विदेश दर्शन - ४७

या सर्व संसारी स्त्रिया (होम वाइव्हज्) आहेत. शरीराची बांधणी आकर्षक रहावी, वेळ जावा, नवीन शिकावे, आपल्या पतीचे मन सतत आकर्षित ठेवावे या हेतूने अनेक संसारी स्त्रिया हे नृत्य शिकतात. नृत्य पाहण्यासारखे होते. तालबध्द पध्दतीने शरीराची ठसकेबाज हालचाल करणारे हे लोकनृत्य असावे.

Muir wood म्हणून येथील एक प्रसिध्द नैसर्गिक 'उद्यान' आहे. जुने प्रचंड वृक्ष - एकदम सरळ उंच. काही काहीतर १५०-२०० फुटांपर्यत उंच असावेत. Red wood चे हे वृक्ष आहेत. काही ५०० वर्षांपेक्षाही जास्त जुने असावेत, असे सांगितले गेले.

येथील हे उंचच्या उंच सरळ वृक्ष पाहिल्यानंतर काश्मीरमधील अशा उंच झाडांची आठवण झाली. श्री. सुचितला बॅनर्जी माझेबरोबर होते. ते काश्मीरमध्ये असताना मी गेलो होतो. त्याची आठवण करून दिली, तेव्हा त्यांनी त्या वेळी मला सांगितलेल्या एका गोष्टीचे स्मरण करून दिले.

''काश्मीरमध्ये या झाडांच्या खेरीज 'सरळ' असे दुसरे काहीच नाही. आणि ती सरळ झाडेही पोकळ आहेत.''

परंतु इथली झाडे उंच आणि खंबीर आहेत. अर्धा-एक तास या वनराजीमध्ये निवांत भटकलो व हॉटेलकडे परतलो. विजेच्या झगझगाटाने शहर रंगले होते. उंच टेकडीवरून शहरांचे दृश्य अत्यंत विलोभनीय वाटले.

रात्री येथील राजदूत श्री. भुतानी यांच्या घरी भोजनास गेलो होतो. या शहरातील वेगवेगळया क्षेत्रांतील प्रमुख लोक होते. बँकर्स, सायंटिस्ट, उद्योगपति, शिक्षणक्षेत्रात कार्य करणा-या एक-दोन प्रसिध्द स्त्रिया अशी मंडळी होती.

गेली दहा वर्षे अमेरिकेच्या अॅटॉमिक कमिशनचे अध्यक्ष असलेले आणि प्रसिध्द नोबल प्राइज मिळविणारे वृध्द शास्त्रज्ञ मुद्दाम आले होते. हे वृध्द दांपत्य मोठे मनमिळावू वाटले. जास्त जबाबदारीचे काम नको म्हणून आपल्या मुक्त युनिव्हर्सिटीमध्ये संशोधनाचे व अध्यापनाचे आपले प्रिय कार्य त्यांनी पुन्हा सुरू केले आहे. देश मोठा होतो तो अशा माणसांमुळे व त्यांच्या ज्ञाननिष्ठतेमुळे.

आज दुपारी येथून होनोलुलूला निघेन. तोपर्यंत बे-ब्रीज, आणि रिचमंड ब्रीज ओलांडून बर्कले युनिव्हर्सिटी पाहून येईन.

काल सायंकाळी सॅन्फ्रॅन्सिस्को विश्व-विद्यालयामधील Phelan Hall मधील राज्यातील हिंदी रहिवाशांनी स्वागत केले. गुजरात, पंजाबमधील बरीच मंडळी होती. चार-दोन महाराष्ट्रीयही भेटले. दोन पंजाबी धनिक भेटले. जमीनधारणेच्या विरुध्द तक्रार करीत होते. अमेरिकेत ते रहात असले तरी त्यांची पंजाबमधील जमीनीची मालकी राहिली पाहिजे असे ते तावातावाने बोलत होते. दोन घोडयांवर स्वारी करता येणार नाही असे हसत उत्तर देऊन मी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु फारसे यश आले नाही.

१९१०-११ साली हिंदी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे, 'गदर पार्टीचे' एक प्रमुख गोविंद बिहारीलाल हे या स्वागत-समारंभाचे अध्यक्ष होते. वय ८० च्या वर आहे. परंतु तरतरीत दिसले. गेल्या एक-दोन वर्षांपूर्वीच त्यांना पद्मभूषण देऊन गौरविले आहे. किती दूरपर्यंत स्वातंत्र्यसंग्रामाचे सैनिक निष्ठेने काम करीत होते हे पाहिले म्हणजे हृदय भरून येते.

येथील हे फेअर माऊंट हॉटेल एक प्रसिध्द हॉटेल आहे. आधुनिक सर्व साधने आहेत. परंतु सर्व वातावरण जुन्या राजवाडयासारखे आहे. या उंचीवरून हे सुंदर शहर विजेच्या प्रकाशाने नटलेले दिसत आहे. दूर उपसागराचे दर्शन होत आहे. या प्रशांत अशा सकाळच्या लवकरच्या प्रहरात, प्रशांत सागराच्या किना-यावर बसून लिहिण्यात मोठा आनंद आहे.

घर सोडून दोन आठवडे झालेत. खरे म्हणजे प्रवासाच्या धावपळीचा काहीसा कंटाळाही आला आहे. आता पुन्हा होनोलुलूहून लिहीन.