कृष्णाकांठ४

आमचे चव्हाणांचे मूळ गाव, खानापूर तालुक्यात ढवळेश्वर म्हणून एक छोटेसे गाव आहे, ते आहे, असे मला सांगण्यात आले आहे. माझ्या आईने मला सांगितलेली ही हकीकत आहे. ढवळेश्वरला ब-यापैकी असलेले चव्हाण कुटुंब कुणा सावकाराला दुस-याच्या एका कर्जाकरिता जामीन राहिले. त्या  सावकाराची कर्जदाराकडून फसगत झाल्यानंतर जामीनदाराचा जमीन-जुमला ताब्यात घेऊन या चव्हाण कुटुंबाची त्या गावातून मुक्तता झाली. ढवळेश्वरहून विटे जवळ, म्हणून त्या कुटुंबाने प्रथम येथे वास्तव्य केले. ही घटना कदाचित माझ्या पणजोबांच्या आधीची असली पाहिजे. विट्याला आल्यानंतर कमी पिकणारी थोडीफार जमीन त्यांनी घेऊन तीवर आपला उदरनिर्वाह चालविला होता आणि तशाच परिस्थितीत ते विट्याला राहत होते.

माझ्या आजोबांचे नाव वाघोजी चव्हाण आणि त्यांच्या वडिलांचे-म्हणजे माझ्या पणजोबांचे नाव राणोजी चव्हाण. माझ्या पणजोबांच्या वडिलांचे नाव बाळोजी व आजोबांचे नाव हिरोजी होते. इथपर्यंत माहिती माझ्या आईने मला दिलेली आहे. माझ्या आजोबांना दोन मुलगे होते : एक रामचंद्र चव्हाण व दुसरे बळवंतराव चव्हाण. थोरले चार पुस्तके शिकले असल्यामुळे शेती सोडून बेलीफ म्हणून सरकारी नोकरी करू लागले.

पुढे काही दिवसांनी, शेतीवरती भागत नाही, म्हणून त्यांनी आपल्या धाकट्या भावासाठी म्हणजे माझ्या वडिलांसाठी खटपट केली आणि त्यानांही बेलिफाची नोकरी मिळवून दिली. त्यांची नेमणूक विटे, दहिवडी, कराड अशा ठिकाणी अदलून बदलून होत असे. माझा जन्म झाला, त्यावेळी त्यांची नेमणूक कराडला होती. कराडला ते बरीच वर्षे राहिले. असे हे दोन्ही भाऊ बेलीफ म्हणून काम करत होते.

कुटुंबाची काही पार्श्वभूमी ध्यानात यावी, म्हणून मी ही हकीकत नोंदली आहे. यावरून कल्पना येईल, की माझ्या आजोबांचे घर काय किंवा वडिलांचे घर काय, हे सामान्य छोट्या शेतक-याचे घर होते आणि सामान्य शेतक-याच्या आयुष्यात वाट्याला येणा-या ज्या गोष्टी असतात, त्या सर्व आमच्याही वाट्याला आल्या होत्या. गाव सोडून नोकरीनिमित्त भटकावे, अधून-मधून शेतीकडे लक्ष देण्यासाठी गावाकडे जाऊन काही हाती येते का पाहावे, असा माझ्या वडिलांच्या जीवनाचा खाक्या होता.

माझे लहानपण हे इतर लक्षावधी गरीब घरातील मुलांच्याप्रमाणे गेले आहे. खेड्यांत राहणा-या छोट्या व गरीब शेतकऱ्यांची संख्या त्यावेळी सगळीकडे पुष्कळ होती. अशा एका कुटुंबातील मी एक, म्हणून माझ्या जीवनामध्ये इतरांपेक्षा फार काही विशेष होते, असे नाही. सर्वसामान्यतः अडचणी आणि गरिबी यालाच तेव्हा जीवन असे नाव होते, असे म्हटले, तरी चालेल. हे सर्व सांगण्याचा हेतू एवढाच आहे, की आम्ही भोगलेल्या गरिबीचे अतिरंजित वर्णन मी करू इच्छित नाही. ग्रामीण जीवनातील त्यावेळचा हा सर्वसामान्य अनुभव होता.

ब-यापैकी शेती असलेली दहा-पाच कुटुंबे, आणि व्यापारउदीम, सावकारी करणारी दहा-पाच कुटुंबे सोडली, तर बाकीच्या सर्व लोकांच्या जीवनाचा व राहणीमानाचा स्तर बहुधा एकच होता. कोणी तेली, कोणी सणगर, कोणी धनगर, कोणी मराठा असत; पण शेतकरी म्हणून दिवसभर काबाडकष्ट करावेत आणि आपले जीवन कंठावे, असेच चित्र माझ्या कल्पनेप्रमाणे, त्या वेळच्या सर्वच गावांमध्ये होते, असे म्हटले, तर अतिशयोक्ती होणार नाही.