. त्या गरोदर असताना आम्ही दोघेही स्वातंत्र्य लढ्यात होतो. एका सोजिराने ( इंग्रज सैनिक ) पोटावर लाथ मारल्याने वेणूताई अत्यवस्थ झाल्या आणि जन्माला येणारे मूल जन्म घेऊ शकले नाही. ते दु:ख आम्ही मुकाटपणे गिळले. अत्र्यांनी केलेल्या टीकेमुळे वेणूताईंना ज्या वेदना झाल्या त्यामुळे मी कळवळतो आहे." पुढे अत्र्यांनी यशवंतरावांची क्षमा मागितली. पण. घडू नये असा प्रमाद आचार्य अत्रेंच्या हातून घडून गेला होता.
यशवंतरावांना त्यांच्या चतुरस्त्र, अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक विद्यापीठांनी मानद पदव्या देऊन सन्मानित केले. २३ फेब्रुवारी १९६९ मध्ये कानपूर विश्व विद्यालयाने 'डॉक्टर ऑफ लॉ' ही सन्मानपूर्वक पदवी त्यांना बहाल केली. लगेचच दुस-या फेब्रुवारी १९७० मध्ये मराठवाडा विद्यापीठाने 'डॉक्टर ऑफ लॉ' पदवी देऊन कानपूर विद्यापीठाची पुनरावृत्ती केली. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानेही डिसेंबर १९७४ मध्ये यशवंतरावांना 'डॉक्टर ऑफ लॉ' पदवी प्रदान केली. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी याचेकडून जाने. १९७६ मध्ये 'डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी' देऊन गौरविण्यात आले. मार्च १९८४ मध्ये पुणे विद्यापीठाची सन्माननीय 'डी.लीट' पदवी बहाल करण्यात आली. अशारितीने विविध विद्यापीठांनी यशवंतरावांना अनेक सन्माननीय पदव्या बहाल करुन त्यांच्या कार्याचा यशोचित्त गौरव कला. राजकीय क्षेत्रात काम करणा-या व्यक्तिच्या दृष्टीने हा दुर्मिळ योगायोगच मानावा लागेल. अर्थात यशवंतरावांच्या विद्वत्तेचाच तो गुणगौरव होता.