१० यशवंतराव आणि समाजवाद
भास्कर लक्ष्मण भोळे
सामाजिक पार्श्वभूमी आणि बौद्धिक तयारी
ज्या सातारा जिल्ह्यात यशवंतरावांचा जन्म झाला आणि जिथे त्यांनी नेतृत्वाची उभारणी केली तो महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांपेक्षा समाजवादी विचारसरणीच्या जोपासनेस अधिक अनुकूल होता. जमीनदार आणि त्यांची कुळे यांच्यातील संघर्ष या जिल्ह्यात अधिक ठळक व झुंजार स्वरूपात व्यक्त झाला होता. एकेकाळच्या मराठा साम्राज्याची इथे राजधानी असल्यामुळे पराक्रम आणि राष्ट्रभक्ती यांची दीर्घ परंपरा तिथे आधीपासून होतीच. शिवाय टिळकप्रणीत शिवाजी संप्रदायानेही या जिल्ह्याला बरेच प्रभावित केले होते. विद्यमान परिस्थितीविषयी असमाधान आणि ती बदलण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याची शोषितांची तयारी यामधून आपोआपच समाजवादी विचाराची पूर्वपीठिका जिल्ह्यात तयार झालेली होती. ब्राह्मणेतर चळवळीचा बालेकिल्ला या जिल्ह्यात होता. त्या चळवळीने तिथल्या जनसामान्यांच्या मनावर सामाजिक समता व सामाजिक न्याय या तत्त्वांचे खोल संस्कार केले होते. शेटजी-भटजी या युतीविरुद्ध असंतोष मोठ्या प्रमाणात उसळला होता
बहुजन समाजातील श्रेष्ठींच्या ठिकाणी या चळवळीतून कायदे-कौन्सिलातील राखीव जागा, सरकारी नोक-या, व्यवसाय-उद्योगातील वाढीव भागीदारी वगैरेंबद्दल आकांक्षा निर्माण झाल्या, तर खालच्या श्रेणीच्या सामान्य शेतकरी शेतमजूर वर्गांच्या ठिकाणी तिने पिळवणुकीपासून सुटका करवून सामाजिक न्याय पदरात पाडून घेण्याच्या अपेक्षा पल्लवित केल्या होत्या. त्यांच्यासाठी ही चळवळ केवळ ब्राह्मण जातीचे वर्चस्व झुगारून देण्यापुरती नव्हती तर तिला वर्गवर्चस्वविरोधी स्वरूप आपसुकच प्राप्त झाले होते.
गांधींचे असहकारिता आंदोलन सामान्य शेतकरीवर्गाला जवळचे वाटले कारण त्याचे आवाहन वरिष्ठवर्गीय श्रेष्ठींना डावलून तळपातळीवरच्या सामान्य नागरिकांना केले गेले होते. नेतृत्वाचे पारंपारिक वलय छेदून नवे नेतृत्व उदित होण्याची शक्यता या आंदोलनातून पुढे आली होती. स्वाभाविकच पुरोगामी पिंडाच्या सातारा जिल्ह्यातील बहुजन समाजात नवचैतन्य प्रसृत होऊ लागले होते. यशवंतराव हे या चैतन्याची पेरणी करणा-या निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी एक म्हणून जिल्ह्यात वावरत होते. काँग्रेसच्या चळवळीबद्दल आदर बाळगूनही काँग्रेस सामान्य शेतक-यांच्या प्रश्नांशी एकरूप होत नसल्यामुळे ती तळागाळापर्यंत जाऊ शकत नाही हे सत्य प्रस्तुत कार्यकर्ते दुर्लक्षू शकत नव्हते. आर्थिक शोषणाचा खोलवर विचार केल्यामुळे जातिविग्रही भूमिका मांडणा-या बहुजनश्रेष्ठींपेक्षा वर्गविग्रही मांडणी करणारांकडे ते अधिक आकर्षित झाले होते.
उपकारक सामाजिक पार्श्वभूमी आणि स्वकष्टार्जित बौद्धिक तयारी या गोष्टींमुळे यशवंतराव समाजवादाचा विचार सहज समजावून घेऊ शकले. सत्यशोधक चळवळीने अप्रत्यक्षतः एक नवा ध्येयवाद त्यांच्या मनात पेरलेलाच होता. क्रांतिकारक विचारसरणी स्वीकारण्याची पूर्वपीठिका त्यातून तयार झाली होती. सावकारी पाश, कुळांची कायम ससेहोलपट वगैरे जे शेतकरी समाजाचे जिव्हाळ्याचे आर्थिक प्रश्न होते. त्याकडे जिल्हा व प्रांतिक काँग्रेसचे नेते दुर्लक्ष करतात हे पाहून यशवंतराव अस्वस्थ होत असत. १९३१ साली मसूर (तालुका कराड) गावी भरलेल्या राजकीय परिषदेत एका ठरावाला उपसूचना मांडून माधवराव बागल यांनी जेव्हा राजकीय मागण्यांच्या जोडीला काही आर्थिक मागण्या ठेवल्या तेव्हा तांत्रिक अडचणी पुढे करून नेत्यांनी त्या डावलल्या हे यशवंतरावांना खटकले होते. त्यांनी खुल्या अधिवेशनात बागलांना पाठिंबा दिला होता. शेतकरी समाजाच्या तातडीच्या प्रश्नांबद्दल ही परिषद काहीच बोलणार वा करणार नसेल तर शेतकरी समाजाने स्वातंत्र्य आंदोलनात घेतलेला भाग फुकट जाईल अशी त्यांची भावना झाली होती. आपल्या आत्मचरित्रात ते याबद्दल लिहितात, ''शहरातल्या पांढारपेशा वर्गातील कार्यकर्त्यांना व पुढा-यांना राजकीय स्वातंत्र्य प्रिय होते. पण त्यातून उद्भवणारे सामाजिक व आर्थिक प्रश्न त्यांना नको होते, असा अर्थ मी मनाशी काढला आणि माझे मन अतिशय कष्टी झाले.''
(कृष्णाकाठ, १०३).