मराठी मातीचे वैभव- ७८

खरे म्हणजे खेड्यात जन्मलेला एका सामान्य शेतक-याचा मुलगा भारताच्या उपपंतप्रधानपदापर्यंत चढतो यातच त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त सामर्थ्याची प्रचिती येते.  मात्र उच्चपदावर पोहोचल्यावरसुद्धा सामान्यातल्या सामान्य व गरिबातल्या गरीब माणसांना ते कधी विसरले नाहीत यातच यशवंतरावांचे खरे मोठेपण आहे.  एखादा किंमती अलंकार हस्तिदंती कड्यात सुरक्षितपणे ठेवावा त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला मोठं केलं.  ज्यांनी आपल्यासाठी त्याग केला, जे संकटकाळी सहाय्याला धावून आले त्यांच्या आठवणी यशवंतरावांनी अत्यंत निष्ठेने आपल्या अंतःकरणात जपून ठेवल्या.  राजकारण असो, समाजकारण असो, साहित्य असो की कलेचे क्षेत्र असो जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत त्यांची रसिकता प्रत्यही दिसून आली.  यशवंतरावांचं जीवन म्हणजे सर्जनतेचे मूर्तिमंत प्रतीक.  आपल्याजवळच्या अभिजात गुणचुंबक वृत्तीने आपल्या जीवनात त्यांनी असंख्य माणसे जोडली, लहानाची मोठी केली, त्यांना अंधारातून प्रकाशाकडे आईच्या ममतेने बोट धरून नेलं.  भारत हा देश गुणांनी, कर्तृत्वाने आणि सामर्थ्याने मोठा व्हावा यासाठी सामान्यातील असामान्यत्व जागे करून संघटितपणे प्रवाही केले.  या महापुरुषाजवळ अनेक सद्गुणांचे व अभिरुचींचे सम्मेलन भरले होते.  विघटनाऐवजी संघटन, संघर्षाऐवजी समन्वय हे यशवंतरावांच्या जीवनाचे सूत्र होते.  अनेक गैरसमजांचे हलाहल त्यांनी पचवले,  मर्मभेदक टीकेचे प्रहार त्यांनी सहन केले,  संकटांचे आघात सोसाले, पण आपला ताल व तोल त्यांनी कधी ढळू दिला नाही.  यशवंतराव राजकारणी होते हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते.  राजकारण त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय मानले होते.  पण त्याहीपेक्षा यशवंतराव हे माणूस म्हणून फार मोठे होते आणि यातच त्यांचे वेगळेपण सामावलेले आहे.  यशवंतराव ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती होती.  अनेक लोकोत्तर सद्गुणांचा असामान्य कर्तृत्वाचा त्यांच्या ठिकाणी चिरंतन संचय झालेला होता.  त्यांचे प्रगल्भ आणि मानवतेनं नटलेलं व्यक्तिमत्त्व राजकारणाप्रमाणेच समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांना जाणीवपूर्वक स्पर्श करीत राहिले.

यशवंतराव म्हणजे एक माणूसवेडा माणूस.  राजकारणाच्या पटावर वावरतानासुद्धा ते माणुसकी कधी विसरले नाहीत.  निवडणुका तोंडावर असतानासुद्धा विरोधी उमेदवाराच्या पाठीराख्यांनी आपल्याला येऊन मिळावे ही कल्पनासुद्धा यशवंतरावांनी निषिद्ध मानली.  यशवंतरावांचे राजकारण भक्तियुक्त राजकारण होते.  राजकारण समाजजीवनापासून तुटू नये यासाठी ते अनेक वेळा धडपडत राहिले.  राजकारण व समाजकारण ही एकाच जीवनाची दोन अंगे आहेत हा विचाराचा धागा त्यांनी कधी सोडला नाही.  आपल्या आयुष्यात त्यांनी माणुसकीला खूप जपले.  एका गोष्टीची त्यांनी सतत जाणीव ठेवली ती म्हणजे शब्द हे शस्त्र आहे.  कोणाचा द्वेष करावा हे त्यांच्या रक्तातच नव्हते.  