कृष्णाकांठ१३४

अलाहाबादच्या बैठकीनंतर गांधीजींच्याकडे देशातल्या नेत्यांची एकसारखी रीघ लागली. 'हरिजन'मध्ये त्यांचे प्रसिद्ध होणारे लेख वाचून राष्ट्रीय दर्ज्याचे नेते हादरून गेले होते. त्यामुळे ही सर्व मंडळी त्यांचे मन आणि मत जाणून घेण्यासाठी वर्ध्याला जात होती.

या चर्चेनंतर वर्ध्याला जुलैमध्ये वर्किंग कमिटीची बैठक घ्यावी, असे ठरले. त्याप्रमाणे जुलै महिन्यात वर्किंग कमिटीची बैठक वर्ध्यास झाली. या खेपेला गांधीजींनी वर्किंग कमिटीच्या बैठकीला हजर राहण्याचा निर्णय घेतला आणि वर्किंग कमिटीच्या चर्चांमध्ये पहिल्यापासून अखेरपर्यंत भाग घेतला. या चर्चेतून जो वर्किंग कमिटीने ठराव पास केला, तो ठराव अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक स्वरूपाचा झाला. हिंदुस्थानमधून ब्रिटिशांनी माघार घ्यावी आणि ती तातडीने घ्यावी, अशी आपली भूमिका गांधीजींनी स्पष्ट केली आणि इतर सर्व नेत्यांनाही ती भूमिका मान्य करावी लागली.

गांधीजींची ही भूमिका होती, की ब्रिटीशांची सत्ता हिंदुस्थानांतून गेल्यानंतर सुद्धा अहिंसेचे तत्त्व सोडावयाचे नाही, याही गोष्टीवर त्यांनी भर दिला. जागतिक लोकशाहीमध्ये गैरसमज होऊ नये, ही जी चिंता नेहरूंना लागली होती, त्याची काळजी घेईल, अशा तऱ्हेने शब्दरचना ठरावात करण्यात येऊन काँग्रेसमध्ये फूट पडण्याचे संकट वाटत होते, ते टळले आणि तो ठराव एकमताने पास केला.

अलाहाबाद ते वर्धा हा मतभेदाचा आणि विचार-संघर्षाचा प्रवास होता. लोकशाही पद्धतीने होणारी चर्चा आणि नेते मंडळींना परस्परांबद्दल असणारा वैयक्तिक आदरभाव, प्रत्येकाची आपापल्या विचारातील प्रामाणिक निष्ठा, यामुळे याला संघर्षाचे स्वरूप यावेळी आले नाही. एकमेकाच्या वैचारिक देवाणघेवाणीमुळेच ठराव एकमताने पास होऊ शकला.

पुढे ७ ऑगस्टला मुंबईला 'छोडो भारत'चा ठराव पास होणार होता. या ऐतिहासिक निर्णयाचा शुभारंभ हा वर्ध्याच्या सभेत झाला, म्हणून वर्ध्याची ही सभा फार महत्त्वाची आहे. गांधीजींचा हा मोठा राजकीय विजय होता.

गांधीजींच्या मनामध्ये जनआंदोलनाचा निश्चित कार्यक्रम काय असावा, यासंबंधाने नेते मंडळींनी चौकशी केली, पण तेव्हा गांधीजींनी स्पष्ट कल्पना दिली नाही. परंतु त्यांचा एक विचार स्पष्ट होता, की जर इंग्रज सत्तेने बेपर्वाई दाखवून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा तिरस्कार केला, तर त्यांच्याशी संपूर्ण असहकार केल्याशिवाय दुसरा मार्गच राहिला नाही. ही भावना त्यांनी बोलून दाखविली. कार्यक्रम त्यातून हळूहळू निघेल, असेही त्यांनी बोलून दाखविले.

वर्ध्याचा हा निकाल झाल्यानंतर सगळ्या देशभर एक नवे वातावरण निर्माण झाले आणि आम्ही आमच्या जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते एकमेकांशी चर्चा करून भवितव्यात घडणा-या जनसंग्रामाची चर्चा करू लागलो.

परंतु याच्या आधी आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये एक महत्त्वाची घटना घडली होती. या सगळ्या राजकीय चर्चा, आंदोलने वगैरे गोष्टी चालू असताना हे सर्व समजून घेण्यात मी काहीसा व्यग्र होतो. परंतु माझ्या आईचा माझ्या लग्नासाठी पाठीमागे असलेला आग्रह काही कमी झाला नव्हता. आईचा विजय झाला, आणि मी शेवटी लग्नास तयार झालो. फलटण येथील कै. रघुनाथराव मोरे यांची कन्या वेणूबाई हे स्थळ मला सांगून आले होते. मी त्यांना कबूल केले, की मुलगी जर सातारला आणली, तर मी साता-याला जाऊन तिला पाहीन. मे महिन्याच्या सुरुवातीस ठरल्याप्रमाणे मी मुलगी पाहिली.

वधू-पसंतीचा माझा एक दृष्टिकोन होता. माझ्या घरात आणि विशेषत: माझ्या आईशी जमवून घेईल, अशा संस्कारांतील मुलगी पाहिजे, अशी माझी धारणा होती. कै. रघुनाथराव मोरे हे फलटणचे असले, तरी त्यांचा परिवार मुंबईत राहत असे. एक वर्षापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. बडोदे राजघराण्याच्या खाजगी खात्यामध्ये ते महत्त्वाचे गृहस्थ होते. त्यांची फलटणला उत्तम शेती होती, वर्षातून दोन महिने आपल्या गावी जाऊन तेथील घरंदाज संस्कार मुलींना मिळतील, याची ते काळजी घेत असत. मोरे परिवाराची ही पार्श्वभूमी होती.