मराठी मातीचे वैभव- ३४

वाङ्मयीन प्रश्न

वाङ्मयीन मासिके महाराष्ट्रात बंद पडत चालल्याचं ते एका भेटीत अलीकडे बोलले.  अनुष्टुभ, युगवाणी, सत्यकथा ते वाचीत; नियमित नसले तरी ब-याचदा स्वतःच वर्गणीदार झाले.  अंकातल्या मजकुरावर त्यांनी लिहिलं हे सांगून होणं वेगळं.  त्यांनी स्वतःच हे केलं; उत्स्फूर्तपणे ग्रंथाली व इतर वाङ्मयीन चळवळीसंबंधी ते संबंधितांशी बोलत.  पुस्तके, किंमती, विक्री यासंबंधात चांगली पुस्तकं शासनानं घेऊन ग्रंथालयांना द्यावी, निदान निवडक पाचशे, असं मी शासनात बोललो होतो.  त्यातला मुख्य विचार त्यांचा होता.  यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मर्यादित स्वरूपात तुकाराम, ज्ञानेश्वर, गाथा इत्यादींपासून सुरुवात केली होती.

परराष्ट्रमंत्री असतानाच एवढ्या धकाधकीत श्रीपाद डोंगरे ह्यांनी एकदा कळवलं - नासिक-निफाडला या, साहेबांनी बोलाविलं आहे.  शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यास निफाडजवळच्या एका हुतात्म्याच्या नावानं वाचनालय सुरू करायचं होतं.  मी गेलो.  कुठे कोणी यावं याचं त्यांना फार भान होतं.  सत्यकथा दिवाळीतली माझी प्रदीर्घ कविता त्यांनी आठवणीनं आणली होती.  (मीच कात्रण पाठविलेलं होतं.)  तीवर ते फार खूष होते.  तुमच्या कवितेतलं हे परिवर्तन फार मोलाचं आहे असं म्हणाले.  एका बाजूला अस्सल चिंतनशील दीर्घ कविता, मुक्त कविता, दुसर्या बाजूला मुद्दाम लिहिलेली काव्यात्म चित्रपट गीतं.  इतर गीतं.  कसं काय जुळतं सगळं.  ओतप्रोत आनंद त्यांच्यापाशी मी पाहिला.

शरदराव, प्रतापराव, विनायकराव इत्यादींसमोर कवितावाचन झाले तेव्हा म्हणाले, ''मातीतून मोत्याची कणसं निर्माण करणारा, मातीला सर्जनशील महानोर, त्याच कणसांना बालकवींच्या पुढे जाऊन जोंधळ्याला चांदणे लगडून जावं असे लिहिणारा महानोर, यापेक्षा महाराष्ट्रात अधिक किती गतिमानता पाहिजे इ.'' त्यांचं वाक्य हे माझं बळ झालं.

आज आमच्यापैकी कोणी कुठल्या पक्षात, दूरदेशात, राजकारणात, शेतीत कारखान्यात असतील.  ही सगळी नाती-गोती, गोतावळा यशवंतरावांचा एकच होता, आहे.  परंतु शरदराव, विनायकराव, आम्ही दुसर्या अर्थानं या क्षेत्रात फार पोरके असहाय झालो, हे खरं.

राजकारणी पुरुष म्हणून त्यांनी आपल्या ठिकाणी राहावं. साहित्यिक व्यासपीठ त्यांना वर्ज्य इत्यादी फार ताणण्यात अर्थ नाही.  इतर जाणकार (?) राजकारण्यांची गोष्ट वेगळी.  यशवंतराव चव्हाणांची गोष्ट वेगळी.  ते साहित्यिक होते.  त्यांच्या पद्धतीनं त्यांनी लिहिलं.

