हुकूमसिंग म्हणाले, ''या सभागृहानं मोठ्या अभिमानानं मनापासून आपलं स्वागत केलं आहे. मी स्वतः माझ्या वतीनं तुमचं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो.''
साहेब आपल्या जागेवर येऊन बसताच माजी संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांनी साहेबांजवळ येऊन त्यांचं अभिनंदन केलं.
साहेब आपल्या कार्यालयात संसदभवनातून आले तेव्हा तीन वाजायला काही मिनिटे बाकी होती. साहेब खोलीत येऊन आपल्या खुर्चीवर बसले. खोलीची टापटीप पाहून खूश झाले. श्रीपाद डोंगरे आणि जोशींनी प्रधानाच्या मदतीने ही स्वच्छता केली असावी. घड्याळाच्या काट्यानं तीन वाजल्याचा ठोका देताच तीनही सेनाप्रमुख साहेबांच्या खोलीत प्रवेशकरते झाले. संरक्षण खात्याचे सचिव राव साहेबांना अहवाल देण्यासाठी आले. तासभर गोपनीय बैठक होऊन सर्व अधिकारी व सेनाप्रमुख कार्यालयातून बाहेर पडले.
दिल्लीत साहेबांचा मुक्काम तात्पुरता '१८, अकबर रोड' या कोठीत होता. १, रेसकोर्स रोडवरचा बंगला तयार होईपर्यंत साहेबांनी १८, अकबर रोड येथे राहणे पसंत केले.
पी. व्ही. आर. राव यांनी साहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. साहेबांनी राव यांना तत्काळ वेळ दिली. दोघांशिवाय त्यांच्या खोलीत कुणीच नव्हते.
पी. व्ही. आर. राव साहेबांना म्हणाले, ''सर, मला टी. टी. के. च्या अर्थसमन्वय खात्यातून संरक्षण खात्यात बदललं आहे. आपली याला मान्यता न घेता हा निर्णय घेण्यात आला याची मला कल्पना आहे. संरक्षण खात्यातील आजची आणीबाणीची परिस्थिती पाहता संरक्षणमंत्र्यांना त्यांनी निवडलेल्या सचिवाची आवश्यकता असते असं माझं मत आहे. आपल्या मनात असा कुणी दुसरा अधिकारी असल्यास आपण त्यांची निवड करावी. मी माझी व्यवस्था दुसरीकडे करून घेण्याचा प्रयत्न करील.''
साहेब पी. व्ही. आर. रावकडे पाहून हसले.
म्हणाले, ''मी तुमच्या मताशी सहमत आहे. मी माझ्या पसंतीच्या अधिकार्याची निवड केली आहे आणि तो अधिकारी आहे पी. व्ही. आर. राव.''
साहेबांनी टाकलेला विश्वास पी. व्ही. आर. राव यांनी सार्थ करून दाखवला. युद्धबंदीच्या बातम्या सीमेवरून येऊन धडकत होत्या. या एकतर्फी युद्धबंदीबद्दल, चीनच्या नवीन चालीबद्दल अर्थ लावण्यात सर्व संरक्षण खातं मग्न होतं. साहेबांचा सकाळी ९ वाजता सुरू झालेला दिवस ताणतणावात गेला. संपूर्ण दिवस चीनच्या नव्या खेळीच्या कारवाईभोवती फिरत होता. उत्तर सापडत नव्हतं. साहेब रात्री हा विचार डोक्यात घेऊन १, रेसकोर्स रोडवरच्या बंगल्यावर पोहोचले.
१, रेसकोर्स रोडवरचा बंगला देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला. पुढे २२ वर्षे या बंगल्याकडे देश मोठ्या आशेनं पाहतोय. साहेब या बंगल्यात राहावयास आले.