आमचे मुख्यमंत्री -३

एक वेळ असा विचार आला होता की ह्या चरित्रांना पुरवणी म्हणून आम्ही सर्व मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती घ्याव्यात. त्यांच्या कार्याचे त्यांनी केलेले मूल्यमापन नोंदवावे व त्यांच्या पुढील कार्याची माहिती करून घ्यावी. परंतु हा विचार आम्हाला सोडून द्यावा लागला. पहिले कारण म्हणजे डॉ. सुरनीस ह्यांच्या रोजच्या कामाचा व्याप व डॉ. रायरीकर ह्यांचे वय (८७). दुसरे त्यातील काहीजण निधन पावले आहेत. (धनजी कूपर, बाळासाहेब खेर, यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील) तर बाकीच्या आठजणांपैकी श्री. शरदजी पवार, श्री. अंतुले व श्री. सुशीलकुमार शिंदे केंद्रातील मंत्रिमंडळात आहेत. त्यातील दोघांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द अल्प आहे. श्री. बाबासाहेब भोसले, श्री. शिवाजीराव निलंगेकर पाटील आणि श्री. नारायण राणे ह्यांची कारकीर्द अल्पकाळच झाली. श्री. मनोहर जोशी व श्री. शरद पवार ह्यांची कारकीर्द बरीच टिकली व श्री. विलासराव देशमुख सध्या मुख्यमंत्रिपदावर आरूढ आहेत. म्हणजे फार तर दोन वा तीन मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचे कार्य त्यांच्याच शब्दांत लोकांच्या पुढे मांडता आले असते. त्याप्रमाणे मतप्रदर्शन करण्याऐवजी चरित्रे वाचून प्रत्येकाने आपल्या मुख्यमंत्र्यांचे मूल्यमापन केले तर ते योग्य ठरेल अशी आमची भूमिका आहे आणि म्हणूनच आम्ही मुलाखती घेण्याचा विचार सोडून दिला. आम्ही वस्तुस्थितीचे वर्णन कोणतेही भाष्य न करता केलेले आहे. या ठिकाणी आमची भूमिका क्रिकेटच्या खेळाचे धावते समालोचन करणा-या समालोचकाची आहे. अर्थात सर्व लेखनाची जबाबदारी आमचीच आहे.

ना. नरेंद्र तिडके ह्यांनी आपुलकीच्या भावनेने प्रस्तावना लिहून दिल्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतो.
आम्ही केलेला प्रयत्न वाचकांना आवडेल अशी अपेक्षा.

-    डॉ. बा. रं. रायरीकर
-    डॉ. श्रीनिवास सुरनीस