१६ यशवंतराव चव्हाण : महाराष्ट्राचा अलौकिक ठेवा
प्रा. कृ. दि. बोराळकर
कोणत्याही प्रदेशाचे वेगळेपण हे तेथील कर्तबगार व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वावर अवलंबून असते. त्यांचे अस्तित्व किंवा आठवणसुद्धा त्या प्रदेशातील लोकांचा अमोल ठेवा असतो, अभिमानाचा वारसा असतो. यशवंतराव चव्हाणांच्या रूपात महाराष्ट्राने भारताला फार मोठी देणगी दिली. त्यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली हे वाक्य कधी नसेल इतके खरे झाले. शाहूमहाराज, ज्योतिराव फुले, लो. टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या कर्मनिष्ठांच्या परंपरेत यशवंतराव वाढले. स्वतःला जाणीवपूर्वक त्यांनी जोपासले. आघाडीवरील युद्धनायक जसा सर्वच आघाड्यांवर लढून यश संपादन करतो तसेच यश अत्यंत अवघड असूनही एकाच वेळी अनेक आघाड्यांवर यशस्वीपणे लढणारे ते एक लोकोत्तर यशवंत नेते होते. शिवाजी महाराज आणि लो. टिळक यांचे अपवार सोडता एवढा सर्वस्पर्धी, लोकजीवन व्यापून टाकणारा नेता महाराष्ट्राने पाहिला नाही हे निर्विवाद आहे. कृष्णेच्या कुशीत आणि क-हाडच्या मातीत यशवंतराव लहानाचे मोठे झाले. अवघ्या महाराष्ट्राचे भूषण बनले. सातारा तसा वैचारिक परंपरेसाठी फारसा प्रसिद्ध नव्हता. वैचारिक चिंतनाची बैठक इथे कधी प्रखरतेने जाणवली नाही, तरीपण यशवंतरावांनी वैचारिक परिवर्तनाचे एक नवे पर्व सुसंस्कृत राजकारणाचा आधार घेत घेत प्रस्थापित केले. त्यांच्या यशस्वी जीवनाचे श्रेय त्यांच्या वक्तृत्वशैलीत होते. शब्दांची अचूक फेक करणारे ते एक उत्तम संसदपटू होते. जनमानसावर प्रभुत्व प्राप्त करून देणा-या वाणी व लेखणी या दोन अमोघ शक्ती आहेत, ह्याची त्यांना पूर्ण जाणीव होती, म्हणून तर बोलण्यात जेवढा खंबीरपणा तेवढाच जिव्हाळा आणि प्रेमळपणा ते ठेवीत. जनतेशी संवाद साधण्याची एक अलौकिक कला त्यांनी साध्य केली होती. टिपणे न घेता मुद्देसूद बोलणे, मोठा आशय वेचक शब्दात सांगणे, सूक्ष्म दृष्टीचा मूलभूत मुद्दा मांडून लोकांना विचार करावयास लावणे, वक्तृत्वात पांडित्य न आणता सहजता टिकविणे, बोलताना आत्मीयतेने इतरांशी केलेली हितगूज वाटावी असे बोलणे ही त्यांची स्वतःची वैशिष्टये होती. ते जेथे जातील तेथे लोकांना व कार्यकर्त्यांना जिंकीत. त्यांची व्याख्याने भावनात्मक आवाहनाने भरलेली असत. शब्दांची वारेमाप उधळपट्टी त्यांना मान्यच नव्हती. जिभेवर संयम ठेवून काळजीपूर्वक बोलणारे ते उत्तम संसदपटू होते. ज्याचा आपण उच्चार करतो ते प्रत्यक्षात आले पाहिजे यावर यशवंतराव चव्हाणांचा कटाक्ष असे. यासाठी थोडे व आवश्यक एवढेच ते बोलत. त्यांच्या भाषणात पुनरुक्ती असे. विचार नेहमीच स्वतंत्र, नवे व विचारांना चालना देणारे असत. कित्येकदा तर प्रत्येक वाक्य जणू काही एक सूत्रच वाटे. हजारो लोकांची विराट सभा असो की निवडक शेदोनशे लोकांची बैठक असो भावनांना आवाहन करून ती जिंकण्याचं हमखास कौशल्य त्यांच्यात होतं. त्यांचा पडलेला लेख व फसलेले भाषण ऐकिवातच नाही, म्हणूनच महाराष्ट्राच्या नामांकित वक्तयांत त्यांची गणना केली जाते. आत्मीयतेने प्रत्येकाशी केलेले हितगूज, आपल्या माणसाशी केलेला विचारविनिमय असे त्यांचे वक्तृत्व लोकांना कायमचे आपलेसे करीत असे.
