७. राजकीय वाटचाल
पंडित नेहरुंविषयीच्या आपल्या आठवणी सांगताना यशवंतराव चव्हाण म्हणतात,
"पं. नेहरुंना मी प्रथम १९३१ मध्ये कराडला पाहिले. त्यावेळी मी शाळेत शिकत होतो. पंडितजी बंगलोर मेलने जाणार होते. ही रेल्वे मध्यरात्री कराड स्टेशनवर येते. पाचशे विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मध्यरात्री आम्ही कराड स्टेशनवर पोहचलो. बंगलोर मेल येताच पं. नेहरु ज्या डब्यात बसले होते तो डबा शोधून काडण्यात आला. झोपेत असणारे नेहरु जागे झाले. काहिशा रागीट मुद्रेने त्यांनी सर्वांकडे पाहिले, पण अल्पकाळातच त्यांचा तो राग मावळला. सुमारे ५ मिनीटे ते बालगोपाळात रमले. नेहरुंचे मला झोलेले हे पहिले दर्शन."
यानंतर अनेक वर्षांच्या कालखंडानंतर पं. नेहरुंचा प्रत्यक्ष सहवास यशवंतरावांना लाभला. नेहरुंची पुस्तके, त्यांच्या आत्मकथनांचे वाचन मात्र सुरुच होते. नेहरुंच्या निरनिराळ्या सभांना हजारों श्रोत्यांपैकी एका या नात्याने यशवंतरावांची उपस्थिती असायची. पंडितजींशी प्रत्यक्ष भेट मात्र अनेक वर्षानंतर १९५२ साली झाली. त्यावेळी यशवंतराव मुंबई सरकारमध्ये अन्नधान्य पुरवठामंत्री होते. मुंबई शहराला रेशनिंगच्या काळात मिळणारे धान्य यापुढेही चालू रहावे या मागणीसाठी यशवंतरावांनी दिल्लला जाऊन पंडितजींसमोर आपली भूमिका पटवून दिली. यानंतर १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न निर्माण झाला आणि त्याद्वारे यशवंतरावांचे वक्तृत्त्व, प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा त्यांचा स्वभाव व कामावरील निष्ठा यामुळे पंडितजींचा यशवंतरावांवरील विश्वास उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेला. १९५६ मध्ये द्विभाषीक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री, १९६० ला नवीन स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व १९६२ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री आदी विविध जबाबदा-या नेहरुंनी यशवंतरावांवर सोपविल्या.
आपल्या कार्याला मर्यादा घालून घेणे हे यशवंतरावांच्या स्वभावातच नव्हते. नेतृत्वगुण व स्वातंत्र्यलढ्यातील योगदान याच्या आधारे यशवंतराव १९४० मध्ये सातार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बनले. पुढील काळात त्यांचा राजकीय क्षेत्रातील आलेख उंचावतच गेला.
हिंदुस्थानला लवकरच स्वातंत्र्य द्यावे लागणार याची ब्रिटीश सरकारला जाणीव झाली होती. प्रशासनाच्या सोयीसाठी हिंदुस्थानचे वेगवेगळ्या इलाख्यात वर्गीकरण केले गेले. १९४६ मध्ये मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळासाठी निवडणूक झाली. सातारा मतदारसंघातून यशवंतराव कायदेमंडळावर निवडून गेले. तत्काळ त्यांची गृहखात्याच्या पार्लमेंटरी बोर्डवर सेक्रेटरी म्हणून निवड झाली. या निवडीद्वारे यशवंतरांवानी मुंबई राज्याच्या जडण-घडणीत मोठे योगदान दिले. राजकीय धामधुमीच्या या काळात यशवंतरावांच्या कुटुंबावर एक आघात कोसळला. मधले बंधू गणपतराव यांचे १५ डिसेंबर १९४७ रोजी निधन झाले. थोरल्या बंधुंच्या निधनानंतर अवघ्या चारच वर्षांत दुस-या बंधुंचे निधन झाल्याने यशवंतराव दोन प्रमुख आधारस्तंभांना मुकले.
कौटुंबिक दु:खांना सामोरे जात असताना काँग्रेसची संघटनात्मक जबाबदारीही यशवंतरावांवर येऊन पडत होती. १९४८ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चिटणीस पदाची जबाबदारी यशवंतरावांवर सोपविण्यात आली. चार वर्षे काँग्रेस पक्ष वाढीची जबाबदारी निष्ठेने पार पाडली. १९५२ साली विधानसभेच्या पहिल्या निवडणुका संपन्न झाल्या. कराड मतदारसंघातून यशवंतराव विधीमंडळावर निवडून गेले. मुंबई राज्याचे नागरी पुरवठा मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. विकासाचे विविध टप्पे पाडण्यास त्यांनी याप्रसंगी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नागपूर करारावर पश्चिम महाराष्ट्राचा प्रतिनिधी या नात्याने बाजू मांडून स्वाक्षरी केली.