थोरले साहेब - १७६

साहेबांच्या या चपराकीनं पटनाईकांच्या डोळ्यांवरील झापडं किलकिली झाली.  महाराष्ट्राचं हे पाणी काही वेगळं आहे अशी मनाची समजूत घालून पटनाईक हे साहेबांनी दिलेला झटका सोबत घेऊन आपल्या निवासस्थानाकडे निघाले.

दिल्लीत पाय ठेवल्यापासून एकामागून एक आघात झेलत साहेब निद्रेच्या हवाली होण्याकरिता मनाची तयारी करीत असतानाच पुन्हा दूरध्वरी खणखणू लागला.  शंकेची पाल साहेबांच्या मनात चुकचुकली.  चीनकडून एखादी नवीन खेळी खेळली की काय, असा विचार करीत असताना साहेबांनी फोन उचलला.  तिकडून परिचित आवाज कानावर आदळला,

''मी पीटीआयचा प्रतिनिधी बोलतोय.''

तो प्रतिनिधी आत्मविश्वासानं सांगत होता, ''चीननं युद्धसमाप्‍ती जाहीर केली आहे अन् तीही एकतर्फी.''

दिल्लीत पाय ठेवल्यापासून जे धक्के बसत होते त्यात हा धक्का उत्साहवर्धक होता.  साहेबांना क्षणभर असं वाटलं यावर आपण काही हालचाली कराव्या का ?  पण आपण घोषित संरक्षणमंत्री आहोत.  अजून आपला शपथविधी व्हायचा आहे.  साहेबांचं संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत येणं संरक्षणाच्या दृष्टीनं सुचिन्ह ठरलं.  या आनंदात साहेबांनी स्वतःला निद्रेच्या स्वाधीन केलं.

साहेब सकाळी उठले ते एक संकल्प मनात ठरवून.  संरक्षणाच्या क्षेत्रात देशाची जी मानहानी झाली ती मानहानी आपल्याला भरून काढावयाची आहे या इराद्याने.  कॅबिनेट सचिव खेरा साहेबांना शपथविधीकरिता राष्ट्रपती भवनाकडे घेऊन जाण्याकरिता ठीक नऊ वाजता हजर झाले.  नेहरूजी, त्यांचे मंत्रिमंडळातील सर्व मंत्री राष्ट्रपती भवनात हजर आहेत.  राष्ट्रपती राधाकृष्णन प्रफुल्लित दिसताहेत.  राष्ट्रपती भवनाच्या रिवाजाप्रमाणे शपथविधी पार पडला.  शपथविधी पार पडल्यानंतर नेहरूजी व साहेब साऊथ ब्लॉकमधील संरक्षणमंत्र्याच्या कार्यालयाकडे निघाले.  नेहरूजी साहेबांसोबत संरक्षणमंत्र्याच्या कार्यालयात आले.  या घडीला नेहरूजी संरक्षणमंत्री म्हणून कारभार पाहत होते.  साहेबांना संरक्षणमंत्र्याच्या खुर्चीवर स्वतः नेहरूजींनी बसवलं.  संरक्षणमंत्र्याची सूत्रं विधिवत नेहरूजींनी साहेबांच्या हवाली केली.  या वेळी लष्करप्रमुख जनरल जे. एन. चौधरी, नौदलप्रमुख व्हाईस ऍडमिरल सोमण, वायुसेनाप्रमुख एअर माश्रल ए. एम. इंजिनियर हे लष्करी गणवेशात हजर आहेत.  नेहरूजींनी साहेबांचा सर्वांशी परिचय करून दिला.  ११ वाजता आपल्याला संसदेत जावयाचे आहे याची आठवण देऊन नेहरूजी आपल्या कार्यालयात गेले.  

साहेबांना सोबत घेऊन ठीक ११ वाजता नेहरूजींनी संसदेच्या सभागृहात प्रवेश केला.  सभागृह व प्रेक्षक गॅलर्‍या खच्चून भरलेल्या होत्या.  नवीन संरक्षणमंत्री सर्वांच्या कुतूहलाचा विषय होता.  नेहरूजींसोबत साहेबांनी सभागृहात प्रवेश करताच स्वपक्षीय व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी साहेबांचे हर्षोल्हासात स्वागत केले.  सभापती सरदार हुकूमसिंग जागेवर येऊन बसले.  कामकाज सुरू करण्याचा इशारा करताच नेहरूजी उठले.

म्हणाले, ''सभापतीजी, माझे व या देशाचे नवीन संरक्षणमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांची मी सभागृहात ओळख करून देत आहे.''

साहेब उठले आणि सभापतीच्या आसनाकडे गेले.  साहेब सभापतीच्या आसनाकडे जात असताना उत्स्फूर्तपणे सर्व सभागृह टाळ्या वाजवून साहेबांचे स्वागत करत होते.  सभापती सरदार हुकूमसिंग उठून उभे राहिले.  त्यांनी साहेबांच्या हातात हात मिळवला.