लोकशाहीतील नेत्याची भूमिका ही शिक्षकासारखी असावी लागते. तशी ती त्यांनी ठेवली होती. जात कितीही वाईट असली तरी जातीच्या विचाराशिवाय भारतीय राजकारणाचा विचार होऊच शकत नाही ही येथील राजकारणाची शोकांतिका त्यांनी चांगल्या प्रकारे ओळखली होती, म्हणून १९६० साली सांगली येथे भाषण करताना ते म्हणाले होते की, जातीय वादाच्या विषारी विचारांपासून आपण महाराष्ट्राला मुक्त केले पाहिजे. सामाजिक मन एकसंध करून भंगलेली मने जोडण्यासाठी जातीयवाद हद्दपार होणे जरुरी होते. म्हणून हे राज्य मराठ्यांचे की मराठीचे यावर भाष्य करताना त्यांनी ठासून हे सांगितले की हे राज्य मराठी जनतेचेच राज्य राहील. इथे गुणांचीच पूजा होईल. जातीची नव्हे. नवसमाज निर्मितीत समतेचे महत्त्व त्यांनी ओळखले होते म्हणून सामाजिक विषमतेचा वारसा नष्ट केला पाहिजे. ते म्हणत की आपला एकमेकांवर हक्क आहे, कारण आपण अनेक शतके एकत्र राहिलो आहोत. सामाजिक ऐक्यातूनच राष्ट्राचे ऐक्य निर्माण होते. ते म्हणत आमचा इतिहास हा आक्रमणाचा आणि पराभवाचा इतिहास आहे. पराक्रम व शौय असूनही आम्ही हरलो, कारण आम्ही भारतीय म्हणून लढलो नाहीत. जातीयवादाने नष्ट केलेली देशाची एकात्मता आजही देशासमोरील एक गंभीर प्रश्न आहे, असे यशवंतरावांना वाटे. त्यामुळे सर्व जातिजमातींना त्यांनी आपलेसे केले. त्यांनी जसा रामोशी, हरिजन व तत्सम पददलितांना सहाय्याचा हात दिला त्याचप्रमाणे वेदसंपन्न ब्राह्मणांचा सत्कारही केला. सर्व थरांतील माणसे वर आणण्यासाठी त्यांनी सहकारी क्षेत्र निवडले. यशवंतराव स्वतःच एवढे उदारमतवादी व सुसंस्कृत मनाचे होते की त्यांना धर्मभेदाचा, जातीयवादाचा आणि त्यांतून येणा-या हेव्यादाव्यांचा कधीही स्पर्श झाला नाही. संकुचित ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादापासून ते शेकडो योजने दूर होते. तो वाद गाडून टाकण्याचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यांना जसा कर्मवीर भाऊराव पाटील व ज्योतिबा फुल्यांबद्दल आदरभाव होता तशीच लो. टिळक, ना. गोखले, आगरकर यांच्याबद्दलही मनात अपार श्रद्धा होती. खरोखर हे तर महाराष्ट्राचे भाग्यच की महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या जडणघडणीत यशवंतरावजींसारखा सहिष्णू व उदारमतवादी नेता महाराष्ट्रास लाभला. त्यांच्या अभावी महाराष्ट्राचे जनजीवन जातीयवादाने उद्ध्वस्त झाले असते व महाराष्ट्राचा मद्रास किंवा बिहार झाला असता, हे १९४८ च्या जळीत प्रकरणाने दाखवून दिले. कारण गांधीवधोत्तर झालेल्या जाळपोळीत त्यांनी ब्राह्मण वस्त्यांचे निग्रहाने संरक्षण केले व त्या वेळच्या आर्थिक नीतीत हे बसत नसले तरी त्यांनी ब्राह्मणांची कर्जे माफ केली. पानशेत प्रकरणी स. गो. बर्वे यांना पुण्याच्या हद्दीत मुख्यमंत्र्याचे अधिकार देऊन टाकले. खरेच लो. टिळकांनंतर लोकांनी फक्त यशवंतराव चव्हाणांवरच प्रेम केले. ते गेले व महाराष्ट्राचा सूर्यच मावळला. इतिहासाचे एक सोनेरी पान उलटले गेले.