रात्री 'गेलॉर्ड' या हिंदी रेस्टॉराँमध्ये उत्तम जेवण घेतले. सॅनफ्रॉन्सिस्कोमध्ये दिल्ली!
सकाळी या शहराच्या मेयॉरतर्फे या शहराची की (Key) सन्मानदर्शक दिली. स्टेट डिपार्टमेंटचे व मेयॉरचे प्रतिनिधि हजर होते.
आज सोमवार असून या शहरामध्ये आज सुट्टी आहे 'कोलंबस डे'. हिंदुस्थान शोधण्याकरिता निघालेल्या कोलंबसला आज अमेरिका सापडली. (बऱ्याच शतकांपूर्वी) म्हणून हा दिवस अमेरिकेत आणि विशेषत: येथे मोठया प्रमाणात साजरा होतो.
कालपासून येथे मिरवणुका (परेडस्) निघत आहेत. ह्या मिरवणुकांचे स्वरूप म्हणजे २६ जानेवारीला सैनिक-संचलनानंतर चित्रविचित्र रंगांचे फलक व निशाणे घेऊन निघणारी पथके असतात ना तशी. मजेदार अनुभव.
दुपारी प्रेस-क्लबचे जेवण. नंतर भाषण व प्रश्नोत्तरे झाली. आपले मतभेद प्रश्न विचारताना दाखवितात, परंतु उत्तर शांतपणे ऐकतात. पटले तर तसे सांगतातही. प्रेसवरील निर्बंध व चौकशीशिवाय कैद हे या देशातील कुणालाच आम्ही शंभर टक्के पटवून देऊ शकत नाही. पार्श्वभूमी तपशीलाने सांगितली म्हणजे निदान शांत होतात.
आता दुपारी ५॥ वाजता 'वर्ल्ड अफेअर्स' पुढे भाषण व पुन्हा प्रश्नोत्तरे. तेच प्रश्न-तीच उत्तरे. पण हे करण्याची गरज आहे. अनेकांना भेटून होते. काही संभाषणे होतात. आपला आवाज तितकाच पसरतो. देशांची धोरणे स्पष्ट करण्याची ही संधि मी पुरेपूर वापरतो आहे.
रात्री कौन्सल जनरल श्री. लखन मलहोत्रा यांचे घरी जेवण व तेथून परस्पर विमानतळ. श्री. डोंगरे सामानाची आवराआवर करीत आहेत. आणि मी दुपारचा उत्तम चहा पीत पीत हे लिहीत आहे.