१९६२ चे चीनचे आक्रमण आणि १९६५ चे पाकिस्तानचे आक्रमण या दोन आक्रमणांमध्ये मंत्रिपदावरून रणनीती ठरवीत असता आणि शत्रूच्या आघाडीवर सैन्याच्या हालचालीच्या आणि व्यूहांच्या तपशीलवार दैनंदिनी आखीत असताना युद्धमान राष्ट्रांच्या उद्दिष्टांचेही ते चिंतन करीत होते. ते म्हणतात, ''संरक्षणमंत्री म्हणून ज्या दिवशी मी दिल्लीला गेलो त्याच्या दुसर्या दिवशी चीनचे सैन्य माघारी फिरले आणि प्रश्न असा पडला की या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय ? ते आले आणि परत गेले. याच्या पाठीमागे त्यांचे काय इरादे असावेत ? काय हेतू असावेत ? याचा जेव्हा अभ्यास झाला आणि चर्चा झाली तेव्हा त्याचे सरळ सरळ तीन हेतू दिसून आले. सरळ एक गोष्ट आहे की, चीन आणि हिंदुस्थान हे प्रचंड लोकसंख्या असलेले विस्तीर्ण भूभाग आहेत. दोन प्रचंड भूभाग असलेली राष्ट्रे जेव्हा शेजारी शेजारी असतात तेव्हा हितसंबंधाचे विरोध निर्माण होत असतात. चीनच्या दृष्टीने त्यांच्यात आणि भारतात जी स्पर्धा होती ती अशी, की आशिया आणि आफ्रिका खंडातील स्वतंत्र होणारी जी छोटी छोटी राष्ट्रे आहेत. त्यांच्या पुढे आफ्रिका आणि आशिया खंडांत चीन हा भारतापेक्षा लष्करी दृष्ट्या अधिक समर्थ देश आहे. असे जे प्रदर्शन करावयाचे होते ते त्याने हिमालयामध्ये करण्याचे ठरविले आणि तेथे हा उद्योग केला.
''दुसरी गोष्ट अशी, की गेली १५-१६ वर्षे हिंदुस्थानने लष्करी तयारी गौण मानून विकासाची तयारी महत्त्वाची मानली आणि आपली सगळी साधनसामग्री विकासाच्या कामावर केंद्रित केली. पण लष्करी प्रश्न हिंदुस्थानपुढे येऊन ठाकल्यामुळे विकासाच्या कामासाठी लागणार्या साधनांतला काही भाग तरी संरक्षणाच्या तयारीला घातल्याशिवाय हिंदुस्थानला दुसरा मार्ग नाही, हे चीनला माहीत होते. हिंदुस्थानच्या आर्थिक संकटाचा बोजा अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न करणे हा चीनच्या आक्रमणातला दुसरा उद्देश होता. चीनचा आणखीही एक उद्देश होता. तो म्हणजे हिंदुस्थानच्या नॉन-अलाइनमेंटच्या-तटस्थतेच्या धोरणाला खीळ घालणे हा होय. पण या बाबतीत चीनचा अपेक्षाभंग झाला. हिंदुस्थान व पाकिस्तान यांच्यातील संघर्ष जागता ठेवला पाहिजे असा त्यांचा आता नवा प्रयत्न आहे. परंतु या संघर्षाचे स्वरूप पाकिस्तानने समजून घेतले, तर ती गोष्ट पाकिस्तानच्या हिताची ठरेल. कारण हिंदुस्थान व पाकिस्तान यांचा संघर्ष झाला पाहिजे अशा तर्हेची भावना मनात ठेवून आम्हाला चालणार नाही, कारण त्यामध्ये पाकिस्तानचाही नाश आहे व हिंदुस्थानचेही नुकसार आहे. हे आम्हाला उघड दिसते.
''पाकिस्तानच्या मनात हिंदुस्थानसंबंधी विरोधाची भावना मुळातच आहे. पण पाकिस्तान व चीन हे एकत्र आले याचे मुख्य कारण कोणते ? एकत्र आले ते काही धर्म किंवा साम्यवाद यांच्यामुळे नव्हे, तर हिंदुस्थानसंबंधी या दोन राष्ट्रांच्यामध्ये असलेला विरोध हेच याचे मुख्य कारण आहे. पण विरोधावर आधारलेले राजकारण फारसे यशस्वी होत नसते ही गोष्ट त्यांना समजत नसावी.'' (युगांतर, पृ. १००-२).
