विदेश दर्शन - ४९

२१ वॉशिंग्टन 

(हॉल ऑफ दि अमेरिका)

२६ मार्च, १९७३

मला येथे येऊन चार दिवस झाले. लिहावे असा विचार करीत होतो. परंतु आज सुरू होणाऱ्या परिषदेची तयारी व पूर्वचर्चा यासाठी पुष्कळ वेळ द्यावा लागला.

भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा करावयाची होती. त्याचबरोबर या कमिटीवरील आमच्या कॉन्स्टिटयूअन्सीचे सदस्य आणि श्रीलंकाचे अर्थमंत्री डॉ. परेरा यांच्याशी आणि विकासशील (डेव्हलपिंग) देशांचे प्रतिनिधींशीही चर्चा करावयाच्या होत्या.

G 24 ची सभा उत्तम झाली. विकासक्षम देशांचे ऐक्य दर्शविण्याचा तो एक प्रयत्न होता. तो बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाला.

C 20 वरील डेव्हलपिंग देशांच्या प्रतिनिधींना मी 'वॉशिंग्टन हिल्टन' मध्ये खाना दिला. त्या वेळच्या चर्चेमध्ये भारताचा दृष्टीकोन स्पष्ट करण्याची आणि त्यांना त्या दिशेने प्रयत्न करण्याची विनंती करण्याची उत्तम संधी मिळाली.

या खान्याचे निमंत्रण C 20 चे अध्यक्ष श्री. अलिवर्धन यांना दिले होते. ते आलेही होते. हा तरुण मंत्री त्यांच्या देशाच्या आजच्या प्रो-अमेरिकन धोरणामुळे फार सावध बोलत होता. प्रगत देशांच्या भावना न दुखवता आपले प्रश्न मांडावेत असा त्यांचा सल्ला होता.

सावधानता मी समजू शकतो. परंतु शरणागती स्वरूपाचे पडखाऊ धोरण विकासशील देशांच्या आर्थिक भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरेल. विशेषत: आज नवे धोरण आखण्याचा एक संघटित प्रयत्न करण्याची ऐतिहासिक संधी आम्हास प्राप्त झाली असताना, जर आम्ही त्याचा योग्य उपयोग याच वेळी केला नाही तर, इतिहास आम्हाला क्षमा करणार नाही, हे माझे विचार त्यांना ऐकवले. किती उपयोग झाला कोण जाणे ?-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'C २०' The Committee of Twenty consisted of Finance/ Governors of Central Bank representing the twenty constituencies.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आज सभा उत्तम वातावरणात सुरू झाली. रात्री अमेरिकन अर्थमंत्र्याचे भोजन आहे. तेथे अनौपचारिक चर्चा होईल, त्यावेळी Blair House मध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत असा प्रयत्न निश्चित होईल.
श्री. बार्बर माझ्याशेजारी सभेत आहेत. हा धूर्त इंग्रज, मी विचारले तेव्हा म्हणतो की ''मी सब्स्टॅन्सिअल प्रश्नावर बोलावयाचे नाही असे ठरविले आहे. वर्क प्रोग्रॅमवर बोलावे असा विचार आहे.''

इतरांना बोलू द्यावयाचे व आपणास जे करावयाचे ते करीत राहावयाचे ही त्यांची नित्याची नीति आहे. पाहू या काय होते ते.

धनी देश सर्व प्रश्न बरेच दिवस लोंबकळत ठेवण्याची नीति अवलंबवतील, तर आम्हा लोकांना नैरोबीची वार्षिक सभा होण्यापूर्वी मोनॅटरी सिस्टिमची मूलतत्त्वे निश्चित ठरविण्याची घाई आहे. शक्यतर जुलैमध्ये पुन्हा एकदा मिनिस्टर्सची सभा व्हावी असा आमचा आग्रह आहे.