साहेबांना ५ डिसेंबर १९६२ ला पहाटे पहाटे पालम विमानतळावर पोहोचायचे. डोंगरे यांना याची कल्पना होती. त्यांनी साहेबांच्या प्रवासाची सारी तयारी केली. संरक्षणमंत्री म्हणून साहेब प्रथमच नेहरूजींसोबत आसाम सीमेलगतच्या भागाला भेट देण्यासाठी जाताहेत. पराभवानंतर प्रथमच पंतप्रधान व संरक्षणमंत्री सीमेवरील सैनिकांना भेटणार आहेत. साहेब ठरलेल्या वेळेला पालम विमानतळावर पोहोचले. थोड्याच वेळात नेहरूजी व त्यांच्यासोबत इंदिराजी विमानतळावर पोहोचल्या.
गुवाहाटीहून तेजपूरला जाण्यासाठी नेहरूजी आणि साहेब निघाले. त्यांच्यासोबत इंदिराजी आहेत. तेजपूर हे ब्रह्मपुत्रेच्या तटावर वसलेलं गाव. सीमेलगत संरक्षणदृष्ट्या ते अतिमहत्त्वाचं ठाणं. तेजपूरला उतरताच लेफ्ट. जनरल माणेकशा या उमद्या अधिकार्यानं नेहरूजी व साहेबांचं स्वागत केलं. माणेकशांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वानं, आत्मविश्वासानं साहेबांना प्रभावित केलं. लष्कराची शिस्त असावी ती माणेकशांसारखी. जनरल चौधरी व लेफ्ट. जनरल एल. पी. सेन हे दोघे या वेळी तेजपूरला जातीनं हजर होते.
नेहरूजी व साहेब यांनी मिसामारी येथील लष्करी इस्पितळाला भेट देण्याचं ठरवलं. लढता लढता जखमी झालेले सैनिक, बर्फाच्या थंडीत थिजलेल्या जखमांवर उपचार घेत असलेले सैनिक यांना प्रत्यक्ष देशाचे पंतप्रधान व संरक्षणमंत्री भेटावयास येत आहेत यावर त्यांचा विश्वासच बसेना. नेहरूजी व साहेब प्रत्येक जखमी जवानाची जातीनं विचारपूस करू लागले. येथे एक हृदयद्रावक घडना घडली. एका जखमी सैनिकाजवळ जाऊन हे दोघे विचारपूस करीत असताना त्या सैनिकांनी आपली हतबलता व्यक्त केली.
तो सैनिक म्हणाला, ''मी किती कमनशिबी आहे... माझे पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री मला भेटायला आले असताना मी त्यांना सॅल्युट करू शकत नाही...''
तो सैनिक अश्रु ढाळू लागला. कारण त्याचा एक हात युद्धात कामी आला होता. पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री क्षणभर भावनावश झाले; पण राजानं आपल्या डोळ्यात अश्रू आणायचे नसतात याची जाण या लोकशाहीतील राजांना होती. टेकड्याजवळील सैनिकांना भेटताना त्यांच्यातील ईर्षा, जिद्द आणि आत्मविश्वास उचंबळून वाहत होता. शत्रूला मुहतोड जवाब देण्याची त्यांची तयारी होती. आपले नवीन संरक्षणमंत्री शिवाजी महाराजांच्या वंशाचे आहेत याची कल्पना सैनिकांना आली होती. ते 'हर हर महादेव' व 'छत्रपती शिवाजी महाराजां'चा जयजयकार करताहेत. साहेबांचा ऊर भरून येतोय. माणेकशांच्या प्रभावानं ही भेट भारावलेली होती.
दिवस मावळतीकडे झुकलेला. चौथ्या कोअर छावणीत अतिमहत्त्वाच्या नकाशा खोलीजवळ नेहरूजी आणि साहेब पोहोचले. सोबत लष्करी अधिकारी आणि इंदिराजी. मुलकी अधिकारी आपली आब राखून त्या खोलीपर्यंत पोहोचले. नेहरूजी आणि साहेब लष्करी अधिकार्यासोबत खोलीत शिरले. त्यामागोमाग इंदिराजी जाऊ लागल्या. माणेकशा खोलीच्या दरवाजावर उभे होते. इंदिराजी खोलीत प्रवेश करणार तोच माणेकशांनी इंदिराजींना अडवले.
म्हणाले, ''मॅडम, मला अतिखेदानं तुम्हाला सांगावं लागतंय... तुम्हाला या खोलीत जाता येणार नाही. कारण आपण गुप्ततेची शपथ घेतलेली नाही.''