यानंतर सुमारें दिड माहिन्यांनी १२ मार्च रोजीं महात्मा गांधींनी दांडीयात्रा काढून सविनय कायदेभंगास प्रारंभ केला व लोकजागृतीचा झंझावात देशभर पसरविला. साबरमती आश्रमापासून सुरतेच्या समुद्राकाठचे दांडी हे ठिकाण सुमारे दोनशे मैलावर आहे. आश्रमांतून महात्मा गांधींनी १२ मार्च १९३० रोजीं दांडीस जाण्यास सुमारे ८० स्वयंसेवकासह प्रस्थान ठेविले. हा सर्व प्रवास पायीच चालू असतांना वाटेंत त्यांनी अनेक खेड्यांना व गावांना भेटी दिल्या. ही यात्रा जरी गुजराथेंत निघाली असली तरी तिनें सारा भारतदेश हलवून सोडला. परदेशी वृत्तपत्राचे बातमीदार यात्रा सुरू होणेच्या आधीच साबरमतीस जमले होते. त्यांतील कांहीं या यात्रेबरोबर होते. महात्मा गांधींनी मिठाचा कायदा मोडण्यासाठीं पदयात्रा सुरू केली. सविनय कायदेभंगाची ही मोहिम हां हां म्हणता वणव्याप्रमाणें देशभर पसरली. महात्मा गांधी दांडीस ५ एप्रिल रोजीं पोहोचल्यावर त्यांनी सरकारास रीतसर नोटीस देऊन जाहिर करून मिठाचा कायदेभंग केला. याप्रमाणें सर्व भारतभर त्यांचे अनुयायी मिठाचा कायदा मोडू लागले. धारासना, वडाळा, शिरोडा येथील मिठागरावर सत्याग्रही गटागटानें मोठया प्रमाणांत सविनय कायदेभंग करू लागले. सरकारी दडपशाही सुरू झाली. पुढारी व ठळक अनुयायी कैदखान्यांत गेले. तरी सामान्य जनांचा उत्साह सरकारी दडपशाहीला आवरता आला नाही. फार मोठ्या समुदायात संयमाची व शिस्तीची अपेक्षा व्यर्थ असते. तथापि सरकारी अत्त्याचार व दडपशाहीशी तुलना करता सन १९३० च्य़ा चळवळींत जनतेनें अभिनंदनीय अहिंसात्मक संयम पाळला. महात्मा गांधींनी अन्याय कायदे मोडायचे असे धीट पाऊल राष्ट्रास शिकविले. देशांत उत्साहाची एकच लाट उसळली. जिल्ह्याजिल्ह्यांत भारतीय काँग्रेसचे अधिकृत प्रचारक पाठविण्यात आले. आमच्या सातारा जिल्ह्यांत सोलापूरच्या डॉ. अंत्रोळीकरांची नियुक्ती झाली. त्यांच्या आगमनाबरोबर सातारा जिल्ह्यानेहि उठाव घेतला. वाईच्या प्राज्ञ पाठशाळेचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, सातारचे हणमंतशास्त्री महाजनी यांचेही प्रचार दौरे सुरू झाले.
राष्ट्रांत चालू असलेल्या उग्र आन्दोलानांत महाराष्ट्र अग्रेसर होता व त्यातले त्यांत सातारा जिल्हा आघाडीवर राहून आंतरिक तळमळीनें कार्य करीत होता. ‘जय सातारा’ ही देशभर होत असलेली घोषणा हेच त्याचे प्रतीक होय. या कालांत कराडांत असा एकही दिवस जात नव्हता कीं, ज्या दिवशी श्रीकृष्णाबाईचा घाट, शनिवार चौक अगर अन्य सार्वजनिक ठिकाणी सभा, व्याख्यानें झाली नाहींत. सभा, मिरवणूका, मोर्चे आणि घोषणा यांनी गांव दुमदुमत असे.
या सभांना नियमितपणें हजर राहून देशभक्तिची स्फूर्ती जवळपासच्या खेड्यांतील उत्साही तरुण घेत असत. मसूरचे तळमळीचे कार्यकर्ते श्री. राघुआण्णा लिमये आम्हास लाभले. श्री. राघुआण्णांची ध्येयनिष्ठा अत्यंत बळकट होती. त्यांचे कार्य विधायक स्वरुपाचे असे. पुढें पुढें तर ते प्रभावी वक्ते होऊन त्यांनी तरुण कार्यकर्त्याची बळकट संघटना निर्माण केली. खेडयापाडयांतून श्री. राघुआण्णानी धुमधडाक्यानें प्रचारकार्य सरू केले. व बहुजनसमाजांत राष्ट्रभक्तिची प्रखर ज्योत प्रज्वलीत केली.
दुर्दैवानें स्वातंत्र्यप्राप्तीनंतर श्री. रघुआण्णा मोटार अपघातांत मृत्यू पावले.
देशकार्याचे लोण खेडयापाडयांतील कानाकोप-यांत पोहोचविण्याचे कार्य करीत असतांना कित्येक खेड्यांत आम्हाला अशी कांही तेजस्वी झाकली माणके गवसली. इंदोलीचे दे. भ. दिनकरराव निकम हे एक होत. बहुजनसमाजाच्या अंतरंगांत शिरून त्यांना देशकार्याकडे वळवून आणण्याचे अत्यंत अवघड पण जरुरीचे कार्य श्री. दिनकररावांनी मनापासून केले. त्यांच्या सहाय्यामुळेंच इंदोली व आसपासच्या भागांत चळवळ सर्वत्र फोफावली.