यशवंतरावांच्या अध्ययनशील, चिंतनशील आणि कृतिशील राजकारणाला एक खोल अशी निष्ठा लाभली होती. प्रत्यक्ष राजकारणामध्ये राष्ट्राची प्रकृती ते सतत जाणून घेत होते. इथल्या लोकशाहीचा पाया मजबूत नाही, नेहरूसारख्या नेत्यांच्या अभावी ही संसदीय लोकशाहीची विशाल, भव्य रचना डळमळून कोलमडेल अशीही शंका एतद्देशीय आणि विदेशी राजकारणी आणि समाजकारणी पंडितांना पडत होती. यशवंतराव संरक्षणमंत्री असतानाच चीनच्या आक्रमणाच्या धक्क्याने प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू खचले व निर्वतले. त्यांच्या पदावर लालबहादूर शास्त्री आले. ताश्कंद करार झाला. त्या संदर्भात यशवंतराव म्हणतात, ''या देशामध्ये असलेली लोकशाही या देशाला एक मोठा नेता होता, म्हणूनच आहे यावर माझा पूर्वीही विश्वास नव्हता आणि आजही नाही. नेहरूंनंतरही आम्ही या देशात लोकशाही टिकवली. हिंदुस्थानचा हा एक मोठा विजय आहे. या राष्ट्राच्या जीवनात प्राण ओतून एक नवे राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करताना एका नवीन तर्हेच्या आर्थिक जीवनाचा आपणास पाया घालावयाचा होता.... हिंदुस्थान हे एक पहिल्या प्रतीचे आणि मोठे प्रगत राष्ट्र म्हणून दुनियेमध्ये अभिमानाने जगू शकेल अशी माझी श्रद्धा आहे. राष्ट्र बनविण्याचे हे काम आज तुमच्या-आमच्याकडे आले आहे; हे तुमचे आमचे भाग्य आहे.'' (युगांतर, पृ. १०८-१०).
संरक्षणमंत्रिपदानंतर त्यांच्याकडे केंद्राचे गृहमंत्रिपद आले. नंतर अर्थमंत्री म्हणून समर्थपणे कारभार केला व अखेर विदेशमंत्रिपद स्वीकारले. विदेशमंत्रिपद स्वीकारल्यावर त्यांनी पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील राष्ट्रांच्या यात्रा केल्या. एका तर्हेची सबंध पृथ्वी-प्रदक्षिणा घडली. महानद्यांच्या काठची आणि सागरकिनार्यावरची शहरे पाहिली. नद्या, सरोवरे, जंगले, उद्याने यांच्यात विहार केला. निरनिराळ्या राष्ट्रांच्या विकासाचे कार्यक्रम अमलात आलेले प्रत्यक्ष अवलोकिले. या सर्वांचे मोठे रसिकतेने मार्मिक वर्णन त्यांनी आपल्या विविध लेखसंग्रहांमधून केलेले वाचावे. ते प्रत्यक्ष प्रशासनाच्या व्यापात नसते, तर मराठीतील प्रवासवर्णनाच्या साहित्यात त्यांनी अभिजात यात्रा-वर्णनांची भर घातली असती. त्यांच्या त्या यात्रावर्णनावरून त्यांचे मराठी शब्दकळेवरील प्रभुत्व प्रत्ययास येते. प्रत्यक्ष अनुभव आणि त्यांना तात्त्वि चिंतनाची जोड अशा तर्हेचे सुभग लेखन करण्यात यशवंतरावांचा हातखंडा होता. 'सह्याद्रीचे वारे', 'ॠणानुबंध', 'युगांतर', 'कृष्णाकाठ' हा आत्मचरित्राचा प्रथम खंड आणि 'भूमिका' हा चौथा लेखसंग्रह व भाषणसंग्रह (प्रेस्टीज पब्लिकेशन्स, पुणे) हे सगळे ग्रंथ मराठी साहित्याचे तेजस्वी अलंकार आहेत. त्यात यशवंतरावांची क्रांतदर्शी प्रतिभा आणि तत्त्वदर्शी प्रज्ञा प्रसन्नपणे प्रकट झालेली दिसते.
शेवटची १९७९ पासूनची त्यांची वर्षे ही ते यशाच्या उत्कर्षबिंदूपासून खाली जात आहेत याचे दर्शन ठरतात. परंतु त्यातही त्यांचे अंतःकरण शुद्ध तत्त्वनिष्ठेपासून कधीही ढळलेले आढळत नाही. नियतीने हात दिला असता तर या १९८५ च्या काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयाच्या वर्षात ते पुन्हा भारताच्या राजकीय क्षितिजावर तेजस्वीपणे जनतेला मार्गदर्शन करीत असलेले दिसले असते.