विदेश दर्शन - ३५

या सरोवराचे वातावरण आहे मोठे रम्य, आल्हाददायक, म्हणूनच काव्यात्मक. यासंबंधी काहीसा इतिहासही आहे. या सरोवराच्या काठी सुप्रसिध्द इंग्लीश कवी बायरन बराच काळ राहिला होता. सरोवराच्या काठच्या एका मोठया खडकावर बसून त्याने आपल्या काही प्रसिध्द कविता
लिहिल्या आहेत. या सरोवरातच त्याचा अंत झाला. या सरोवराच्या काठच्या या भागातील छोटयाशा वस्तीस त्याचे नावही दिलेले आहे.

श्री. राम प्रधान यांच्या घरी ते घेऊन गेले होते. त्यांची मुले, पत्नी भेटल्या. त्यांच्या एकुलत्या एका मुलीच्या डोळयाचे ऑपरेशन करावे लागले. त्यामुळे दोघेही पति-पत्नी दु:खी दिसले.

दुपारचे जेवण बॅनर्जीच्या घरी झाले. शहराच्या बाहेर एका सुरेख फार्मव्हिला मध्ये ते राहतात. दुपारच्या उन्हात घराबाहेर बसून वेळ काढला. त्या वेळी काहीशी गुलमर्गची आठवण झाली.
 
सुरेख उन्हे. झोंबणारा वारा. दूर अतंरावर दिसणारे उंच बर्फाच्छादित डोंगर. विस्तीर्ण पसरलेली हिरवीगार गवताळ शेती. उंच झाडांची गर्दी. अशी ही काही महत्त्वाची साम्यस्थळे आहेत. फक्त एक महत्त्वाचा फरक म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा शेजार. त्यामुळे एकसारखी येणारी व जाणारी विमाने आपल्या कर्णकर्कश घरघरीने वातावरणात अस्वस्थता निर्माण करतात.

दुपारी दोन वाजता निघून झ्युरिकमार्गे व्हिएन्नास संध्याकाळी पोहोचलो. श्री. विष्णू त्रिवेदी हे येथील आमचे राजदूत. त्यांच्या घरी रात्रीचे जेवण झाले.

काही महत्त्वाची स्थानिक माणसे त्यांनी जेवावयास बोलाविली होती. त्यात अर्थखात्याचे प्रमुख चिटणीस, पूर्वीच्या व आत्ताच्या ऑस्ट्रियन राजदूतिका होत्या. योगायोगाने लागोपाठ दोन महिलांना हिंदुस्थानमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली हे एक वैशिष्टय म्हटले पाहिजे. हल्लीच्या अॅम्बॅसडर बाई या राजकीय दृष्टया या देशातील एक महत्त्वाच्या व्यक्ति आहेत. समाजवादी राजकारणात या देशात त्यांचे स्वत:चे स्थान आहे. यू. एन्. ने त्यांना आपल्या देशातील मदतीच्या कार्याचे प्रमुख नेमले आहे.

येथील चर्चेत मला प्रथमच समजले की, येथील तीन महत्त्वाच्या व मोठया बँकांचे राष्ट्रीयीकरण दुस-या महायुध्दानंतर लगेच झाले असून या राष्ट्राच्या पुनर्रचनेमध्ये या बँकांनी फार महत्त्वाची कामगिरी केली आहे.

या राष्ट्रीयीकरणाची आणि आपल्या राष्ट्रीयीकरणाची पार्श्वभूमी एकदम वेगवेगळी आहे. दुस-या महायुध्दामध्ये या देशाचा आणि उद्योगधंद्याचा संपूर्ण विध्वंस झाला होता. या विध्वंसाच्या राखेतून नवा देश उभा करायचा होता. हे काम करण्याचे साधन राष्ट्रीयकृत बँकांना बनविले.

या बँकांचे प्रमुख, जेवणानंतरच्या चर्चेत म्हणाले, In your country you nationalized the assets of the banks, but in our country we nationalized the ruins of the banks. शेतीला कर्ज देण्याचे काम सहकारी बँका करतात. शेतीवर काम करणारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

Savings Banks हा तिसरा प्रकारही येथे आहे. सामान्यपणे या तऱ्हेच्या बँका विजेचे उत्पादन वगैरे 'इन्फ्रा स्ट्रक्चर' च्या विकासास मदत करण्याचे कार्य करीत असतात. (एल्. आय्. सी. चा नमूना.) अशा त-हेने १९ तारीख गेली.