शत्रूवरसुद्धा त्यांनी आयुष्यात प्रेमच केलं. माणसं तोडण्यापेक्षा जोडण्यातच आयुष्य वेचलं.  राजकारणाबाहेरच्या लोकांचे विचार ऐकण्यात यशवंतरावांनी कधी कंटाळा केला नाही.  यशवंतरावांना विद्वान माणसे तर प्रिय होतीच पण विद्वानांपेक्षाही एखादा सामान्य अडाणी माणूस हा त्यांना अधिक आवडत असे.  श्रीमंतांपेक्षाही गरीब माणसांकडे त्यांचे लक्ष अधिक होते.  निष्कपट प्रेमाचे दर्शन त्यांनी स्वतःच्या वागणुकीतून कित्येकदा घडवलेले आहे.  त्यांचा असा सिद्धान्त होता की निष्कपट प्रेम करायला शिकणं हे समाजावर, राष्ट्रावर प्रेम करायला शिकण्याची पहिली पायरी आहे.  अडाणी शेतकरी, विद्वान शास्त्रीपंडित, आधुनिक सुधारक किंवा सनातनी, इंग्रजी शिकलेले किंवा न शिकलेले तरुणतरुणी, महिला, कलावंत, व्यापारी, नोकरदार, डॉक्टर, इंजिनिअर, राजकारणी, मुत्सद्दी, साहित्यिक, अर्थतज्ज्ञ, समाजधुरीण यांपैकी कोणाशीही बोलायचे असो यशवंतराव हे त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलत.  त्यामुळे प्रत्येकजण त्यांचे म्हणणे प्रसन्नपणाने ऐकत असे.  राष्ट्रप्रेमाचं, देशभक्तीचं आणि कार्यकर्त्यांच्या वागणुकीचं स्पष्टीकरण करताना तर त्यांच्या वाणीला स्फुरण चढे.  उत्तम प्रकारचे दृष्टान्त ते सहजपणाने बोलून जात असत.  देशाचे, पक्षाचे श्रेष्ठत्व व महत्त्व वर्णन करताना तर त्यांची वाणी खूपच तेजस्वी आणि गंभीर बनत असे.  भाषा सोपी, वाक्ये लहान, कृत्रिमतेचा अभावा यामुळे त्यांचे बोलणे ऐकणा-याच्या हृदयाशी जाऊन भिडे.  जीवनाचे अनंत नमुने त्यांनी पाहिलेले असल्याने सामान्याची सुखदुःखे, त्याच्या भावना, वासना आणि अडचणी याची त्यांना पूर्णपणे कल्पना होती.  त्यामुळे सामान्यांच्या जीवनाचे, त्यांच्या अवस्थांचे ते जेव्हा वास्तव बोलू लागत तेव्हा त्यांची भाषा अंतःकरणाचा ठाव घेत असे व ऐकणारा त्यांचा होऊन जात असे.  त्यांच्या वाणीचा आणखी एक विशेष गुण म्हणजे त्यांच्या मुखातून कधीही अपशब्द बाहेर पडत नसे.  स्वतःचा बडेजाव इतरांपुढे कधीच कथन करीत नसत.  यशवंतराव मत्सराने, द्वेषाने पेटलेले आहेत असे त्यांच्या जिभेने कधी दाखवले नाही.  त्यांनी राग, लोभ, मद, मत्सर गिळला होता.  संयमाने या सर्व विकारांना त्यांनी योग्य असे वळण लावले होते.  जर असे नसते तर दुस-यांची मनसोक्त स्तुती त्यांच्या मुखातून प्रकट होणे शक्यच नव्हते.  कुणी एखादे हलके-सलके सामान्य काम केलेले असो त्याची प्रशंसा करून त्याला अधिक काम करण्याला उत्तेजन देण्याची वृत्ती निरहंकारी माणसाच्या ठिकाणीच असू शकते.  विविध विचारांच्या कर्तृत्वाच्या माणसांचा सहवास हा यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यास पुष्कळच उपयुक्त ठरला.  वृत्ती शांत व गंभीर राखून आपल्या कार्यक्षेत्रात अनेक कर्त्या माणसांना त्यांनी सामावून घेतलं.  शुद्ध विचारांचाच त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.  अनेकांनी त्यांच्यावर टीका केली, शिवीगाळ केली, हेत्वारोप केले, दगडफेक केली तरी लोकनेत्यास आवश्यक असलेली मनाची शांतता त्यांनी किंचितही ढळू दिली नाही.