आमचे मुख्यमंत्री -८

इंग्लंडमधील अशा तेरा पंतप्रधानांच्या कारकिर्दीचे मारगॉच ह्यांनी विश्लेषण केले आहे. जर्मनीशी झालेल्या युध्दामुळे चर्चिल ह्यांचे नशीब उजळले नाहीतर त्यांच्याकडे दुर्लक्षच होत होते. जेम्स कॅलाहान हे आंतरराष्ट्री. नाणेनिधीचे सेक्रेटरी जनरल होण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु हॅरॉल्ड विल्सन निवृत्त होण्याच्या वेळी कॅलाहानचे ग्रह उंचीचे होते. तसेच मार्गारेट थॅचरबद्दल म्हणता येईल. त्यांनी योग्य वेळी एडवर्ड हीथविरुध्द लढण्याचे ठरविले. सर हेन्री कॅंपबेल बनरमन व क्लेमंट अटलीच्या बाबतीत तेच म्हणता येईल. हॅरॉल्ड विल्सन सुदैवाने ह्यू गेटस्केल अने युविन बीव्हजच्या मृत्युमुळे पंतप्रधान झाले.

असाच हात नशिबाने इतर काही व्यक्तींना दिला. स्टॅलने बाल्डविन, हॅरॉल्ड मॅकमिलन, हॅरॉल्ड विल्सन डग्लस होम ही ती उदाहरणे होत. नशिबाने हात दिल्यानंतर ज्याला लेडी लक असे म्हणतात त्याचा फायदा त्यांना झाला. पुढारीपणाच्या व्यक्तिमत्त्वाची खरी किंमत व कसोटीचे मूल्यमापन सत्ता मिळाल्यानंतरच करता येते. कारण सत्ता मिळाल्यानंतरच सत्तेचा उपयोग करता येतो. त्यावेळी धैर्य, महत्त्वाकांक्षा, सहनशीलता, दूरदृष्टी, निःस्पृहता व कुवत ह्या गुणांची कसोटी लागते.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची व्यक्तिचित्रे पाहताना वरील विधानाची सत्यता आपणास पटेल. कॉग्रेसने अधिकार ग्रहण केले नाही म्हणून श्री. धनजी कूपर मुख्यमंत्री झाले. श्री. नरिमनच्या विरुध्द असलेल्या आक्षेपामुळे श्री. बाळासाहेब खेर मुख्यमंत्री झाले. एकमताने निवड होत नसल्यामुळे श्री. मोरारजींनी द्विभाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद नाकारले व श्री. यशवंतराव चव्हाणांचे ग्रह उंचीचे ठरून ते मुख्यमंत्री झाले. त्यांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीस जावे लागले, म्हणून श्री. कन्नमवार मुख्यमंत्री झाले व ते सुध्दा विदर्भातले म्हणून. श्री. कन्नमवार अकस्मात वारल्यामुळे श्री. वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले, ते सुध्दा विदर्भातले म्हणून. श्री. वसंतरावांना श्रेष्ठींची गैरमर्जी व मराठा लॉबीचा विरोध म्हणून अर्धचंद्र मिळाला व त्यांच्या जागी मराठवाड्यातील व यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधातील म्हणून श्री. शंकररावजी चव्हाण मुख्यमंत्री झाले. श्री. शंकररावजी केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्यामुळे श्री. वसंतराव पाटील तात्पुरती व्यवस्था म्हणून मुख्यमंत्री झाले. त्यानंतर छोटीशी राज्यक्रांती करून श्री. शरद पवार पुरोगामी लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री झाले. परंतु श्रीमती इंदिरा गांधींनी त्यांचे मंत्रिमंडळ बरखास्त केले. श्री. अंतुले ह्यांचा प्रभादेवी विश्वस्त निधीने बळी घेतला, तर श्री. शिवाजीराव पाटील निलंगेकरांना मुलीच्या परीक्षेतील भानगडीमुळे जावे लागले. दैव देते परंतु कर्म नेते ही म्हण त्यांच्या बाबतीत खरी ठरली. श्री. बाबासाहेब भोसल्यांना मुख्यमंत्रिपद ही लॉटरी लागली. त्यांची नेमणूक ही तात्पुरती व्यवस्था होती. श्री. सुधाकररावांच्या मुख्यमंत्रिपदाचा बळी मुंबईतील बॉंबस्फोटाने घेतला. श्री. विलासराव देशमुख मराठवाड्यातील तिसरे मुख्यमंत्री झाले. राजकीय वनवासातून त्यांचे पुनर्वसन झाले होते. त्यामुळे ते श्रेष्ठींच्या तालावर नाचतील ह्या अपेक्षेने त्यांना त्या पदावर चढविले होते. परंतु त्यांच्या कामगिरीबाबत असमाधान व पक्षांतर्गत विरोध ह्यांमुळे त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले व आजपर्यंत प्रतिक्षाकक्षात असलेल्या सुशीलकुमार शिंद्यांच्या नशिबाने त्यांना हात दिला व त्यांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा काही काळ तरी पूर्ण झाली. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेला मराठ्यांचा प्रभाव व दबावगट ह्यांमुळे ते अडगळ ठरले व त्यांना आंध्रचे राज्यपाल म्हणून जावे लागले. दुसरा पर्यायच नसल्यामुळे विलासरावांची मुख्यमंत्रिपदावर पुन्हा स्थापना करावी लागली.