भाई माधवराव बागल यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत चव्हाणांवर विरोधाच्या तोफा डागल्या, पण बागल नंतर चव्हणांचे खरेखुरे स्नेही बनले. चव्हाणांचे ते मुक्तकंठाने कौतुक करू लागले. याचा अर्थ ॠणानुबंध टिकविणे, वाढविणे हा त्यांचा सहज स्वभाव होता. राजकारणाला त्यामुळे स्नेहल स्वरूप आले. चांगला माणूस मोठा असतो पण मोठा माणूस हा चांगला असतोच असे नाही. यशवंतराव मोठे होते. चांगले होते. त्यामुळेच प्रतिस्पर्धी त्यांच्याकडे विश्वासाने पाहू शकत आणि विरोधक त्यांच्याबद्दल आदराने बोलत. राज्यापाल लतीफ म्हणून की यशवंतराव चव्हाण प्रशासनातील निर्णय नेहमी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घेत. प्रखर टीकेला दिपून, घाईने किंवा स्वस्त लोकप्रियता वाढविणारे निर्णय त्यांनी कधीच घेतले नाहीत आणि पोकळ आश्वासने देऊन ते मोकळे झाले नाहीत. त्वरित निर्णय घेण्याची कुवत, ते अमलात आणण्याची धडाडी व कौशल्य, कामाचा उरक, योजकता व कल्पकता ही त्यांच्या दूरदर्शी राजकारणाची, कारभाराची खूणच होती. योग्य तेच प्रेमाने सांगण्याची हतोटी यामुळे शासक या नात्याने ते लोकप्रिय झाले. असे म्हटले जाते की जोपर्यंत राजकारणाची सूत्रे त्यांच्याकडे होती तोपर्यंत राजकारणात सौंदर्य होते, साहित्य होते, संस्कृती होती, शान होती, शहाणपण होते, पुरोगामित्व होते. पण राजकारणच त्यांनी सर्वस्व मानले नाही. त्यांनी राजकारण जन्मभर केले पण राजकारणातील उर्मटपणाचा आडदांडपणाचा त्यांना कधीही स्पर्श झाला नाही. हा प्रत्येकाचा विचार आहे, कारण आपल्या भूमिकेत त्यांनी कधीही शिवराळपणा आणला नाही. ते गेले व रुजुता, सौजन्यशीलता, सुसंस्कारितता यांनी फुललेला, डवरलेला हा महाकाय वृक्ष कोसळला व राजकारणाचे सारे पठार रखरखीत व भकास झाले.
अपार देशभक्तीचे गडद संस्कार व देशका-याचे सतीचे बाण त्यांनी लहानपणापासूनच घेतलेले होते त्यामुळे यशवंतराव चव्हाणांनी सत्ताकारण हेच सर्वस्व असे कधीच मानले नाही. लहानपणी टिळक हायस्कूलच्या आवारात कुठलीही तमा न बाळगता तिरंगा झेंडा लिंबाच्या झाडावर लावणारे यशवंतराव, येरवडा येथे अठरा महिने आचार्य भागवतांबरोबर तुरुंगात कठोर शिक्षा भोगणारे यशवंतराव, १९४६ साली नाना पाटलांबरोबर सहकार्य करून पत्री सरकारचे नेतृत्व करणारे यशवंतराव, सत्यशोधक मंडळी स्वातंत्र्याच्या कुर्बानीबद्दल का बोलत नाहीत असा खडा सवाल टाकणारे यशवंतराव, जतींद्रनाथ व भगतसिंग यांच्या अन्नसत्याग्रहाने तळमळून छातीभर पाण्यातून गावात वृत्तपत्र वाचण्यासाठी धावणारे यशवंतराव व त्यांच्या मृत्यूमुळे आपलेच कोणी आप्त गेले आहे या जाणिवेने व्याकुळ होऊन गावी अंधारात रडत स्पुंफ्दत जाणारे यशवंतराव पुढील राजकारण ध्येयवादीच करणार यात शंकाच नव्हती. त्यांची समाजवादावरची श्रद्धा, सामान्य माणसावरचा विश्वास व सत्तेची कल्पना यांत पावित्र्य व प्रतिष्ठा यामुळेच जाणवते. यशवंतराव केवळ व्यक्ती न राहता सामान्य जनांची शक्ती बनले ते यामुळेच. तावून सुलाखून निघण्याच्या