''मला माहीत आहे अक्का; पण माझं सौभाग्यच आज माझ्यासोबत नाही.'' मी.
माझे डोळे पाण्यानं डबडबून आले. मी हुंदका दिला. मला सोनूताईनं पोटाशी धरलं. माझी समजूत काढू लागल्या.
''काही काळजी करू नको. भाऊजी सुरक्षित असतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही.''
मधली जाऊ भागीरथी मला येऊन बिलगली आणि हमसून हमसून रडू लागली. रडत रडतच म्हणाली, 'ही कसली संक्रांत ? माझे हे तुरुंगात आणि धाकल्या भावजीचाही पत्ता नाही.''
मी तिला जवळ घेतलं. स्वतःला सावरलं. आम्ही तिघी वाण देण्यासाठी जाण्याची तयारी करीत होतो. सूर्य माथ्यावर आला होता. आमची तयारी होण्याची लगबग चालू होती तोच दरवाजासमोर पोलिसांचा जथ्था दिसला. त्यापैकी एक जण माझी चौकशी करू लागला. थोरल्या जाऊबाई त्यांना सामोर्या गेल्या.
म्हणाल्या, ''काय काम आहे तुमचं ? कशासाठी येथे आलात ?''
तो पोलिस सावकाश म्हणाला, ''आम्ही वेणूबाईला अटक करण्यासाठी आलो आहोत.''
थोरल्या जाऊबाई गोंधळून गेल्या. काय करावं त्यांना काही सुचेना. आई घरात नाही. मुलांचे वडील आईसोबत बाजारात गेलेले. त्यांची ही अवस्था पाहून मी समोर आले आणि म्हणाले,
''मी वेणूबाई, मला अटक करायची आहे का ?''
''होय, तसा आदेश आहे सरकारचा.'' पोलिस.
''कोण सरकार ? आम्ही मानीत नाही या सरकारला.'' मी.
''मला तर सरकारच्या आदेशाचं पालन करावं लागेल.'' पोलिस.
आमच्या घराभोवती पोलिसांचा वेढा पडलेला. बाहेर बघ्याची गर्दी जमलेली. आईपर्यंत ही बातमी पोहोचली. आई धावतच घरी आल्या. बाहेरूनच पोलिसांवर चवताळल्या.
म्हणाल्या, ''खबरदार ! माझ्या सुनेला हात लावाल तर... तिने तुमचा काय गुन्हा केला ? हिंमत असेल तर माझ्या यशवंताला पकडून दाखवा ! चालते व्हा माझ्या घरातून !''
तोपर्यंत ज्ञानोबा घरी येऊन पोहोचले. त्यांनी आईची समजूत काढली. मी, आई, माझ्या जावा, भाये व भांबावलेली चार नातवंडं एकमेकांकडं असहाय भावनेनं पाहू लागलो. मी मनाची तयारी केली. सोबत चार कपडे घेतले. आई आणि भायांचं दर्शन घेतलं. भारतमातेच्या मुक्ततेसाठी साहेबांनी जी पाऊलवाट चोखाळली त्या पाऊलवाटेवर मी निघाले. सप्तपदीचा अर्थ हाच असावा. स्त्री दाक्षिण्याला सरकारनं तिलांजली दिली.