मराठी मातीचे वैभव- ३५

योग नव्हता

कृष्णाकाठनंतर दुसरा खंड यावा म्हणून प्रकाशक सर्जेराव घोरपडे व आम्हीही बरेच लोक त्यांच्यापाठी लागायचो.  एक फार महत्त्वाचं काम ते झालं असतं.  योग नव्हता, एवढंच म्हणावं.  गेल्या महिन्यात त्यांना पत्र लिहिलं होतं.  त्यात शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नासंबंधी मला खासगी बोलायचं आहे असं लिहिलं होतं.  कर्हाडला भेटू या, असं त्यांचं पत्र आहे.  ते त्यांचं मला शेवटचं पत्र.  

ती भेट झालीही नाही.  काम खरं वेगळं होतं.  परंतु त्याचा होकार मिळणार की नाही म्हणून अडखळत होतो.  मी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष त्यांचे-माझे घरगुती संबंध.  तरीही बोललं पाहिजे असं.  एक साहित्यिक-रसिक माणूस, महाराष्ट्राची साहित्यिक सांस्कृतिक परंपरा त्यांनी जपली, वाढविली, त्याचे मोल सयाजीराव महाराज गायकवाड त्यांना संमेलनाचे अध्यक्षपद दिले तसे करावे म्हणून प्रथम क्रमांकाचे यशवंतरावांचे नाव सुचवले व त्यासाठी आग्रह धरला.  स्वागताध्यक्ष शामरावजी कदम यांचा पाठिंबा होता.  मी काही साहित्यसंस्था व साहित्यिकांशी बोललो.  जवळ जवळ सगळेच सहमत होते.  पुणे-मुंबईत व तेथील संस्थांत बोलायला २६-२७ नोव्हेंबरला येऊन ठेपलो होतो.  सर्वत्र प्रतिसाद त्यांच्या नावे आलाच असता.  असं झालं तर एकदा बिनविरोध त्यांना संमेलनाध्यक्षपद द्यावे असं वाटत होतं.  त्यांनी अनेक मोठ्या जागा, सन्मान, भाषणे घेतली.  परंतु शेवटी हेही जरुरी होते.  ते मनात राहून गेलं आहे.  त्यांचा होकार कसा मिळवायचा हेही पाहता आलं असतं.  अडचणी तशा नव्हत्या.  आज त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली.  

आजवर वेळोवेळी कितीतरी गोष्टी साहित्यासंबंधी बोललो.  साहित्यासंबंधी संस्था, चळवळ, कला, संगीत, गाणं हा त्यांच्या खास पिंडाचा भाग होता.  त्यांच्या तोडीची जाण व ओलावा ह्या क्षेत्रात दोन्ही हातांनी आम्हाला देणारा, समजून घेणारा राज्यकर्ता रसिक माणूस त्यांच्याशिवाय जवळपास दिसत नाही.  माणसा-माणसांना जोडणारा, शत्रूंवर प्रेम करणारा एक दिलदार, कलावंताच्या प्रकृतीचा माणूस कायमचा दूर गेला.  आम्हाला एकटं सुनं वाटतं.  राजकीय, सामाजिक घडणीच्या संदर्भात फार मोठी हानी झाली.  व्यक्तिशः माझ्या दहा वर्षांच्या जीवनाला ज्यांनी शक्ती दिली, नवी पालवी दिली, आधार दिला.  

विरंगुळामध्ये (कराडचे घर) एकदा चव्हाणसाहेब, वेणूताई, मी, त्यांचा डॉक्टर (के) पुतण्या, सूनबाई जेवायला होती.  ताटं तयार झाली माझ्यासाठी, साहेबांसाठी वेणूताईंनी फार जीव टाकून नॉन्व्हेज केलं होतं.  औषधी गोळ्या घेऊन घास घेणारे व्हा.  साहेबांनी मला घुटमळताना पाहिलं.  एकदम उठले.  मी शाकाहारी.  पण वेणूताईंना माहीत नव्हतं.  सगळे अर्धा तास थांबले.  पुन्हा कवीसाठी (निसर्गाच्या इत्यादी) व्हिजिटेरियन गोडधोड जेवण.  सगळं होतं.  पुरेसे पण पुन्हा जेवण वेगळं.  साहेब म्हणाले, 'पावसाची कविता'ची अर्पणपत्रिका वेणूताईंना दाखविली तेव्हा ती संकोचली.  म्हणाली, ''तुमचं ठीक.  माझं नाव कशाला टाकलंय.''

''तो कविराजांचा प्रश्न.  त्यांना असं सांगशील ?''

''नाही.''

इतके घरातले झाल्यामुळे वेणूताई गेल्यानंतर आम्हालाही साहेबांचं एकटेपण फार जाणवत राहिलं.  ते वेणूताईंच्या आठवणींच्या गर्तेतून बाहेर येऊच शकले नाहीत.

कसंतरी वर्ष लोटलं.  अनेक थरांतली, खूप मोठी, खूप सामान्य, फाटक्या माणसांच्या अंतःकरणातली ही मंडळी पाच-सात लाख लोक कर्हाडला तुडुंब रडत होते, सारखे.