विदेश दर्शन - १८१

९३ हूस्टन
११ ऑक्टोबर, १९७६

आज बरोबर दोन वर्षें झाली. मी विदेश मंत्रालयाची सूत्रे घेतली त्याला. सकाळी श्री. जानकी गंजूनी मला आठवण करून दिली याची. योगायोगाने श्री. केवलसिंग बरोबर होते. ते आताच, म्हणजे ८ तारखेला अॅम्बॅसिडर म्हणून येथे आले आहेत. मग, श्रीपाद डोंगरे, शरद काळे दोघेही एकत्र बसून अनेक जुन्या आठवणी निघाल्या, काळ किती झपाटयाने जातो नाही?

आज रात्री मी येथून निघून लॉस् एंजेलसला जाईन. मी उतरलो आहे हे अमेरिकेतील उत्तम हॉटेल आहे. (Faiomont Hotel and Tower.) ७२ साली आलो असताना, मला वाटते, मी येथेच उतरलो होतो. निदान मी ज्या खोलीत उतरलो आहे ती उत्कृष्ट आहे. (ती मात्र जुनी नाही) एकदम मन प्रसन्न करणाऱ्या (cheerful-open yet private) दोन्ही बाजूंनी Bay of S. F. चे उत्कृष्ट दर्शन होत आहे.

विसाव्या मजल्यावरून बे काठच्या शहराचा भाग गोल्डन ब्रिजपर्यंत विस्तारलेला, छान दिसतो. काल-आज दोन्ही दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळे, विविध रचनेची व उंचीची शुभ्र रंगाची घरे व इमारती मोहून टाकतात.

आता दुपारी बे वर पॅसिफिकवरून धुके घुसले आहे. तेवढाच तो धुक्याचा पट्टा बे वर पसरतो आहे. हे मी उगीच पहात बसलो आहे. कितीही वेळ ते पहात बसले तरी ते अपुरे वाटते.

काल दुपारी पोहोचल्यावर 'रेड-वुड' _ (ब्रिजच्या पलीकडे १५ च मैलांवर असावे) पहावयास गेलो. पूर्वी मी येथे आलो असता पाहिले होते. मला ते अतिशय आवडले होते. पुन्हा पुन्हा पहाण्यासारखे आहे. ४०-५० मिनिटे तेथे भटकलो. २४० फूट उंचीचे व १२००-१३०० वर्षांचे एक झाड आहे. ही झाडे कॅलिफोर्नियामध्येच आणि तीही समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशातच येतात. वन-संरक्षणाची अमेरिकेची ही अनुकरणीय परंपरा आहे. हे राष्ट्रीय उद्यान आहे. दरवर्षी १० लाख माणसे येथे भेट देतात.

परत येऊन शहर मेमोरियलमध्ये गेलो. तेथे लायब्ररीचे उद्धाटन माझे हस्ते केले. ५०० भारतीय वृध्द-तरुण जमले होते. नंतर रिसेप्शन झाले. अनेक नवी माणसे भेटली. काही ओळखीची निघाली.
 
के. के शहा यांची मुलगी शिक्षणासाठी येथे आहे. ती मुद्दाम आली होती.