मराठी मातीचे वैभव- ६७

सभोवतालचे निराशाजनक वातावरण पाहून आशेच्या किरणासाठी यशवंतरावजी शिक्षणक्षेत्राकडे मोठ्या आपेक्षेने पाहात होते.  मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो.  केंद्रस्थानी संरक्षणमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि अर्थमंत्री या नात्यांनी प्रदीर्घ काळ काम करण्याची संधी मला मिळाली.  पण शिक्षणमंत्री होण्याची संधी मात्र मला मिळाली नाही, अशी खंत त्यांनी दोन वर्षांपूर्वी एका समारंभात व्यक्त केली होती.  अलीकडे शिक्षणासंबंधीचे त्यांचे विचार पुन्हा ऐकायला मिळत होते.  त्यांनी शिक्षणाविषयीचा आपला आशावाद कधीही ढळू दिला नाही.  ''कारण शिक्षणाविषीची निराशा ही भविष्याविषयीची निराशा होय.''३४  असे त्यांचे मत होते.   उलट ध्येयवादी शिक्षणसंस्था ह्या आपल्याला समाजक्रांतीचे रसायन प्राप्त करून देतील, अशी त्यांची श्रद्धा होती.३५  माणसाच्या मनात ध्येयवाद पेटविण्याचे, त्याच्या मनात सामर्थ्य निर्माण करण्याचे आणि त्याला कार्यप्रवृत्त करण्याचे काम शिक्षण हे चांगल्या प्रकारे करू शकते, या गोष्टींवर त्यांचा विश्वास होता.

चव्हाणसाहेबांचे शिक्षणविषयक विचार हे केवळ 'अकॅडेमिक' स्वरूपाचे नव्हते, ही गोष्ट मात्र आपण लक्षात घेतली पाहिजे.  महाराष्ट्र राज्याची धुरा त्यांनी सुरुवातीच्या काळात सांभाळली.  ती सांभाळीत असताना त्याच्या जडणघडणीचा पायाच त्यांनी घातला असे म्हणता येईल.  केंद्रशासनातही अनेक वर्षे ते सत्तेवर होते, आणि म्हणून त्यांच्या विचारांना कमीअधिक प्रमाणात मूर्तरूप मिळे शकले.  महाराष्ट्र राज्याचे धोरण निश्चित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, म्हणून तर त्यांच्या विचारांना प्रत्यक्ष का-याची जोड मिळू शकली.  महाराष्ट्रात शिक्षणप्रसाराचे कार्य प्रचंड प्रमाणात वाढले आहे.  त्याच्यामागे यशवंतरावांच्या विचारांच्या प्रेरणा निश्चितच आहेत.  विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागांचे शैक्षणिक एकसूत्रीकरण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाले.  ऐतिहासिक कारणांमुळे मराठी संस्कृतीचे माहेरघर असलेला मराठवाडा मागे पडला होता.  तो उर्वरित महाराष्ट्राबरोबर यावा म्हणून मराठवाडा विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली.  शिवाजी विद्यापीठाची स्थापनाही त्यांच्याच प्रेरणेने झाली.  ग्रामीण महाराष्ट्राच्या अस्मितेचा आविष्कार दोन्हीही विद्यापीठांच्या रूपाने झाला.  आज महाराष्ट्रात महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणाचा विस्तारही प्रचंड प्रमाणात होतो आहे.  त्यामागेही यशवंतरावजींच्या प्रेरणा आहेत.  आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील (इ.बी.सी.) मुलामुलींना शैक्षणिक शुल्कात पूर्णतः सूट देण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.  महाराष्ट्रातील लाखो मुला-मुलींना त्याचा फायदा मिळाला.  नवबौद्धांना धर्मांतराची बाब पुढे करून शिष्यवृत्त्या आणि आरक्षणापासून त्यांनी वंचित होऊ दिले नाही.  ज्या कृषिऔद्योगिक समाजाचे स्वप्न त्यांनी पाहिले त्याला साकार करण्यासाठी पुढे महाराष्ट्रात चार कृषिविद्यापीठांची स्थापना झाली.  सत्तेचे विकेंद्रीकरण, सहकारी चळवळीतून उभे राहिलेले उद्योगीकरण आणि शेतीविकासाच्या विविध योजना, या सर्वांचा शिक्षणप्रसारावर अनुकूल परिणाम झाला, ही गोष्ट नाकारता येत नाही.  वस्तुतः या सर्व गोष्टी आणि घडामोडींच्या संदर्भातच यशवंतरावजींच्या शैक्षणिक विचाराचा व कार्याचा मागोवा घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक घडामोडींशी स्व. यशवंतराव चव्हाणांनी सातत्याने संपर्क ठेवला होता.  त्या घडामोडींना योग्य दिशा व वळण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.  त्यांच्या प्रेरणेने अनेक संस्था महाराष्ट्रात जन्माला आल्या.  ब-याच शिक्षणसंस्थांनी व महाविद्यालयांनी त्यांचेच नाव धारण केले.  'यशवंत' हे प्रतिपच्चंद्रापरी वाढणा-या एका 'औक्षवंत' लोकनेत्याचे नाव होते आणि हे 'नाव' महाराष्ट्राचे 'विशेषण' ठरले.  यशवंतरावांनी निरनिराळ्या क्षेत्रांतील संस्थांशी आणि व्यक्तींशी सत संपर्क ठेवला.  शिक्षणक्षेत्रात याला अपवाद नव्हते.  त्यांच्या 'ॠणानुबंधा'त शिक्षणक्षेत्रातील व्यक्तीही होत्या.  शिक्षणक्षेत्रातील अंतःप्रवाहाची त्यांना जाण होती.  टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अनेक वर्षे ते कुलपती होते.  कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मृत्यूनंतर रयत शिक्षण संस्थेकडे पालकाच्या जिव्हाळ्याने ते पाहात होते.  तिचे ते अध्यक्ष होते.  कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षणक्षेत्रातील 'क्रुसेडर' (Crusader) होते.  रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्रात वटवृक्षाचे रूप धारण केले.  या वटवृक्षाची मुळं व फांद्या सर्व महाराष्ट्रभर पसरल्या.  ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा घेऊन जाणा-या भगीरथाकडे यशवंतरावजी आदराच्या दृष्टीने पाहात होते.  रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षस्थानी असणे ही गोष्ट त्यांना व संस्था या दोघांनाही भूषणावह होती.