''ॠणानुबंध'', ''कृष्णाकाठ'' लोकांना अधिक भावलं.  ''कृष्णाकाठ''चा प्रकाशनसमारंभ करण्यास त्यांचा सक्त विरोध होता.  केला नाही.  परंतु पुस्तक छापून झाल्यावर सर्जेराव घोरपडे (प्रकाशक म्हणून नव्हे व्यक्ती) यांचे घरी साहित्यिक मित्रांना बोलावून त्यांच्याशी त्यांनी गप्पागोष्टी केल्या व कृष्णाकाठ भेट दिले.  ना. गो. कालेलकर, व्यंकटेश माडगुळकर, गोविंदराव तळवलकर, भालचंद्र नेमाडे, गो. मा. पवार, शरद पवार, विनायक पाटील, मी इत्यादी मित्रमंडळी होतो.  हा त्यांचा नित्याचा आवडीचा भाग.  असा संपूर्णपणे साहित्यिक पिंडाचा माणूसही ज्या वेळी कधी टीकाविषय होतो, याचं आश्चर्य वाटतं.  बड्यांनी त्यांच्या वाङ्मयीन भूमिकेबाबत लिखाण, वाद करणे वेगळे पण लुंगेसुंगे साहित्यिक त्यांच्यावर या निमित्ताने ''त्यांचे राजकारणाचे कपडे'' म्हणून आकसानं लिहितात तेव्हा फार फार वाईट वाटतं.  तुम्हाला राजकारणाविषयी बोलण्याचा, भोग भोगण्याचा जसा अधिकार, तसा त्यांनाही साहित्यिक म्हणून आहेच.

एकदा मी हा विषय काढला की ह्यांनी हे लिहिलं, त्याच्या अशा ओळी वगैरे.  ते फक्त हसले.  फार गोड हसले.  त्यांना माहीत सर्व होतं.  संबंधितांचा इतिहास माहीत.  तरीही त्यांच्याविषयी कटुता नाही.  ते जाहीर बोलले नाहीत, किंवा माझ्याजवळही त्यांनी याची दखल घेतली नाही.  राजसत्तेतील माणसाला ते फार कठीण नसतं.  परंतु चव्हाणसाहेबांच्या सुसंस्कृत, समंजस, सोशिक व्यक्तिमत्त्वाला ते माहीत नाही.

आमदार, खासदार पुष्कळ पुष्कळ मिळतील, कवी महानोर मिळणं कठीण असं ते म्हणत.  मोकळेपणी बोलताना दोघांनाही विषयाचा आडपडदा नसे.  मी शरदरावांबरोबर पहिल्या दिवसापासून होतो, तिथेच राहिलो.  ते कधीच मला तिकडे कुठे यावं, म्हणाले नाहीत.  उलट काय काय हाऊसमधलं विचारीत.  फक्त ह्या धावाधावीत, आमदारकीत मी वाचन इत्यादी सोडू नये, राजकारण्यांच्या फार आहारी जाऊ नये असं आतून माहिती असल्यामुळे व माझी प्रकृती ठाऊक असल्यानं सांगत.  किती तरी अशा एकट्या भेटी झाल्या.  ते, वेणूताई मी असं पुष्कळ.

असंच एकदा विरंगुळ्याला ते दोन दिवस होते.  वेणूताईही होत्या.  मला बोलावून घेतले.  त्या वेळी खूप मोकळं बोलता आले.  राजकारण चांगलं मी करतो, ते त्यांना खूप आवडायचं.  पाणी, शेतीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, साहित्य कलेपेक्षा मी अधिक मांडतो ह्याचा त्यांना खूप आनंद होता.  परंतु मी कविता फार जपली पाहिजे असं त्या भेटीत त्यांनी सांगितलं.  तेच माझं बळ, असं म्हणाले.  निवडणुकीच्या पद्धतीनं जाण्याची माझी प्रकृती नाही.  जाऊ नये.  इतर व्यवस्था माझ्यासारख्यासाठी आहे.  आमदार वगैरे असावं, परंतु कवितेपेक्षा ते मोठं नाही असं सांगितलं.  म्हणून खूप आग्रह झाला तरी मी उभा कधी राहिलो नाही.