९ तुझी साद तुझे आशीर्वाद प्राणाचे दुवे मेळवित गेले
तुझी साद तुझे आशीर्वाद घरभर दिवे लावून गेले
ना. धों. महानोर
पंचवीस नोव्हेंबर १९८४. एक काळी सायंकाळ. पुण्यात एस. एम. जोशी ह्यांच्या सत्कार-समारंभाचा कार्यक्रम आटोपून शरदराव पवार व मी रेस्ट हाऊसवर आलो. पहिली बातमी ही अशी. आम्ही दोघं सुन्न झालो.
आज तीन दिवस झाले. अंत्यविधी झाला. अनेक संपादकांनी सांगितले. परंतु चव्हाणसाहेबांवर लिहायला नीट जुळत नाही. कितीतरी आठवणींनी मन भरून येते. चित्रपटासारख्या त्याच त्या जुन्या गोष्टी समोर येतात.... डोळे वाहू लागतात... लिहिताना बोटं थांबतात.... ते इतके तडकाफडकी गेले... अजून पाच दहा वर्षे त्यांनी राहणं जरुरीचं होतं. निदान अशा अवस्थेत. उदासवाणं एकटेपण दिवसरात्र आता व्यापून आहे.
त्यांचा-माझा दहा वर्षांचा सहवास : तसा थोडा. पण कितीतरी मोठा. काय लिहावं, किती लिहावं, काही सांगता येईल, काही शब्दांपलीकडलं आहे. एवढ्या मोठ्या मनाचा, उंचीचा, जीवनाच्या सर्वांगाची समृद्धता-विशालता असलेला माणूस. नव्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिणामाचे भान ठेवून देशाच्या, महाराष्ट्राच्या जडणघडणीचा ऐश्वर्यसंपन्न सुजाण शिल्पकार. सह्याद्रीच्या छातीचा आणि फुलराणीतल्या नाजूक, सुगंध शब्दबंधातला. सुसंस्कृत नेता. शेवटपर्यंत सामान्य माणसातला नेता. अलवार, कोवळ्या कवि-हृदयाचा रसिक घरंदाज.
कविता, साहित्य ह्या निमित्तातं आता फक्त थोडं ॠणानुबंधातले सांगतो. डिसेंबर १९७४, इचलकरंजी साहित्य संमेलन.
पक्षांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे.
वार्यावर गंधभार, भरलेले ओचे
झाडातून लदबदल, बहर कांचनाचे
घन वाजत गाजत ये, थेंब अमृताचे.
दोन कविता वाचण्याची मर्यादा कवीला होती. तीस हजार रसिकांच्या पुढे कोणाचेही काही चालेना. रसिकांच्या आग्रहानं मी पाच-सहा कविता वाचल्या. दुस-या दिवशीही वाचल्या. व्यासपीठावर सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ कवी होते. समोर रसिकांत भाऊसाहेब खांडेकरांपासून माडगूळकर इत्यादी. आणखी यशवंतराव चव्हाण, मी कवी-संमेलन खूप गाजविलं होतं.
रात्री नऊ वाजता कुमार गंधर्वांचं गाणं होतं. मंडपाजवळ मला रणजित देसाई घ्यायला आले. तेथील मुक्कामावर मला चव्हाणसाहेबांनी बोलविण्याचं सांगितलं. माझी त्यांची साधी ओळखही नव्हती. मी बुजल्यासारखा गेलो. यशवंतराव चव्हाणांनी जवळ घेऊन मिठी मारली कविता, राहणं, उद्योग, घरचं, सगळं विचारलं. हजार वस्तीच्या खेड्यात मी राहतो व घरी कोणीही शिकलेलं नाही हे ते पुन्हा पुन्हा इतरांना सांगत होते.
पहिला धागा
ते त्या वेळी परराष्ट्रमंत्री होते. कोल्हापूरला जाणं रद्द केलं व रात्री माझी व अनेक कवींची मैफल झाली. बोरकर, अनिल, पाडगावकर इत्यादी. तसेच दुर्गाताई, पु. ल. देशपांडे, कुरुंदकर इत्यादी मिळून शंभर लोकांमधली कधीही न विसरावी अशी मैफल. त्यांच्या माझ्या ॠणानुबंधाचा पहिला धागा.
त्यानंतर बरोबर महिन्याभरानं माझ्या जिल्ह्यात एका साखर कारखान्याच्या उद्धाटनासाठी ते आले. सोबत मुख्यमंत्री नाईकसाहेब व मंत्रिमंडळ. मला बोलावून आणायला अगोदरच सांगितलं होतं. सर्व मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाभर फिरले. परंतु त्यांना चव्हाणसाहेबांनी सांगितलेला तो फार मोठा कोणी सापडेना. समारंभ आटोपल्यावर गर्दीत चुकून मी नमस्कारासाठी समोर गेलो तर त्यांनी सोडलंच नाही. आमचे आमदार, खासदार, मंत्री थंडगार झाले. घुमून दोन दिवस थकले होते.