कृष्णाकांठ१३७

मी वर्षभर काही फौजदारी खटले चालविले. माझ्या या एक वर्षाच्या मुदतीच्या दृष्टीने १९४२ सालच्या जून महिन्यापर्यंत मी महिना चार-पाचशे रुपये मिळवू लागलो होतो. घरच्या लोकांना माझी मदत होऊ लागली होती. मीही स्वत: पैसे मिळवू लागलो, याचे समाधान माझ्या मनात होते. दिवाणी दाव्यांकडेही मी थोडे-फार लक्ष दिले. पण त्यात मी काही फारशी प्रगती करू शकलो नाही. दहा-पाच किरकोळ स्वरूपाचे दावे माझ्याकडे होते. त्यांसाठी बराच वेळ कोर्टाच्या बाररूममध्ये जाऊन बसण्याची पाळी मला येत होती. बाररूममधील वकील लोक काही जुने होते, काही नवीन होते. ही चांगली माणसे होती. माझी त्यांची या पूर्वीची ओळख होती. कार्यकर्ता म्हणून माझे नाव प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या मैत्रीचा फायदा मिळत होता. पण पुष्कळ वेळा तेथे चालणा-या चर्चा ज्या पद्धतीने चालत, ते  पाहिले, तेव्हा माझ्या मनाशी विचार येऊन जाई, की जर आपले सगळे आयुष्य या वातावरणात असेच जाणार असेल, तर माझ्या ज्या आशा व आकांक्षा मनामध्ये धरून मी शिक्षण पुरे केले, ते एका अर्थाने व्यर्थ आहे. हळूहळू माझ्या मनावर निराशा पकड घेऊ लागली आणि मला हे पक्के दिसून आले, की या वकिलीच्या व्यवसायात मी कधीच रमणार नाही. माझ्या अंतर्मनात काय चालू होते, त्याचे हे दिग्दर्शन केले आहे.

अधून मधून मी इतरही कोर्टांत जाण्याचा प्रयत्न करू लागलो. कोल्हापूर संस्थानच्या वकिलीचीही मी सनद काढली होती आणि पन्हाळा तालुक्याच्या कोर्टापुढे दोन-चार फौजदारी केसेस् चालविण्याकरता मी जात असे. पंधरा दिवसांतून एखादा शनिवार-रविवार इस्लामपूरला के. डी. पाटील यांच्याकडे मी जात असे. के. डी. पाटील यांचेही माझ्यासारखेच चालले होते. पण त्यांना इस्लामपूरमधील मोठे प्रख्यात वकील श्री. रानडे यांचे सहकार्य लाभले होते. के. डीं. नी माझी आणि रानडे यांची ओळख करून दिली. अतिशय हुशार वकील, प्रकृतीने व प्रवृत्तीने धीरगंभीर, कामामध्ये यश हटकून मिळत असे. त्यामुळे पक्षकारांची त्यांच्याकडे गर्दी असे. केसची मांडणी करण्याची हातोटी उत्तम. फौजदारी खटल्यातील उलटतपासणी करण्याचे त्यांचे कौशल्य नमुनेदार होते. परंतु संध्याकाळी सातनंतर पिण्याच्या शौकामुळे त्यांची भेट बंद असे. के. डी. आणि मी श्री. रानडे यांना रविवारी दुपारी भेटत असू आणि ते मुख्यत: वकिलीच्या पेशाकरता नव्हे, तर त्यांना राजकारणामधील आमचे विचार व अनुभव ऐकावयाची इच्छा असे. त्यामुळे मी वकील म्हणून 'ज्यूनियर' असलो तरी कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्यात माझी 'सीनिऑरिटी' सर्वांनी स्वीकारलेली होती.

माझ्या वकिलीचे हे पहिले वर्ष अशा पद्धतीने गेले. या वर्षात मी काही नवे थोडे-फार शिकलो. मनुष्यस्वभाव, न्यायदानाच्या पद्धतीचे स्वरूप, पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराची अंदाधुदी, ही मी फार बारकाईने पाहून घेतली आणि माझ्या अनुभवामध्ये ही एक नवी भर पडली.

साहित्य संमेलनाशी माझे साहचर्य फार जुने आहे. या काळात म्हणजे १९४२ साली कराडला दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन मोठ्या उत्साहाने साजरे झाले. कराडच्या साहित्यिक परंपरा जुन्या आहेत. वाङ्मयीन कार्यांमध्ये भाग घेणारा एक जाणता संच कराडमध्ये तेव्हा काम करीत असे. कवी बालकृष्ण, पु. पां. गोखले, पंडित सप्रे, शंकरराव करंबेळकर, कृष्णराव सरडे, वगैरे नावे सहज डोळ्यांपुढे येतात. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सांगलीचे सुप्रसिद्ध कवी साधुदास होते. महाराष्ट्रातील काही सुप्रसिद्ध साहित्यिक व विद्वान या संमेलनास अगत्याने आले होते. माझी वाङ्मयीन विषयांची ओळख तर चांगली होतीच, पण साहित्यिक क्षेत्रामध्ये चाललेल्या चळवळींची माहिती करून घेण्याचा मला छंद होता. वेगवेगळ्या ठिकाणी भरलेल्या साहित्य संमेलनांची वर्णने मी रस घेऊन वाचत असे व त्या क्षेत्रातील काम व माणसे यांच्याबद्दल कुतूहल व आदर असे. यामुळे कराडमध्ये भरलेल्या संमेलनामध्ये मी क्रियाशील होऊन भाग घेतला. या संमेलनामध्ये दोन परिसंवाद योजले होते. एका परिसंवादाचे अध्यक्षपद प्रसिद्ध विद्वान व भाषाशास्त्रज्ञ श्री. कृ. पां. कुलकर्णी यांच्याकडे होते व दुस-या परिसंवादाचे अध्यक्षपद मजकडे होते. माझ्या आठवणीप्रमाणे या परिसंवादाचा विषय 'बहुजनसमाज व साहित्य' असा होता. दोन्ही परिसंवाद चांगलेच रंगले. आमचा परिसंवाद तर फारच सुरेख झाला. माझे अध्यक्षीय समारोपाचे भाषण मी व्यासंगपूर्ण असे केले. माझे हे भाषण श्री. कृ. पां. कुलकर्णी यांना फार आवडले. तसे त्यांनी मला सांगितलेही. मी हे सर्व विसरून गेलो होतो. पण परवा कृ. पां. चे आत्मचरित्र 'कृष्णाकाठची माती' चाळत होतो तेव्हा त्यांनी या परिसंवादाचा मोठा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे, हे जेव्हा मी पाहिले, तेव्हा आठवण ताजी झाली आणि आनंद झाला.