भाषावार प्रांतरचनेची आवश्यकता असो, खेड्यांच्या विकासाचा प्रश्न असो किंवा परकीयांच्या आक्रमणापासून देशाच्या संरक्षणाचे महत्त्व विशद करण्याचा प्रश्न असो अगदी काही क्षणांतच यशवंतराव सहज बोलता बोलता श्रोत्यांचे मन जिंकून घेत असत, आणि ऐकतच राहावे असे वाटत असताना आपले व्याख्यान संपवीत असत. यासाठी पुरावा म्हणून शेकडो उदाहरणे देता येतील. ती सारी उदाहरणे नमूद करण्याचे हे स्थळ नव्हे. परंतु समंजसपणे, संथपणे, दमदारपणे, कुठलीही आक्रस्ताळी भूमिका न घेता, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उदबोधक विचार देऊ शकणारा आणि मुलायम शब्दात सोप्या नि सुटसुटीत भाषेत तो विचार श्रोत्यांच्या गळी उतरवणारा, बुद्धिमतापासून आपल्या खेड्याबाहेरचे जग न पाहिलेल्या दरिद्री, अशिक्षित, अडाणी माणसांपर्यंत सगळ्यांचीच मने जिंकून घेणारा दुसरा पुढारी झालाच नाही, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.
जनमानसावर प्रभुत्व गाजवणा-या लेखणी आणि वाणी या दोन महान शक्ती यशवंतरावांनी आत्मसात केल्या होत्या. नेता आणि शासनकर्ता अशी जोड भूमिका यशवंतरावांना एकाच वेळी करायची असल्याने त्यांच्या वाणीचा विकास नित्य होत राहिला. त्या मानाने त्यांचं लेखन तुरळक घडत असे. परंतु जेव्हा जेव्हा ते लेखणी उचलत तेव्हा तेव्हा अशा काही उत्कृष्ट दर्जाचं साहित्य त्यांची लेखणी निर्माण करून जाई की वाचकांनी थक्क होऊन जावं. १९६४ साली 'सह्याद्रि' दिवाळी अंकात त्यांनी 'शांति-चितेचे भस्म' या मथळ्याचा जो लेख लिहिला आहे, तो केवळ अविस्मरणीय म्हणावा लागेल. 'कृष्णाकाठ' या आत्मचरित्रातील प्रांजळ निवेदन आणि प्रत्येक आठवण नोंदवण्यामागील अपरिहार्य प्रयोजन त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलेले आहे, त्यावरून त्यांची लेखणीही त्यांच्या वक्तृत्वाला साजेशीच होती, हे लक्षात येईल. डौलदार शैलीत ज्यांना बोलता येते त्यांना तसे लिहिता येतेच असे नाही. पण बोलणे आणि लिहिणे या दोन्ही कलांत सारखीच वाकबगारी मिळवलेला व त्यास एक वैचारिक अधिष्ठान देणारा वक्ता केवळ यशवंतरावांच्यामध्येच आढळत असे.
यशवंतरावांच्या स्वभावात चिडचिड किंवा आक्रस्ताळेपणा कधीच नव्हता. मनमोकळे हास्य हा त्यांच्या निर्मळ स्वभावाचा एक देखणा पैलू होता. राजकारणातील अनेक वादळांना पचवून टाकून हसत हसत समस्या सोपी करणे आणि तोल न जाऊ देता अंगावर पडलेली जबाबदारी संयमाने, कौशल्याने पेलण्यासाठी सदा सज्ज राहणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं दुर्मिळ वैशिष्ट्य म्हणून नमूद करावं लागेल. महाराष्ट्राचं नेतृत्व सोडून देशाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी जेव्हा त्यांनी स्वीकारली तेव्हा त्या कसोटीच्या क्षणी सुद्धा यशवंतराव सर्वार्थानं यशस्वी झाले. कारण यशासाठी पुरुषार्थाची प्रेरणा निर्माण करणं हे त्यांनाच जमणं शक्य होतं. एक रसिले, उमदे आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून नेहरूंच्यानंतर त्यांचाच उल्लेख केला जात असे. आयुष्याच्या उत्तरार्धात राजकारणाचे डावपेच चुकले असतील, सत्तास्पर्धेतील तडजोडी करण्यात काही हुकले असेल किंवा अशा अष्टपैलू समृद्ध नेतृत्वाचा स्वीकार हा सत्तेतील सूत्रधारांना एक अडचणीचाही भाग वाटला असेल, पण महाराष्ट्राने ज्याच्यावर नितान्त प्रेम केले व मराठी माणसावरही ज्याने निरतिशय प्रेम केले आणि सत्तेच्या राजकारणात राहूनही देशभरात ज्यांनी 'जवळिकीची सरोवरे' निर्माण केली, अशा यशवंतराव चव्हाणांची याद आधुनिक महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास लिहिणा-या प्रत्येकाला आवर्जून ठेवावीच लागेल. हे 'सह्याद्रीचे वारे' 'युगांतर' घडवीत, 'ॠणानुबंध' जोडीत, 'कृष्णाकाठ' उजळीत 'सागरतीरा' वरून 'यमुनाकाठ' च्या दिशेने झेपावत असतानाच अकस्मात चंद्राला खळे पडले.

 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
			 
									 
			