लोकनेते यशवंतराव चव्हाण - ९

५. महाराष्ट्राची निर्मिती व वाटचाल

१९५४ साली मुंबई राज्यात पंचायत संघाची स्थापना झाली. या दरम्यान राज्य पुनर्रचना समिती गठीत करण्यात आली होती. या समितीचे मुंबई राज्याची विभागणी करुन विदर्भासाठी स्वतंत्र राज्य करुन उर्वरित प्रदेशात मराठी व  गुजराती भाषिकाचे संयुक्त राज्य स्थापन करण्यात यावे अशी शिफारस केली. मुंबई, विदर्भ, मराठवाड्यासह 'संयुक्त महाराष्ट्र राज्य' असावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन पेटू लागले. काँग्रेस निष्ठा व्यक्त करत यशवंतरावांनी या आंदोलनाला विरोध दर्शवला. १ डिसेंबर १९५५ मध्ये सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सभेत यशवंतरावांनी घोषणा केली. "उपोषण, संप, राजीनामे हे संयुक्त महाराष्ट्र मिळविण्याचे मार्ग नव्हेत. महाराष्ट्रापेक्षा राष्ट्रहित श्रेष्ठ आहे.  मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविण्याच्या प्रयत्नांत यापुढे शंकरराव देव यांचे नेतृत्व मी स्विकारणार नाही."

संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा जोर वाढत असताना प्रवाहविरुध्द भूमिका घेण्याचे धैर्य यशवंतरावांनी दाखविले. दरम्यानच्या काळात विशाल द्विभाषिक 'मुंबई राज्य' स्थापन करावे. असा ठराव लोकसभेत मंजूर झाला. त्यानुसार १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले. वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा बहुमान यशवंतराव चव्हाणांना मिळाला. पंडित नेहरु व काँग्रेस श्रेष्ठीवरील यशवंतरावांची असणारी निष्ठा याचा योग्य सन्मान काँग्रेसकडून झाला. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर यशवंतरावांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले.  मराठी व गुजराती भाषिक प्रदेशात समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी पार पाडली.

एप्रिल १९५७ मध्ये झालेल्या मुंबई विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. आपल्या पारंपारिक कराड विधानसभा मतदारसंघातून अटीतटीच्या लढतीत यशवंतराव पुन्हा विजयी झाले. मुंबई राज्याचे दुस-यांदा मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने याकाळात गती घेतली होती. एस्. एम्. जोशी, आचार्य अत्रे, नानासाहेब गोरे आदी मंडळीनी विदर्भ, मुंबईसह 'महाराष्ट्र राज्य' व्हावे या मागणीसाठी लढा तीव्र केला होता. आंदोलनाची व्याप्ती वाढत असतानाच प्रतापगडावरील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे उद्घाटन भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या हस्ते ३० नोव्हेंबर १९५७ रोजी झाले. यशवंतरावा खंबीरपणे या प्रसंग नेहरुंसोबत राहिले. याप्रसंगीच्या आठवणी सांगताना यशवंतराव म्हणतात, 'पुण्याहून मोटारीने, मी व श्री. प्रकाशजी, पंडित नेहरुंसोबत प्रतापगडाच्या दिशेने निघालो होतो. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी वाटेत निदर्शने होणार याची कल्पना मला होती. मोटारीत मध्ये नेहरुंनी बसावे म्हणून मी तसे पंडितजींना सूचविले. माझ्या बोलण्याचा अर्थ नेहरुंच्या लक्षात आला, पण त्यांनी स्वत: कडेलाच बसणे पसंत करुन श्री प्रकाशजींना मध्ये बसविले. वाटेत निदर्शकांच्या मोर्चाला तोंड देत मोटारी प्रतापगडच्या दिशेने निघाल्या. वाटेत होणा-या निदर्शकांना नेहरु न्याहाळत होते.

शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे उद्घाटन करुन परतीच्या प्रवासात निदर्शकांच्या एका जमावाकडे पाहून नेहरु म्हणाले, "तुम्हांला गंमत सांगतो. पंजाबचे लोकही खूप संतापतात. तुमच्या मराठ्यांप्रमाणेच तोही खूप रागीट आहेत. पण कितीही रागावले तर लवकर थंड होतात. मराठ्यांचे तसे नाही.  ते रागावतात उशिरा व थंड व्हायलाही त्यांना वेळेच लागतो."