वैचारिक भूमिका
यशवंतरावांच्या या अपयशाचे कारण त्यांच्या वैचारिक संदिग्धतेतच शोधावे लागते. त्यांनी शास्त्रीय सिद्धान्ताच्या स्वरूपात समाजवाद कधीच स्वीकारला नव्हता. ते राजकारणात ''मध्यबिंदूच्या डाव्या बाजूकडे'' झुकलेले होते. समाजवादाच्या संभाव्य परिणामांचे त्यांना आकर्षण होते, पण समाजवादाची काटेकोर मांडणी करून त्या विचारसरणीच्या आधारावर आपली प्रत्येक कृती व निर्णय तपासून पाहण्याची मात्र त्यांची तयारी नव्हती. आपला समाजवाद पाश्चात्त्यांच्या समाजवादापेक्षा निराळा आहे, मार्क्सवादाला तो अचूक व त्रिकालाबाधित मानीत नाही. हिंदुस्थानातला समाजवाद इथल्या अनुभवावरच अधिष्ठित असावा लागेल, मार्क्सप्रणीत तराजूवर तो मोजून भागणार नाही. माझा समाजवाद व्यावहारिक व फलितदर्शी आहे, तो महावाक्यांपेक्षा प्रत्यक्ष वैधारिक व प्रशासकीय उपायांच्या रूपाने व्यक्त होत असतो, शब्दांपेक्षा कृतीवर त्याची भिस्त असते, वगैरे शब्दांत त्यांनी समाजवादाचे सिद्धान्त उडवून लावले होते.
पण त्याचबरोबर हिंदुस्थानचा जो वेगळा समाजवाद असेल त्याचे नेमके स्वरूप कसे असेल आणि कोणत्या मार्गाने तो आणता येईल याची मांडणी मात्र त्यांनी कुठेही केलेली नव्हती. आपण सांगितलेली समाजवादाची गमके मोघक असल्याचे त्यांना मान्य होते. पण त्या संदर्भात ''ही गोष्टच अशी आहे की ती शब्दात उभी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती अस्पष्टच राहते'' (सह्याद्रीचे वारे २४१), असे म्हणून ते मोकळे होतात; आणि त्याच वेळी ''निश्चित अशा समाजवादाकडे जाण्याची आमची इच्छा आहे'' असेही म्हणतात. ''खासगी नफ्याच्या जागी सामाजिक नफ्याचा पाया अधिक घट्ट करणे'' त्यासाठी एकतर, आर्थिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि दुसरे म्हणजे सर्वांना समान संधी मिळेल अशी परिस्थिती निर्माण करणे व व्यक्तित्वविकासाला वाव देणे एवढाच स्थूल अर्थ ते समाजवादाचा सांगतात (कित्ता, २३९). सर्वांना समान संधी असावी, उत्पादनामागची प्रेरणा वैयक्ति नफेबाजीपेक्षा समाजाच्या सुखाची व हिताची असावी, लोकांच्या गरजा व विकासाच्या शक्याशक्यता विचारात घेऊन मालमत्तेची विभागणी व्हावी अशा समाजवादाच्या तीन कसोट्याही त्यांनी दुस-या एका भाषणात नोंदवल्या होत्या (युगांतर, २८८). मात्र हे अमुकच मार्गाने होईल असे सांगता येणार नाही, कारण इतिहास हा काही आंधळा पीर नाही, प्रत्येक देशाला समाजवादाची स्वतःची व्याख्या करावी लागते, इथेही ती प्रत्यक्ष अनुभवातून केली जाईल असे त्यांचे प्रतिपादन होते. आपण समाजवादाची फक्त भाषा करतो, पण त्या दिशेने ठोस वाटचाल मात्र करीत नाही ही खंत त्यांनी आयुष्याच्या अखेरीपावेतो अनेकदा व्यक्त केली होती.
समाजवादाचे समीकरण साम्यवादी देशांमधील लोकशाहीच्या संकोचाशी घालून आमचा समाजवाद लोकशाही मूल्यांची बूज राखील असेही एक ठोक विधान चव्हाणांच्या भाषणात वारंवार आले आहे. १९६० च्या महाबळेश्वर शिबिरापासून नंतरच्या अनेक प्रासंगिक भाषणांमधून समाजवादासंबंधी विवेचन त्यांनी केले असले तरी उपमा, उत्प्रेक्षा, दृष्टान्त व अन्य भाषिक अलंकरणे यामुळे त्यांच्या मांडणीचे स्वरूप कमालीचे शब्दाळ, भोंगळ व पसरट होत असे. उदाहरणार्थ, समाजवाद ही नुसती चर्चा करण्याची कल्पना उरली नसून ती आता प्रत्यक्षात आणता यावी, लोकांना उपलब्ध करून देता यावी, ती तरुणांनी जगावी व संपादावी अशी बाब झाली आहे.... थोडक्यात समाजवाद हा जीवनमार्ग आहे (उद्धृत अभिनंदनग्रंथ, ६७). तत्त्वज्ञानावर जास्त विसंबून न राहता व्यावहारिकदृष्ट्या जी गोष्ट योग्य दिसते तीच करायची, आकाशात भरा-या नकोत, जमिनीवर चालायचे आहे (सह्याद्रीचे वारे, १०९). समाजवादी मूल्यांवर माझा विश्वास आहे म्हणून मला आश्वासन द्यावयास हरकत वाटत नाही की या योजनेच्या विकासाची जी गती आहे ती पर्यायाने आपल्याला समाजवादाकडे घेऊन जाणारी आहे (कित्ता, १०७). आम्ही ग्रंथनिष्ठ नाही, मार्क्स आम्ही संपूर्ण सत्य समजत नाही (कित्ता, २३८). समाजवादाचे आपले तरुणपणीचे रोमँटिक विचार परिस्थितिवशात व मंत्रिपदाच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे अधिक वस्तुनिष्ठ झाल्याचेही त्यांनी वारंवार सांगितले आहे. समाजवाद न म्हणता समाजवादी समाजरचना असा शब्दप्रयोग करण्याचे स्पष्टीकरणही त्यांनी देशकालपरिस्थिति-विशिष्टत्वाशी जोडून दिले आहे.