पाकिस्तानच्या विदेशमंत्र्यांनी काश्मीरचा उल्लेख स्वयंनिर्णयाच्या संदर्भात करून एक बलून उडविला. आम्ही आमच्या निवेदनात आपली भूमिका स्वच्छ करून काश्मीर भारताचे अंतर्गत क्षेत्र आहे असे पुन्हा एकदा मांडले. त्यानंतर त्यांचे उत्तर. त्याला आमचे उत्तर. असा चेंडू उडविण्याचा थोडा खेळ होऊन तूर्त जनरल असेंब्लीपुरते तरी हे प्रकरण स्थगित झाले आहे.
चीनने आपल्या निवेदनात बांगलादेशच्या फराक्का तक्रारीला राजकीय पाठिंबा उघडउघड दिला. चीनचे या संबंधीचे तर्कशास्त्र समजावून घेण्याची गरज आहे. मूळ राजकीय विरोधाचा पिंड बदललेला नाही. भारताच्या चारही बाजूच्या चारही शेजाऱ्यांना त्यांनी आपला पाठिंबा मुद्दाम जाहीर केला. This is typical of China.
५ ऑक्टोबरला 'वंशभेद विरोधी यू. एन्. स्पेशल कमिटी' ची खास बैठक घेऊन त्यापुढे मला बोलण्यासाठी निमंत्रित केले होते. माझ्या भाषणापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आफ्रिकेतील या वंशभेदाविरुध्द पहिला आवाज भारताने उठविला (१९४४). त्यासाठी भारताविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही बैठक मुद्दाम बोलाविली होती. त्यासाठी प्रत्येक भौगोलिक विभागांचे प्रतिनिधि बोलले. त्यांची भाषणे ऐकताना मन गहिवरून गेले. महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासंबंधी आदराने ओथंबलेली भावना त्यांनी व्यक्त केली. या खेपेच्या यू. एन्. मीटिंग्ज् अविस्मरणीय अनुभव म्हणून माझ्या लक्षात राहतील.
आज रात्री श्री. साद हाशमी यांच्या घरून जेवून आलो. रात्री ९॥ वाजता अध्यक्षीय उमेदवारांची जाहीर जुगदबंदी टेलिव्हिजनवर होती. ती ऐकून आलो. अमेरिकन मतदारांवर काय परिणाम झाला असेल तोच महत्त्वाचा हे कबूल पण मी तरी निराश झालो.
आर्थिक प्रतिगामी व अनुदार धोरण कोण घेतो त्याचीच स्पर्धा होती म्हटले तरी चालेल. श्री. कार्टर बोलताना हसतमुख होते. श्री. फोर्ड गंभीर होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय धोरणांची चर्चा केली. शांतता शब्द वारंवार उच्चारला पण शस्त्रशक्ती वाढविण्यावर भर होता.
इस्त्राएलला दोघेही स्पर्धेने शस्त्रास्त्र-शक्ती पुरविण्याची भाषा बोलत होते. विकसनशील राष्ट्रांची कुणालाच आठवण झाली नाही! फूड सप्लायचा नाही म्हणायला ओझरता उल्लेख आला. दोन्ही व्यक्तित्वांचे स्वरूप काय होते? निदान मला तरी कार्टर चलाख म्हणून धोकादायक वाटतो. फोर्ड गंभीर पण प्रामाणिक व्यक्ति वाटली.
मी त्यांचा मतदार नसल्यामुळे माझ्या या मताने कुणाचा फायदा वा तोटा होणार नाही. अमेरिकन जनता कुणाला निवडते ते पहावयाचे. म्हणजे त्यांची पारख करण्याची दृष्टी व शक्ती समजून येईल.
येथील आमचे प्रतिनिधी श्री. रिखी जयपाल यांचेसंबंधी लिहिल्याशिवाय हे लेखन पुरे होऊ शकणार नाही. मला हा अधिकारी आवडतो म्हणण्यापेक्षा मला त्यांचेबद्दल आदर वाटतो हे म्हणणे अधिक सार्थ होईल. त्यांच्याबद्दल सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींमध्ये आपुलकी आहे. गोडवा स्वभाव, गंभीर व्यक्तिमत्व व तीक्ष्ण बुध्दी यामुळे त्यांचे येथील काम फारच चांगले चालले आहे. क्वचितच कुणाबद्दल मनापासून इतके चांगले लिहावे असे मला वाटले असेल. Good Luck to him.
उद्या सकाळी मेट्रॉपॉलिटिन म्युझियम ऑफ फाइन आर्ट येथे जाऊन तासभर खर्च करणार आहे. पुस्तके पुष्कळच खरेदी केली आहेत. Buck minister Fuller ची पुस्तके हिंदुस्थानमध्ये मिळत नाहीत. येथे पाहिली. सहजासहजी मिळाली नाहीत. प्रयत्नपूर्वक मिळविली.