विदेश दर्शन - ४२

कालचा जवळ जवळ संपूर्ण दिवस ब्रार्डटन या इंग्लंडच्या दक्षिण किना-यावरील शहराला भेट देण्यात गेला. लंडनपासून साधारणत: ६० मैल दूर आहे हे ठिकाण. गेल्या दीड-दोनशे वर्षांत समुद्रकाठचे प्रवासी केंद्र म्हणून याची वाढ झाली आहे.

चौथ्या जॉर्जने येथे आपल्यासाठी एक राजवाडा बांधला आहे. (Royal Pavalion) १९ व्या शतकाच्या प्रारंभी मोंगल व चीनी स्थापत्याचे संस्कार झाल्यामुळे या राजवाडयाच्या बांधकामाची शैली संपूर्ण पौर्वात्य आहे. ही एकच इमारत इंग्लंडचे पूर्वेशी आलेल्या संबंधाची साक्षीदार असावी असे वाटते.

समुद्रकिना-यावर मैल नि मैल सुरेख रस्ता आहे. एका बाजूला जुन्या विविध तऱ्हेच्या शानदार इमारतींची रांग आहे. या रस्त्यावरून जाताना मुंबईच्या मरीन ड्राईव्हची आठवण झाली. या रस्त्यालाही येथे मरीन ड्राईव्हच म्हणतात. परंतु दोन्हींमध्ये फरक फार जाणवला. मुंबईच्या मरीन ड्राईव्हची घाई गर्दी, गोंधळ एकीकडे आणि येथील प्रशांत वातावरण दुसरीकडे. नवीन म्हणून का असेना हा मरीन ड्राईव्ह काही दिवस येऊन राहण्यासारखा वाटला.

लंडनबाहेरचा प्रवास अधिक सुखकर वाटला. अधून मधून हिरवीगार गवताची शेती, योजनापूर्वक राखलेली वृक्षराजी, यामुळे डोळयांना एक वेगळेच समाधान लाभते. परंतु तुलनेने पाहिले तर ऑस्ट्रियामध्ये डॅन्यूबच्या काठाने केलेला प्रवास व त्या आसमंताचे सौंदर्य कितीतरी पटीने जास्त आहे हे स्पष्ट जाणवते.

काल संध्याकाळी येथे पोहोचताच 'इंडिया लीग' मध्ये भाषणासाठी गेलो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या संस्थेने येथे भारताच्या सेवेसाठी फारच काम केले असल्यामुळे ही एक प्रमुख प्रातिनिधिक संस्था मानली जाते.

श्री. कृष्णमेनन यांनी या संस्थेची खूपच जोपासना केली होती. कालही माझ्या स्वागतासाठी झालेल्या सभेसाठी त्यांनी मुद्दाम संदेश पाठविला होता याचा अर्थ, दिल्लीत राहूनही लंडनमधील संस्थेशी आजही त्यांनी जिव्हाळयाचे संबंध ठेवले आहेत.

सिल्व्हरमन हे पार्लमेंटचे सदस्य सभेचे अध्यक्ष होते. प्रमुख भारतीय लोक, अनेक वृत्तपत्रांचे प्रतिनिधि, काही प्रमुख इंग्लिश मंडळी असे सर्वजण हजर होते.
 
या सभेचे ठिकाणी श्री. सिध्दार्थ शंकर रे यांचे सासू-सासरे भेटले. त्यांचे सासरे बॅरिस्टर आहेत. अजूनही प्रॅक्टीस चालू आहे. सासूबाई नुकत्याच हिंदुस्थानमध्ये जाऊन जावई मुख्यमंत्रि झाल्याचे आपल्या डोळयांनी पाहून आलेल्या. त्यात लेक संसदसदस्य झाली आहे याचा अभिमान. अगत्याने त्या माया रे हिच्या पार्लमेंटच्या कामाची चौकशी करीत होत्या.

आजपासून परिषदेच्या कामाच्या पूर्वतयारीस ख-या अर्थाने लागणार. बांगला देशचे अर्थमंत्री जनाब ताजुद्दिन आणि इंग्लंडचे अर्थ मंत्री श्री. बार्बर यांच्याशी आज भेट होणार आहे.

जमले तर दुपारनंतर शहरात थोडेसे भटकणार आहे. विशेषत: येथे एक प्रसिध्द बुक-शॉप आहे. तेथे चक्कर मारावी म्हणतो. निदान पुस्तके पाहून घेईन. खरेदी करण्याची शक्यताच नाही. तेवढेच नेत्रसुख. प्रकृति उत्तम आहे. २३ येथून तारखेस सकाळी वॉशिंग्टनंला जाण्यासाठी निघेन.