११ कृषि-औद्योगिक क्रांतीचे शिल्पकार : यशवंतराव चव्हाण
श्री. अण्णासाहेब शिंदे
गेल्या दीडशे वर्षांत विशेषतः इंग्रजांचे राज्य भारतात सुस्थिर झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक थोर ऐतिहासिक पुरुष जन्माला आले आणि आपापल्या परीने आणि आपल्या कर्तबगारीने महाराष्ट्रातील व देशातील सामाजिक, आर्थिक अगर राजकीय जीवनावर कायमचा ठसा ठेवून गेले.  या सर्वांत थोर म्हणून महात्मा जोतिबा फुले, नामदार गोखले आणि लोकमान्य टिळक यांचा उल्लेख करता येईल.  नामदार गोखले यांना तर महात्मा गांधींनीसुद्धा आपले गुरू मानले होते.  महात्मा फुले यांचा सामाजिक समतेचा दृष्टिकोण, शोषित आणि दलितांविषयीचे प्रेम, आणि ग्रामीण जीवनाविषयीची आत्मीयता, लोकमान्य टिळक यांची जाज्वल्य देशभक्ती आणि नामदार गोखले यांचा उदारमतवाद अशा महाराष्ट्रातील तीनही थोर परंपरांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे कार्य यशवंतराव चव्हाण यांनी केले.
यशवंतरावांनी व्यवहारी आणि राजकारणी म्हणून जीवनात अनेक प्रश्नांवर तडजोडी केल्या. तथापि जाज्वल्य राष्ट्रभक्ती आणि पुरोगामी सामाजिक दृष्टिकोण याबाबत त्यांनी जीवनात कधीच तडजोड केली नाही. महाराष्ट्राच्या जीवनावर चिरंतन स्वरूपाचा ठसा उमटवून यशवंतरावांनी इहलोकीचा प्रवास संपविला.
समाजाच्या सर्व थरांतील असंख्य सहका-यांचे, कार्यकर्त्यांचे अपार व्यक्तिगत प्रेम यशवंतरावांनी संपादन केले. महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांना ते पहिल्या नावाने ओळखत असत. यशवंतरावांच्या चालत्या काळात त्यांचे संघटनाकौशल्य हे कुणाही राजकीय नेत्याला हेवा वाटेल असेच होते. लक्षावधी ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींनी आणि कार्यकर्त्यांनी यशवंतरावांवर प्रेम केले. असे सदभाग्य राजकीय नेत्याच्या वाट्याला क्वचितच येते. ग्रामीण भागातील अगदी सामान्य कुटुंबात जन्म घेऊन ते लोकप्रियतेच्या शिखरावरही चढले. जीवनात अनेक चढउतार त्यांनी पाहिले. शिखरावर चढण्यापूर्वी कठोर अशा दिव्यातून त्यांना प्रवास करावा लागला. भारतातील भिन्न सामाजिक घटकांचे संबंध कसे जोडावेत, त्यांची जडणघडण कशी करावी याबाबत तर त्यांचा हातखंडाच होता. केंद्र आणि राज्यसंबंध, पक्षांतर्गत लोकशाही, सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे महत्त्व, भारतासारख्या मागासलेल्या देशासाठी बळकट लोकशाही संस्थांची सर्व पातळीवरील उभारणी, ग्रामीण जीवनाचे प्रश्न इत्यादी सर्व बाबतींत यशवंतरावांची स्वतःची अशी काही मते होती. पक्षातील व पक्षाबाहेरील मतभेद असलेल्या मंडळींशीही काही मूलभूत मानवी मूल्यांचा आणि लोकशाही मूल्यांचा आधार घेऊनच वागलं पाहिजे यासंबंधी त्यांनी काही संकेत मनाशी ठरविले होते. साध्य आणि साधन यासंबंधीच्या गांधीवादी विचारांचा प्रभावही यशवंतरावांच्या मनावर होता. ते उदारमतवादी आणि लोकशाही मूल्यांवर निष्ठा असलेले नेते होते. यशवंतरावांच्या ध्येयनिष्ठा आणि जीवननिष्ठा यामुळेच त्यांना जीवनात राजकीय संकटांना तोंड-देण्याची पाळी आली. कधी कधी जिवलग मित्रमंडळीकडूनही त्यांना टीकेचे घाव सोसावे लागले. यशवंतरावांनी अनेक कार्यकर्त्यांना मोठे करण्याचा प्रयत्न केला. प्रकाशझोतात आणले. उच्चाधिकार पदे मिळवून देण्यासही मदत केली. परंतु अशा मंडळींनाही यशवंतरावांच्या जीवनातील दृष्टिकोण नीटपणे समजू शकत नाही. अशा मंडळींपैकी काहीजण त्यांचे विरोधकही बनले.
यशवंतरावांचा मित्रपरिवारही मोठा होता. मीही त्यांच्या मित्रपरिवारापैकी आणि राजकीय सहका-यांपैकी एक. १९६२ ते १९८० सुरुवातीपर्यंत दिल्लीत संसद-सदस्य म्हणून मी राहिलो आणि सर्व राजकीय चढउतारात आम्ही एकमेकांच्या बरोबर राहिल्यामुळे व अनेक प्रश्नांवरील समान वैचारिक भूमिकेमुळे यशवंतरावांची आणि माझी वैयक्तिक मैत्री दृढ झाली. दीर्घकालीन सहवासामुळे यशवंतरावांचे विचार समजून घेण्याचीही संधी लाभली.

 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
			 
									 
			