या प्रक्रियेतूनच त्यांना वैचारिक बळ प्राप्त झाले. त्यासाठी लोकमताच्या विरोधी जाण्याचेही धाडस त्यांनी दाखविले. लोकमताच्या विरोधी जाण्यासाठी विचाराचे बळ पक्के असावे लागते आणि त्यावर अविचल व ठाम राहावे लागते. अर्थात लोकमताचे स्वरूप त्यांनी कधीच दृष्टीआड केले नाही, त्याला कमी लेखले नाही किंवा त्याला अवाजवी महत्त्वही दिले नाही. खरे तर लोकांच्या मनाचा अंदाज घेण्याचे अजोड कौशल्य त्यांच्याकडे होते. स्वतःविरुद्ध त्यांनी बहुमताचा आदर केला याची पुष्कळ उदाहरणे देता येतील. १९७४-७५ साली शंकरराव चव्हाण यांना मुख्य मंत्रिपदाबाबतीत त्यांनी संमती दिली. आपल्या विरुद्धही मत मांडावे असा विश्वास त्यांनी इतरांना दिला व लोकशाहीतील आदर्श नेत्याची स्वप्रतिमा कष्टाने उभारली. वास्तविक लोकांच्या गराड्यात व सहवासात, नियमितपणा विस्कळीत झाला होता. लोक झोपू देतील तेव्हाच झोपावे. त्यांच्यातून वेळ मिळेल तेव्हाच जेवण करावे. पण भेटीसाठी, मुलाखती, चर्चा, सभा, संमेलने, दौरे, संघटनेच्या बैठकी, शिष्टमंडळाच्या भेटी, फायलींचे ढीग यांना ते कधी कंटाळले नाहीत. महाराष्ट्रातील सर्व स्तरांतील लोकांना यशवंतराव आधारस्थान वाटे. लोकांत मिसळताना स्वतःभोवती कोणत्याही भिंती त्यांनी उभ्या केल्या नाहीत. त्यामुळे ते सर्व थरांत आपलेसे झाले. लोकमतापुढे नमणारे यशवंतराव लोकशाहीचे मूर्तिमंत प्रतीक होते. सांगली येथे भाषण करताना एकदा ते म्हणाले, ''संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न मी सोडविलेला नाही. महाराष्ट्रातील चार कोटी लोकांचे ते श्रेय आहे. मी म्हणजे जनतेच्या दुधावरची साय आहे, दूधच नसेल तर साय कुठून येणार ?'' एक खरे की संयुक्त महाराष्ट्रनिर्मितीचे श्रेय सामान्य जनतेच्या उग्र चळवळीला, शौर्याला व त्यागाला दिले पाहिजे. आता लोकांची इच्छा हाच खरा लोकशाहीचा आधार हे बोलायला ठीक आहे, पण त्या वेळी सामान्य जनता व दिल्लीतले सत्ताधारी यांत फार मोठी दरी निर्माण झाली होती. लोकांच्या अपेक्षेचे भान त्यांना नसल्यामुळे बेजबाबदार लोकांची चळवळ असा शिक्का त्यांनी मारला. पण यशवंतरावांच्या कुशल मुत्सद्देगिरीची जोड मिळाली व संयुक्त महाराष्ट्र तीव्र गतीने अस्तित्वात आला हेही खरेच. द्वैभाषिक राज्याचा मुख्यमंत्री होणे ही यशवंतरावांची कृती जनतेला पसंत नव्हती, पण द्वैभाषिक राबवता येणे किती अशक्य आहे हे मुख्यमंत्री होऊन त्यांनी पं. नेहरूंना दाखविले व नेहरूंची गैरसमजाची भिंत ढासळली. हा यशवंतरावांच्या चतुर मुत्सद्दीपणाचा, दूरदृष्टीचा, धीम्या धोरणाचा व आत्मविश्वासाचा प्रभाव होता, हे प्रा. ना. सी. फडके यांचे मत योग्यच आहे. लोकमताला आवश्यक तेव्हा फटकारून लोकांच्याच हिताचे निर्णय घेण्याचे कौशल्य यशवंतरावांनी दाखविले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांना खूप त्रास, मनस्ताप झाला पण त्यांतून धीरोदात्तपणे, शांतपणे, विरोधकांचा राग शमवीत, लोकांना आपलेसे करीत समंजसपणाने पण सन्मानाने त्यांनी मार्ग काढला.