आमचे मुख्यमंत्री -४८

महाराष्ट्रात राजकीय बदल

ह्या काळात महाराष्ट्रात अनेक राजकीय बदल होऊन सेना-भाजपचे सरकार सत्तेवर आले. पवारांना केंद्रात वाजपेयी सरकारच्या काळात विरोधी पक्ष नेते म्हणून भूमिका स्वीकारावी लागली. पुढे सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्यावरून त्यांना कॉंग्रेसमधून निलंबित केले गेले व त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापन केली.

पवारांचे मुख्यमंत्री म्हणून कार्य

त्यांनी बहुविध क्षेत्रांत अनेक योजना आखल्या व यशस्वी केल्या.
शेती हा त्यांचा आवडता विषय. त्यांनी कमाल जमीन धारण कायद्यात शिथिलता आणली. ग्रामीण व कृषी विकासाकरता शेतक-यांना वीजदरात सवलत दिली. विकासाला उत्तेजन देण्याकरता दुधाला जास्त किंमत दिली. दुधाकरता शीतकेंद्रे उघडली. सहकारी दुग्धसंस्था स्थापण्यास उत्तेजन देऊन धवलक्रांतीचा पाया घातला. दुभती जनावरे खरेदी करण्याकरता कर्ज व अनुदान ह्यांची सोय केली. दुधाच्या खपाकरता पहिली ते चौथी पर्यंत मुलांना मोफत दूध देण्याची व्यवस्था केली.

कृषिपूरक उद्योगांना त्यांनी उत्तेजन दिले. कुक्कुटपालन, फलोद्योग ह्यानांही उत्तेजन दिले. फलोद्योगात काजू, चिकू, चिंच, सीताफळ, हापूस आंबे, विदर्भातील संत्री ह्यांचा अंतर्भाव होतो. कापूस व उसाकरता बेनार पॅटर्नचा प्रसार करून त्याकरता कर्ज, बियाणे, जंतुनाशके इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या. ग्रामीण महाराष्ट्रातील बेकारी कमी करण्यासाठी व फलोद्योगाकरता जवळजवळ दीड कोटी हेक्टर पडिक जमीन लागवडीखाली आणण्यी योजना आखली.

पाण्याकरता त्यांनी कृषिसिंचन आयोगाची स्थापना केली. कृष्णा खो-यातील पाणी उचलण्याकरता भरीव तरतूद केली. पाटबंधारे विकासावर भर दिला. उदा., गोदावरी खो-यातील मुकणेकाश्यपी पाटबंधा-याचे काम. कृष्णा खो-यात निरादेवधर, पिंपळगाव जागेश्वरी धरण व शिरसाई हा मोठा जलसिंचन प्रकल्पही शरद पवारांच्या पुढाकारामुळेच पूर्णत्वाला गेले. महाराष्ट्रातील ४० टक्के शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे त्यांनी कोरडवाहू शेतीच्या विकासावर भर दिला.

कृषिविपणन क्षेत्रात शेतक-यांना चांगला भाव मिळावा म्हणून जिल्हानिहाय सहकारी समित्या स्थापण्यास उत्तेजन दिले. एकाधिकारी गवत खरेदी योजना सुरू केली. धान्य शेतीवरील भार कमी करण्याकरता शेतक-यांची रोजगार हमीशी सांगड बांधली. ठिबक सिंचन पध्दतीचा प्रसार केला. निसर्गाचा समतोल राखण्याकरता वनीकरणाचा प्रचार केला. पाणलोट क्षेत्र विकास योजनेद्वारे पाण्याचे नियोजन करण्याचे धोरण आखले. वृक्षसंगोपन व संरक्षण योजना आखल्या. महात्मा फुले विकास मंडळाची स्थापना केली.