शैक्षणिक क्षेत्रात सतत प्रयोगशीलता येत राहावी अशी त्यांची अपेक्षा होती.  महाराष्ट्र शासनाने खासगी संस्थांना तंत्रनिकेतने आणि अभियांत्रिकी महाविद्यालये काढू देण्याचा निर्णय घेतला तेव्हा यशवंतरावांनी त्याचे एक क्रांतिकारक पाऊल म्हणून स्वागत केले.  त्याच्यातून बरेच गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असतानाही त्यांनी या निर्णयाचे समर्थन केले.  तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे आणि ती भागविण्यासाठी फार मोठ्या धाडशी प्रयत्नांची गरज आहे, असे त्यांना वाटत होते.  विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण भारताला सुजलाम-सुफलाम् करू शकू असा त्यांचा विश्वास होता.  शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे या गोष्टीवर त्यांचा दृढ विश्वास होता.  बदलत्या परिस्थितीची दखल घेत घेत शैक्षणिक परिवर्तन घडविता आले तर समाजपरिवर्तनाची प्रक्रिया अधिक गतिशील होऊ शकेल असे त्यांचे मत होते.  शिक्षण हे शेवटी राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय विकासाचे प्रभावी माध्यम ठरले पाहिजे या गोष्टीवर त्यांचा विशेष कटाक्ष होता.
---------------------------------------------
३४.  'समाजाभिमुख शिक्षण' भूमिका, पृ. १६२-६३.
३५.  'समाजक्रांतीचे रसायन', युगांतर, पृ. १५८-१६२.
-----------------------------------------------------------