कृष्णाकांठ६१

मी किंचित वार्ताहर असल्यामुळे ह्या सभेचा घडलेला वृतांत 'ज्ञानप्रकाश'ला देताना अध्यक्षपदासंबंधी झालेला वादही बातमीपत्रात दिला. आणि तिस-या दिवशी ज्यावेळी दैनिक 'ज्ञानप्रकाश'चा अंक आमच्या गावी आला तेव्हा त्याची सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली, कारण त्या बातमीपत्राचे शीर्षकच मुळी 'तात्यासाहेब केळकरांना अर्धे अध्यक्षपद' असे दिले होते. गावात उलटसुलट चर्चा झाली, परंतु तोपर्यंत कोण वार्ता पाठवितो, याचा सुगावा काही लोकांना लागला असावा. त्यांनी ही गोष्ट आमच्यावर उलटवावी, म्हणून एक मजेदार युक्ती केली. 'ज्ञानप्रकाश'च्या संपादकांना गौरीहर सिंहासने यांच्या नावाने पत्र लिहून 'अर्धे अध्यक्षपद दिले गेले, वगैरे सर्व चूक आहे, असे काही घडलेच नाही' असे कळविण्यात आले. 'ज्ञानप्रकाश'कारांनी दोन दिवसांनी आपल्या अंकात तेही पत्रक प्रसिद्ध केले, त्यामुळे मी काहीसा अडचणीत आल्यासारखा झालो.

आपण 'ज्ञानप्रकाश'ला खोटी माहिती लिहितो, असा त्यांचा माझ्याबद्दल समज झाला, तर ते वाईट आहे, म्हणून मी गौरीहर सिंहासने यांना भेटून त्यांनी खरेच पत्र लिहिले आहे काय, म्हणून चौकशी केली. माझी खात्री होती, की त्यांनी असे पत्र लिहिलेले नसणार. मग मी त्यांना सुचविले, की तुम्ही व मी मिळून पुण्यात जाऊन 'ज्ञानप्रकाश' च्या संपादकांना प्रत्यक्ष भेटून खुलासा केलेला बरा.

पुण्यापर्यंत आम्हां दोघांचा येण्या-जाण्याचा भाड्याचा खर्चही त्यांनी करावा व त्यांनी माझ्याबरोबर पुण्याला यावे, असे मी सुचविले. हे त्यांनी मान्य केले व एका रात्री आम्ही रेल्वेने पुण्याला निघालो. दुस-या दिवशी सकाळी पुण्याला पोहोचल्यानंतर सिंहासने यांच्या नातेवाइकांकडे आम्ही उतरलो. दहा वाजण्याच्या सुमारास 'ज्ञानप्रकाश'चे ऑफिस शोधत बाहेर पडलो.

पुण्याला या पूर्वी मी एक-दोन वेळा शाळेच्या सहलीच्या निमित्ताने आलो होतो. पुणे माहीत होते, पण पुण्याचा तपशील माहीत नव्हता. लकडी पूल ओलांडून पलीकडे गेल्यानंतर समोरच्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्याने पुढे गेलात, म्हणजे 'ज्ञानप्रकाश'चे ऑफिस लागते, असे मला अनेकांनी सांगितले. त्या पद्धतीने आम्ही 'ज्ञानप्रकाश'चे ऑफिस ज्या आर्यभूषण छापखान्यात होते, तेथे गेलो.

आम्ही एका लहान गावातली तरुण मुले एकदम संपादकांना भेटण्याची इच्छा व्यक्त करू लागलो, तेव्हा तेथल्या लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. आम्ही आग्रहच केला, म्हणून त्या लोकांनी त्यांच्या उपसंपादकांपर्यंत आम्हांला नेऊन पोहोचविले. मी त्या उपसंपादकांना माझी स्वतःची ओळख करून दिली.

'' 'ज्ञानप्रकाश'ला कराडहून बातमी पाठविणारा मी वार्ताहर आहे.'' असे मी जेव्हा त्यांना सांगितले, तेव्हा त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले.

ते म्हणाले,
''बातम्या पाठवितात, ते चव्हाण तुम्हीच काय? मला वाटले होते, की कोणी तरी मध्यमवयीन गृहस्थ असणार.''
त्यांनी त्या वादग्रस्त बातमीसंबंधी अधिक चौकशी केली, तेव्हा त्यांना मी सांगितले,
''ज्यांच्या नावाने ते खोटे पत्र प्रसिद्ध झाले होते, ते सिंहासने माझ्याबरोबर आले आहेत.''

तेव्हा ते म्हणाले,
''तुम्ही थोडे थांबा. प्रत्यक्ष संपादक श्री. काकासाहेब लिमये यांच्याशी तुमची गाठ घालून देतो.''