थोरले साहेब - २२८

साहेब, आपण या संमेलनात म्हणाला, 'आपण हिंमत हरायला नको.  कवींनी युद्धकाळात रचना केल्या.  त्यामुळं जनतेचं व सैन्याचं मनोबल वाढलं.... त्याबद्दल मी कवीचे आभार मानतो.'  आणि भाषणाचा शेवट तुम्ही जो केला तो असा - 'अगर चीन चीन है, तो भारत प्राचीन है !'

हे वाक्य ऐकून सार्‍या सभेत विजेचा कडकडाट झाल्याचा क्षणभर भास झाला.  साहेब, तुम्ही सभा जिंकली.  दिल्लीतील जनतेच्या व साहित्यिकांच्या मनःपटलावर तुम्ही विराजमान झालात.  

स्वतः अटलजी स्तंभित झाले आणि त्यांनी तुमच्या बाबतीत म्हटलं, 'मला नंतर कळलं की, यशवंतराव एक रसज्ञ आहेत म्हणून !  त्यांच्या देहामध्ये एक रसिक हृदय धडकत आहे.  त्याचबरोबर राष्ट्राच्या नाडीवर आपला हात आहे हे त्यांनी सिद्ध केलं.'

दिल्लीला शाहीर साबळे यांच्या कार्यक्रमाला आपण गेलात.  'दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र' या ओळी सुरू व्हायला आणि आपला प्रेक्षागृहात प्रवेश हा योगायोग घडला.  टाळ्यांच्या कडकडाटात आपलं स्वागत झालं.  

साहेब, आपण यशाचा एक-एक किल्ला काबीज करीत निघालात.  या यशस्वी किल्ल्याच्या बुरुजाखाली सुरुंग पेरण्याचं काम दिल्ली पद्धतशीर करीत आहे याची चाहूल आपणास लागली नसावी.  देशप्रेमानं भारावलेलं आपलं मन भविष्यकाळाच्या आकाशात उंच उंच भरार्‍या मारू लागलं; पण परिस्थितीचा बाण नुसता चाटून जरी गेला तरी क्षणात धरतीवर यावं लागतं याकडं आपलं दुर्लक्ष झालं.  हा परिस्थितीचा बाण चोरपावलानं आपलं सावज जाळ्यात गाठण्याचा प्रयत्‍न करू लागला.  देशाचं संरक्षण करून देशाची मान जगात उंचाविली तुम्ही...

साहेब, आपण जगाच्या पातळीवर चर्चिले जाऊ लागले.  दिल्लीचे वारे आपल्याभोवती धुके निर्माण करू लागले.  या धुक्यांना दूर करण्याचा प्रयत्‍न आपण आपल्या परीनं करीत होता.  त्यात तुम्हाला यशही येताना दिसत होतं.  जयप्रकाशजी खाजगीत बोलून गेले, 'हो सकता है यशवंतरावजी ऍटली जैसे अच्छे पंतप्रधान बने.'

आता दिल्लीच्या वार्‍यांनी चक्रीवादळाचं रूप धारण कलं.  साहेब, तुम्ही या चक्रीवादळात सापडलात.  चक्रव्यूह छेदण्याचं कसब आपण वापरून त्यात यशस्वी झाला.  पण हे चक्रीवादळ आपणासाठी नवखं होतं.

साहेब, या दिल्लीनं तुम्हालाच खेळवलं असं नाही तर तुम्ही ज्यांचे वारसदार आहात त्या सर्व सह्याद्रीपुत्रांना खेळवलं.  याला इतिहास साक्षी आहे.  ज्यानं दिल्लीश्वराच्या नाकीनऊ आणले त्या शिवाजी महाराजांना या दिल्लीनं कैद केलं.  महाराजांच्या सैन्यानं अटकेपार झेंडे लावले; पण दिल्लीवर ते झेंडा फडकवू शकले नाहीत.  महादजी बाबा शिंदेंनी दिल्ली काबीज केली; पण मोगलाच्या वंशाला मांडीवर घेऊन सिंहासनावर बसलेत.  इथेही दिल्लीनं तुमच्या पूर्वजांना हुलकावणी दिली.  हा इतिहास पाहता दिल्ली तुम्हाला न्याय देईल असं वाटत नव्हतं; पण तुम्ही लोकशाही राजकारणातले सर्व अंदाज खोटे ठरवून तुमच्या यशाचा सूर्य दिल्लीवर तळपत ठेवला.